‘जग भारताकडे कसे बघते,’ या प्रश्नाचे उत्तर, ‘जग भारताकडे आशेने बघते,’ असे हमखास दिले जाते. त्याअनुषंगाने ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या एका नुकत्याच जारी झालेल्या सर्वेक्षणातूनही एकूण ३६ देशांचा भारताविषयी, भारतीयांविषयीचा दृष्टिकोन अधोरेखित होतो. त्या सर्वेक्षणाचे केलेले हे आकलन...
आपल्याबद्दल कोण नेमका काय विचार करतो, हे जाणून घेण्याची मानवी उत्सुकता जशी कायम असते, तसेच आपल्या देशाबद्दलही परदेशी नागरिक काय बरे विचार करत असतील, याबद्दलचे औत्सुक्यही पूर्वापारपासून कायम आहे. माध्यमतज्ज्ञ मार्शल मेकलुहानच्या म्हणण्याप्रमाणे, जग हे आता ‘जागतिक खेडे’ ठरल्यामुळे जगाच्या कुठल्याही कोपर्यातील व्यक्तीची, समुदायाची मते आपल्यापर्यंत आणि आपली मते जगाच्या कानाकोपर्यात अगदी क्षणार्धात पोहोचतात. उदाहरणादाखल सांगायचे, तर भाषा, खाद्यसंस्कृती, राहणीमान अशा वेगवेगळ्या निकषांवर दोन देशांची तुलना करणारे व्हिडिओ, रिल्सही जगभरात तितक्याच आवडीने पाहिले जातात. तसेच यासंदर्भातील बातम्या, लेख आणि एकूणच माध्यमांतील वार्तांकनावरूनही ही मतनिर्मितीची प्रक्रिया निरंतर सुरू असते. तेव्हा हाच धागा पुढे नेत अमेरिकास्थित ‘प्यू रिसर्च सेंटर’ने सर्वेक्षणाधारित एक संशोधन अहवाल नुकताच जाहीर केला. यामध्ये ३६ देशांमधील तब्बल ४२ हजार नागरिकांना फेब्रुवारी ते मे २०२६ दरम्यान भारताविषयी त्यांचे मत काय, असा प्रश्न विचारण्यात आला आणि तेच निष्कर्ष स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आले. या सर्वेक्षणाची ‘सॅम्पल साईझ’ ही तुलनेने कमी असली हे जरी मान्य केले, तरी जगाचा भारताकडे बघण्याचा सार्वत्रिक दृष्टिकोन समजण्यासाठी हे निष्कर्ष साहाय्यभूत ठरू शकतात.
भारताचे त्या-त्या देशांशी असलेले राजनयिक संबंध, त्या देशातील भारतीयांचे एकूणच वास्तव्य, धर्म, संस्कृती, जागतिक युद्धस्थिती अशा कित्येक निकषांवर एखाद्या देशाविषयीचे आपले मत ठरत असते. किंबहुना, ते बदलतही असते. ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालातील निष्कर्षानुसार, ४५ टक्के परदेशांतील नागरिकांची मते भारताविषयी सकारात्मक, तर ४१ टक्के नागरिकांची मते ही नकारात्मक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. तेव्हा सर्वप्रथम भारताकडे, भारतीयांकडे सकारात्मकतेने पाहणारे देश कोणते, ते जाणून घेऊया.
भारताला सर्वाधिक पसंती देणार्या देशांपैकी पहिल्या क्रमांकावर आहे तो श्रीलंका! श्रीलंकेतील ७९ टक्के नागरिकांनी भारताबद्दल सकारात्मकता दर्शविली. त्यामागचे कारणही तसेच. मार्च २०२२ मध्ये श्रीलंकेत राजपक्षे सरकारविरोधात भडकलेल्या देशव्यापी आंदोलनानंतर, भारतानेच श्रीलंकेला मदतीचा हात दिला. चार अब्ज डॉलरच्या अर्थसाहाय्यासह अन्नधान्य, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून भारत श्रीलंकेशी असलेल्या मैत्रीला अर्थोअर्थी जागला. म्हणूनच, आज श्रीलंकेत भारताची प्रतिमा ही निश्चितच सकारात्मक म्हणावी लागेल. अशाच प्रकारे भारताबाबत सकारात्मक मतप्रदर्शन करणार्या काही देशांमध्ये- यूके आणि केनिया- ७१ टक्के, इस्रायल- ६० टक्के, जर्मनी- ६३ टक्के, इटली- ५६ टक्के, स्विडन- ५५ टक्के, जपान आणि थायलंड- ५५ चक्के, इंडोनेशिया- ५० टक्के, बांगलादेश- ४२ टक्के आणि अपेक्षेप्रमाणे या क्रमवारीत सर्वांत खालच्या स्तरावर आहे तो पाकिस्तान, जिथे अवघ्या सात टक्के नागरिकांनी भारताला पसंती दिली. मग पाकिस्तानींना त्यांचा जीवश्च-कंठश्च मित्र कोण वाटतो, यावरही पाकिस्तानींनी अमेरिका अथवा सौदी अरबची निवड न करता, बहुमताने चीनची निवड केली. म्हणजे, आता सौदीच्या ‘उम्मा’ आणि अमेरिकेच्या वरदहस्तावर पाकिस्तानींचा विश्वास नसून, केवळ चीनच्या पैशांवरच अधिक विश्वास असल्याचे स्पष्ट होते.
दुसरीकडे अमेरिकेबाबत सांगायचे झाल्यास, तेथील ४५ टक्के नागरिकांनी भारताला समर्थन दिले, तर ५० टक्के नागरिकांना भारत नापसंत. त्यामागचे कारणही साहजिकच. कारण, ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून एकूणच भारतीयांसह अमेरिकेत स्थायिक झालेल्या परदेशी नागरिकांविषयी स्थानिकांच्या मनात रोष वाढलेला दिसतो. कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्येही दिसून आले. परंतु, एकंदरीतच टक्केवारीवर नजर टाकली असता, आशिया, आफ्रिकेसह युरोपीय देशांमध्ये भारताची प्रतिमा ही तुलनेने अधिक सकारात्मक दिसते; तर तुर्कीयेसह द. अमेरिकी देशांमध्ये भारताबद्दल फारशी सकारात्मकता आढळून येत नाही.
मुळात यांसारखी सर्वेक्षणे त्या-त्या देशातील नागरिकांना भारताविषयी काय वाटते, याविषयी मतप्रदर्शन करतात. बहुतांशी वेळा दोन देशांमधील राजनयिक संबंध नागरिकांच्या मतप्रदर्शनामध्येही प्रतिबिंबित होतात. जसे की, पाकिस्तान आणि तुर्कीये या दोन्ही देशांतील सरकारांचे तसे भारताशी वितुष्टच. त्यामुळे या दोन्ही देशांतील नागरिकही भारताकडे त्याच चष्म्यातून पाहणे पसंत करतात, हे स्वाभाविकच. तसेच फ्रान्ससारख्या काही देशांत जिथे २०२३ साली भारताविषयीची सकारात्मकता ३९ टक्क्यांवर होती, ती यंदा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचलेली दिसते. त्यावरून भारत-फ्रान्सची संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार क्षेत्रातील भागीदारी ही अशाप्रकारे नागरीसंबंधांमध्येही परावर्तित झाल्याचे म्हणता येईल.
एकूणच, ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालाचा अन्वयार्थ लावला असता, भारताबद्दलची जागतिक प्रतिमा ही बहुतांशी सकारात्मक वाटते. त्याचे कारण म्हणजे, २०१४ पासून २०२६, या मागील १२ वर्षांच्या काळात मोदी सरकारने भारताची १८० अंशांच्या कोनात बदललेली परराष्ट्रनीती! मोदी सरकारने एकाच वेळी अमेरिकेसह रशियाशी मैत्रीसंबंधांचे संतुलन साधले. ‘ब्रिक्स’ असो अथवा ‘क्वाड’, भारत दोहोंच्या केंद्रस्थानी आहेच; तर दुसरीकडे युरोपला आरसा दाखवत, ‘हम किसीसे कम नही’ म्हणत भारताने ‘जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था’ म्हणून शर्यतीत आपला क्रमांक अव्वल ठेवला.
‘पूर्वेकडे बघा’ या रणनीतीअंतर्गत दक्षिण-पूर्व आशियाई देशांनाही भारताने समान सांस्कृतिक वारशाच्या धाग्याने एका माळेत गुंफले, तर ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज ठरलेला भारत आफ्रिकेला चीनपेक्षा आज अधिक विश्वासार्ह वाटतो. त्याचबरोबर यूएई असो अथवा सौदी अरब किंवा इराण, आखाती मुस्लीमबहुल देशांमध्येही भारताने आपल्या संबंधांना तैलमैत्रीच्या पलीकडे नेले. याचीच परिणती म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजवर ३५ देशांकडून प्राप्त झालेले सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि सन्मान. हे भारताच्या बदलत्या सामर्थ्याचेच द्योतक म्हणावे लागेल. ‘वसुधैव कुटुम्बकम्’चे संस्कार आणि विश्वबंधुत्वाच्या व्यापक नीतीचा पुरस्कार हेच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे गमक आहे आणि हेच सामर्थ्य ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या सर्वेक्षणातूनही ठळकपणे अधोरेखित झाल्याचे म्हणता येईल. म्हणूनच, भारतगौरव करणार्या अटलजींच्या खालील काव्यपंक्ती आवर्जून उद्धृत कराव्याशा वाटतात-
दीप बुझे पश्चिमी गगन के, व्याप्त हुआ बर्बर अँधियारा, किंतु चीर कर तम की छाती, चमका हिंदुस्थान हमारा|