मतदार ओळखपत्राच्या पडताळणीबाबत बनावट मेसेजपासून सावध राहा

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचे नागरिकांना आवाहन

    18-Aug-2026
Thane Voter ID Fake Message
 
ठाणे: (Thane Voter ID Fake Message) ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना आणि मतदारांना व्हॉट्सअॅप तसेच इतर मेसेजिंग माध्यमांवर निवडणूक आयोगाच्या नावाने बनावट (फेक) मेसेज पाठवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदेशांमध्ये मतदारांचे नाव आणि वडिलांचे नाव जुळत नसल्याचा बनावट दावा करून एका खाजगी क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जात आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या संदेशांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, तसेच त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.(Thane Voter ID Fake Message)
 
अनधिकृत व्हॉट्सअप क्रमांकावरून मतदारांशी संपर्क
 
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मतदार यादी पडताळणी किंवा विशेष सारांश पुनरीक्षण (SIR) अंतर्गत होणारे सर्व कामकाज केवळ आणि केवळ अधिकृत शासकीय यंत्रणेमार्फतच केले जाते. निवडणूक आयोग किंवा जिल्हा प्रशासन कोणत्याही खाजगी कंपनी, अनोळखी व्यक्ती किंवा अनाधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावरून मतदारांशी अशा प्रकारे वैयक्तिक संपर्क साधत नाही. या संपूर्ण प्रक्रियेत केवळ अधिकृत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO - बूथ लेव्हल ऑफिसर) हेच अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतात.(Thane Voter ID Fake Message)
 
मतदारांना सतर्कतेचे आवाहन
 
त्यामुळे कोणत्याही नागरिकाला आपल्या मतदार नोंदणीबाबत किंवा तपशिलाबाबत काही शंका अथवा दुरुस्ती असल्यास त्यांनी केवळ आपल्या भागातील नियुक्त बीएलओ (BLO) किंवा अधिकृत निवडणूक नोंदणी कार्यालयाशीच संपर्क साधावा.कोणत्याही अज्ञात क्रमांकावर आपली वैयक्तिक कागदपत्रे, बँक तपशील किंवा माहिती शेअर करू नये, असे सतर्कतेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.(Thane Voter ID Fake Message)
 
 




संबंधित मजकूर