मुंबई - मराठी रंगभूमीवर आशयपूर्ण आणि वेगळ्या धाटणीची कथा घेऊन ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कर्तव्य, प्रेम, मातीशी असलेलं नातं आणि माणुसकीच्या भावनेभोवती गुंफलेला हा नाट्यप्रवास प्रेक्षकांसमोर उलगडणार असून, २२ ऑगस्ट २०२६ रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे सायंकाळी ४ वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.(Marathi Natak)
नितीन वैद्य प्रॅाडक्शन्स निर्मित, मयूर सारकळे आणि अशुतोष पोपट जरे लिखित आणि अशुतोष पोपट जरे दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’मधून मानवी नात्यांमधील गुंतागुंत, भावभावना आणि जगण्याशी जोडलेले अनेक पदर रंगमंचावर पाहायला मिळणार आहेत. नाटकाचं कथानक पुढे सरकत असताना व्यक्तिरेखांचा प्रवास आणि त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंग प्रेक्षकांना या गोष्टीशी भावनिकरित्या जोडून ठेवतील. (Marathi Natak)
नाटकाच्या पोस्टर्समधूनही या कथेला एक वेगळीच आध्यात्मिक छटा मिळताना दिसते. विठ्ठलाच्या भव्य मूर्तींच्या सान्निध्यात उभं असलेलं मध्यवर्ती पात्र जणू विठुरायाच्या सावलीत आणि संरक्षणाखाली असल्याचा भास निर्माण करते. त्यामुळे ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’च्या प्रवासातील श्रद्धा, माती आणि माणुसकीचा संदर्भ अधिक गहिरा होतो.(Marathi Natak)
या नाटकात रोहित माने, योगेश चिकटगावकर, सानिका रेणुके, बिपिन घोबाळे, संजीवनी पाटील आणि अमोल ताटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या कलाकारांच्या अभिनयातून नाटकातील विविध व्यक्तिरेखा आणि त्यांचं भावविश्व रंगमंचावर साकारलं जाणार आहे. अभिनयासोबतच संगीत, नेपथ्य आणि प्रकाशयोजना नाटकाच्या वातावरणाला अधिक प्रभावी बनवणार आहेत.(Marathi Natak)
दिग्दर्शक अशुतोष पोपट जरे म्हणाले, “‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’च्या माध्यमातून प्रेक्षकांना या कथेतला प्रवास अनुभवायला द्यायचा आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वतःचा एक प्रवास आहे आणि तो रंगमंचावर प्रामाणिकपणे उभा करण्याचा आमचा प्रयत्न असेल. शुभारंभाच्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांना ही गोष्ट आपली वाटावी, अशी आमची इच्छा आहे.”
(Marathi Natak)
निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले, “‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’ची कथा आणि तिचं भावविश्व आम्हाला खूप जवळचं वाटलं. त्यामुळे ही कलाकृती प्रेक्षकांसमोर आणताना एक चांगली टीम एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तम कलाकार आणि तंत्रज्ञांच्या साथीने हे नाटक आकाराला येणार असून, प्रेक्षकांना एक मनाला भिडणारा रंगमंचीय अनुभव मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”(Marathi Natak)
डॉ. उमेश आजगावकर, नितीन प्रकाश वैद्य, सचिन सुभाष अवस्थी आणि स्वाती दिवे मुखर्जी निर्मित या नाटकाला अजित परब यांचं संगीत लाभलं असून योगेश चिकटगावकर यांचं अतिरिक्त संगीत आहे. नितीन नाईक हे या नाटकाचे निवेदक आहेत.(Marathi Natak)