मुंबई : (Goregaon Mulund Link Road) मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पातील बोगदा खोदकामाला सोमवार, दि. १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली. गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगरदरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली अत्याधुनिक टनेल बोअरिंग मशीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ५.३० किलोमीटर लांबीचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या भव्य टीबीएम मशीनचे ‘तुळशी’ असे नामकरण करण्यात आले आहे.(Goregaon Mulund Link Road)
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा एकूण १२.२० किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून तो चार टप्प्यांत राबविण्यात येत आहे. प्रकल्पाच्या टप्पा ३ (ब) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन बोगदे बांधले जात आहेत. या बांधकामादरम्यान राष्ट्रीय उद्यानातील पर्यावरण आणि जैवविविधतेवर कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.(Goregaon Mulund Link Road)
या टप्प्यात १७ क्रॉस पॅसेज, ७२० मीटर लांबीचे दुहेरी पेटी बोगदे तसेच गोरेगाव आणि मुलुंड येथे प्रत्येकी मिळून ६०० मीटर लांबीचे पोहोच रस्ते उभारण्यात येणार आहेत. या टप्प्याची एकूण लांबी ६.६२ किलोमीटर असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षे त्याचे संचालन आणि देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराकडे राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आवश्यक वृक्षतोड परवानगीही मिळाली आहे.(Goregaon Mulund Link Road)
प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सुमारे ९०६ प्रकल्पग्रस्तांचे कांजूरमार्ग येथे तळमजला अधिक २३ मजली अशा सहा इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे.
या प्रकल्पाची सुमारे २१ टक्के भौतिक प्रगती झाली आहे. पहिल्या टीबीएमची जोडणी पूर्ण करून तिची स्थळ स्वीकृती चाचणीही यशस्वीरीत्या पार पडली आहे. दुसऱ्या टीबीएमची जोडणी सुरू असून, ऑक्टोबर २०२६ पासून त्याद्वारे बोगदा खोदकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.(Goregaon Mulund Link Road)
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता पूर्ण झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांच्यात थेट संपर्क निर्माण होणार आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांमधील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा कालावधी सुमारे ९० मिनिटांवरून २० मिनिटांपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. परिणामी वेळ आणि इंधनाची बचत होण्याबरोबरच आपत्कालीन सेवांचा प्रतिसाद वेळ कमी होईल. (Goregaon Mulund Link Road)
तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक वाहतुकीला गती मिळून मुंबईच्या विद्यमान रस्ते वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.(Goregaon Mulund Link Road)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.