पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर; पुढील ५० वर्षांचा विचार करून उपाययोजना कराव्यात

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Pune Traffic Management
 
पुणे: (Pune Traffic Management) पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी हा केवळ चर्चेचा विषय न राहता त्यावर ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. शहराचा झपाट्याने झालेला भौगोलिक विस्तार, वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अपुरा विस्तार यामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील काळातील प्रलंबित कामांचा बॅकलॉग भरून काढतानाच पुढील ५० वर्षांचा विचार करून पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली.
 
पुणे शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक मंगळवारी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी महापौर अंकुश काकडे, वंदना चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, शिवसेना (ठाकरे गट)चे गजानन थरकुडे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (Pune Traffic Management)
 
मोहोळ पुढे म्हणाले की, पुण्याची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली असून ती सुमारे ६० ते ७० लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहराचा भौगोलिक विस्तारही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मात्र, त्या तुलनेत रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार झालेला नाही. शहरातील रस्त्यांची वाढ आठ टक्क्यांपेक्षा अधिक झालेली नसताना सार्वजनिक वाहतुकीचा वापर सध्या केवळ सुमारे ११ टक्के आहे. त्यामुळे नागरी सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. (Pune Traffic Management)
ही वस्तुस्थिती स्वीकारून वाहतूक प्रश्नावर सर्व संबंधित यंत्रणा आणि घटकांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
 
सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे ही काळाची गरज
 
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. सध्या पुण्याच्या रस्त्यांवर सुमारे १,९७० बसेस धावत आहेत. शहराची वाढती गरज लक्षात घेता पुढील तीन वर्षांत बससंख्या तीन ते चार हजारांनी वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून ई-बस उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. बसची संख्या वाढविण्याबरोबरच ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. (Pune Traffic Management)
 
मेट्रोला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मेट्रोचा विस्तारही वेगाने होत आहे. मात्र, सार्वजनिक वाहतुकीतील बससेवा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम झाली, तर खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. (Pune Traffic Management)
 
प्रमुख मार्ग आणि ‘कनेक्टींग लिंक’वर उपाययोजना
 
नगर रस्ता, सोलापूर रस्ता आणि नाशिक रस्ता यांसारख्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक समस्यांवर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. शहरातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या ‘कनेक्टींग लिंक’ दूर करण्याबरोबरच आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात आहे. काही उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाली असून प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. (Pune Traffic Management)
 
वाहतूक सुधारणा आराखड्याची अंमलबजावणी केवळ तात्पुरत्या उपायांच्या आधारे न करता तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करावी लागेल. शहराच्या आजच्या गरजा तसेच पुढील अनेक दशकांतील लोकसंख्या, वाहनसंख्या आणि नागरी विस्तार लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे आवश्यक आहे. (Pune Traffic Management)
 
वाहतूक सुधारण्यासाठी स्थानिक समित्या स्थापन करणार : अमितेश कुमार
 
पुणे शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून प्रभावी उपाययोजना करण्यात येतील, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. शहरात सध्या ३५ वाहतूक चौक्या असून प्रत्येक चौकीच्या कार्यक्षेत्रातील वाहतूक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक आणि पोलीस यांचा सहभाग असलेल्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. (Pune Traffic Management)
 
या समित्यांमध्ये सुमारे ४० ते ४५ सदस्यांचा सहभाग असेल. प्रत्येक चौकीच्या हद्दीतील स्थानिक वाहतूक समस्या, अरुंद रस्ते, वाढलेली वाहनसंख्या, वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करून त्यावर स्थानिक पातळीवर उपाय सुचवले जातील. या समित्या पुढील आठवडाभरात स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. (Pune Traffic Management)
  




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर