"आम्ही पाकिस्तानात तीन-चार टक्के हिंदूंना सहन करतो,” असे म्हणणार्या पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना जावेद अख्तर यांनी ‘मिस्टर १० पर्सेंट’ म्हणत काल सणसणीत चपराक लगावली, ते चांगलेच झाले. कारण, पाकिस्तानातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवरील भीषण अत्याचार पाहता, झरदारींचा हा दावा म्हणजे त्यांच्या निर्लज्जपणाचा आणि ढोंगीपणाचा कळस!
पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दि. १४ ऑगस्ट रोजी राष्ट्राला उद्देशून भाषण करताना राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी त्यांच्या भारतद्वेषाचे आणि हिंदूविरोधी मानसिकतेचे पुन्हा एकदा उघडपणे प्रदर्शन केले. त्यांनी अत्यंत मग्रुरीने आणि उपकाराची भाषा वापरत म्हटले की, "आम्ही मुसलमान आहोत आणि आमची मानसिकता अशी आहे की, आम्ही पाकिस्तानातील तीन-चार टक्के हिंदू लोकसंख्येला सहन करतो. ते इथे स्वतंत्र आहेत आणि त्यांना भारतापेक्षा आमच्यासोबत राहायला जास्त आवडते.” त्यांनी उधळलेल्या या मुक्ताफळांवर प्रहार करताना ज्येष्ठ कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनीच झरदारींना त्यांची लायकी दाखवून दिली, ते बरे झाले. अख्तर यांनी समाजमाध्यमांवर सडेतोड उत्तर देताना लिहिले की, "बेनझीर भुट्टो यांच्याशी विवाह केल्यामुळे प्रकाशझोतात आलेले पाकिस्तानचे मिस्टर झरदारी म्हणतात की, ते त्यांच्या देशातील तीन-चार टक्के हिंदूंना सहन करतात. मला समजते मिस्टर झरदारी, दहा टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जगातील कोणत्याही गोष्टीबाबत तुम्ही नेहमीच असंवेदनशील राहिला आहात.” आता जावेद अख्तर यांचा हा टोला अत्यंत वर्मी लागणारा असाच. कारण, झरदारींना १९८० आणि १९९०च्या दशकात पाकिस्तानात ‘मिस्टर १० पर्सेंट’ म्हणून हिणवले जायचे. कारण, त्यांनी सरकारी प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी दहा टक्के कमिशन (लाच) घेतल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर होते. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना प्रदीर्घ काळ तुरुंगवासही भोगावा लागला. स्वतःच्या देशाची तिजोरी लुटून परदेशात अफाट संपत्ती गोळा करणारे हेच झरदारी आज अल्पसंख्याकांच्या हक्कांबद्दल आणि देशाच्या महानतेबद्दल बोलतात, तेव्हा तो एका ढोंगीपणाचा आणि निर्लज्जपणाचा कळस ठरतो. जावेद अख्तर यांनी याच टोपणनावाचा चपखल वापर करत पाकच्या या निखालस खोट्या दाव्याची लक्तरे वेशीवर टांगली, त्याबद्दल जावेदमियाँचेही खरे तर कौतुकच.
मुळात ‘आम्ही हिंदूंना सहन करतो,’ हा झरदारींचा शब्दप्रयोगच पाकची अल्पसंख्याकांबद्दलची विखारी आणि दुय्यम मानसिकता उघड करणारा ठरला. एखादा लोकशाही आणि सुसंस्कृत सभ्य देश आपल्याच नागरिकांना ‘सहन करतो’ की, त्यांना संविधानानुसार समान अधिकार देतो? हा कळीचा प्रश्न आहे. त्यातच झरदारी तीन ते चार टक्के हिंदूंचा दावा करत असले, तरी पाकिस्तानच्या २०२३च्या ताज्या जनगणनेनुसार तेथील हिंदूंची लोकसंख्या केवळ २.१७ टक्के इतकीच उरली आहे. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात (विशेषतः पश्चिम पाकिस्तानात) लक्षणीय प्रमाणावर असलेला हिंदू समाज आज तिथे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याचा अर्थ अत्यंत स्पष्ट आहे की, पाकिस्तानात हिंदूंची लोकसंख्या पद्धतशीरपणे आणि राज्यकर्त्यांच्या आशीर्वादानेच नष्ट केली जात आहे. विशेषतः ज्या सिंध प्रांतातून झरदारी येतात, त्याच प्रांतात हिंदू समाजाची अवस्था अत्यंत विदारक आहे. तिथे दररोज अल्पसंख्याक मुलींचे अपहरण केले जाते. कट्टरपंथी मौलवींच्या मदतीने त्यांचे सक्तीने धर्मांतर करून वयाने दुप्पट-तिप्पट असणार्या पुरुषांशी त्यांचे जबरदस्तीने विवाह लावून दिले जातात. न्यायालये आणि पोलीस प्रशासनही या धर्मांधांच्या दबावाखाली असल्याने पीडितांना कोणताही न्याय मिळत नाही. ईशनिंदेच्या खोट्या आरोपांखाली होणारी हत्या, हे तर पाकमधील हिंदूंचे भीषण वास्तव. तिथला हिंदू समाज रोज या भीतीच्या सावटाखाली जगत असताना, तो भारतापेक्षा तिथे सुखी असल्याचा झरदारींनी केलेला दावा, हा या शतकातील सर्वांत क्रूर विनोद ठरावा.
पाकिस्तानात हिंदूंइतकाच ख्रिश्चन आणि शीख समाजही तितकाच असुरक्षित. ‘ह्युमन राईट्स वॉच’ आणि ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’सारख्या मानवाधिकार संस्थांच्या अहवालानुसार, पाकिस्तानातील ईशनिंदा कायद्याचा गैरवापर करून धार्मिक अल्पसंख्याकांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते. किंबहुना, स्वतःला कट्टर इस्लामिक राष्ट्र म्हणवून घेणार्या या देशात ‘अहमदिया’ आणि ‘शिया’ मुस्लीमही सुरक्षित नाहीत. अहमदियांना तर तिथे मुस्लीम मानण्यासही घटनेने नकार दिला आहे. दुसरीकडे बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून जो नंगानाच सध्या सुरू आहे, त्यातून तिथला असंतोष उघडपणे समोर येत आहे. हिंदू, ख्रिश्चन, शीख अशा कोणत्याही अल्पसंख्याकाला पाकिस्तान आज राहण्यायोग्य वाटत नाही. म्हणूनच, शेजारील इस्लामिक देशांमध्ये अशा अमानुष धार्मिक छळाला बळी पडणार्या या अल्पसंख्याकांना हक्काचा आणि सन्मानाचा निवारा देण्यासाठी भारताने आणलेला ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा’ किती रास्त आहे आणि काळाची मोठी गरज आहे, हेच यावरून नव्याने सिद्ध होते.
खरं तर सर्वधर्मसमभाव आणि सहिष्णुता काय असते, हे पाकिस्तानने तरी भारताला शिकवण्याची मुळीच गरज आणि त्यांची पात्रताही नाही. भारत हा मुळातच हिंदूबहुल देश असल्यामुळेच इथे सर्व धर्म, पंथ आणि विशेषतः मुसलमान आज पूर्णपणे सुरक्षित आहेत. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान मूलभूत अधिकार दिले आहेत. पाकिस्तानात कधीही एखादा हिंदू किंवा ख्रिश्चन व्यक्ती पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकत नाही; तिथे केवळ मुस्लीम व्यक्तीच सर्वोच्च पदावर बसू शकते, अशी त्यांच्या संविधानाचीच अट. याउलट, भारतात मुस्लीम व्यक्ती देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदावर (उदा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. झाकीर हुसेन), सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदावर आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर अत्यंत सन्मानाने विराजमान होऊ शकतात. भारत हा देश अल्पसंख्याकांना ‘सहन’ करत नाही, तर तो ‘सहचर्या’वर ठाम विश्वास ठेवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्रादेखील हेच ध्वनित करणारा.
त्यामुळे मियाँ झरदारींनी पाकिस्तानच्या लोकसंख्येचे खोटे आकडे सांगण्यापूर्वी भारतातील मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर आणि भरभराटीवर नजर टाकणे गरजेचे आहे. १९५१च्या जनगणनेनुसार, भारतात मुस्लिमांची लोकसंख्या ९.४ टक्के होती, जी २०११च्या जनगणनेनुसार वाढून १४.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्याच्या अंदाजानुसार, ही लोकसंख्या सुमारे २० ते २१ कोटींच्या दरम्यान आहे. जनगणनेनंतर, ताजी आकडेवारी वाढलेल्या मुस्लीम समाजाचे चित्र दाखवणारी ठरेल. आज भारतात मुस्लीम समाज फक्त सुरक्षितच आहे असे नाही, तर तो अधिक स्वतंत्र, प्रगत आणि मुख्य प्रवाहाचा भागही आहे. त्यांच्यावर सक्तीच्या धर्मांतराचा कोणताही दबाव नाही, ना त्यांना ईशनिंदेच्या काळ्या कायद्याखाली त्यांना या भूमीवर ठार मारले जाते.
दोन्ही देशांच्या स्वातंत्र्याला आज ८० वर्षांचा काळ पूर्ण होत असताना, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या भारत कुठे आहे आणि पाकिस्तान कुठे आहे, हे वास्तव लपून राहिलेले नाही. भारत आज जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असून, जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारतात लोकशाही दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. दुसरीकडे पाकिस्तान हा दहशतवादाला पोसणारा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर कर्जासाठी कटोरे घेऊन उभे राहणारा आणि आर्थिक दिवाळखोरीत निघालेला एक अपयशी देश ठरला आहे. स्वतःच्या देशातील नागरिकांना साधे पीठ आणि वीज देऊ न शकणारे पाकिस्तानी नेते जेव्हा स्वतःचे अपयश लपवण्यासाठी भारतावर आणि इथल्या लोकसंख्येवर भाष्य करतात, तेव्हा त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचीच कीव येते. सैन्याच्या इशार्यावर नाचणार्यांकडून राष्ट्रहिताच्या भल्याची अपेक्षा नाहीच. त्यामुळे झरदारींनी हिंदू-मुस्लीम करण्यापेक्षा संपूर्ण मुलखाची चिंता करावी. कारण, पाकिस्तानचे तुकडे होतील, तो दिवस आता दूर नाही!