देशासाठी आणि देशाच्या सैन्यासाठी...

    18-Aug-2026   



Dr Rishikesh Parmar
 
 
काश्मीर, नागालॅण्ड आणि मणिपूर येथील समाजबांधवांना देशनिष्ठ प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्य करणारे नाशिकचे डॉ. ऋषिकेश परमार. त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
 
देशद्रोही आहेस, सैन्यावर दगडफेक करणार्‍या त्या दहशतवादी पोरांवर कसले उपचार करतोस?” काही लोकांनी त्यांना धमकी दिली की, काश्मीरमध्ये जाऊन जे हे काम करतोस, ते थांबव. त्यावेळी डॉ. ऋषिकेश परमार म्हणाले, "त्या बालकांची माथी भडकवली जातात किंवा त्यांना आमिष दिले जाते. ते जर अपंग झाले, तर त्यांचा अपराध कुणी पाहणार नाही. उलट, भारताच्या कारवाईत ते अपंग झाले म्हणत, दहशतवादी आणखीन समाजात गैरसमज पसरवतील. दुसरीकडे दहशतवादी त्यांचा वापर करणार. दहशतवाद कसा संपेल? डॉ. ऋषिकेश यांची भूमिका समाजाला समजली. त्यानंतर समाजाने त्यांना सहकार्यच केले.
 
पुढे उपचार करून बर्‍या झालेल्या बालकांना सैन्याच्या मदतीने समुपदेशन उपचार करून काहींना शिक्षणाची, तर काहींना अर्थार्जनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. पुढे एक-दीड दशकानंतर ‘कलम ३७०’ हटवले गेले, तेव्हा काश्मीरमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यामध्ये कट्टर भारतीय म्हणून हेच ते काश्मिरी पुढे होते. डॉ. ऋषिकेश परमार यांच्या पुढाकारानेच आज काश्मीरच्या दोन तरुणी डॉक्टर आहेत, तर चारजणी विविध क्षेत्रांत उच्चपदस्थ अधिकारी आहेत.
 
साधारण २०१० साली अधिक कदम यांच्या प्रेरणेने डॉ. ऋषिकेश परमार यांना वाटले की, आपण काश्मीरमध्ये आरोग्य शिबीर भरवावे. या आरोग्य शिबिरामध्ये त्यावेळी आठवी-नववीला असणार्‍या त्या काश्मिरी किशोरी आल्या होत्या. त्यांनी डॉ. ऋषिकेश यांना विचारले की, "आम्हाला पण डॉक्टर होता येईल का?” या सहा मुलींचे पालक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले होते किंवा एकल मातेच्या त्या मुली होत्या. डॉ. ऋषिकेश यांनी त्यांच्या पालकांशी संपर्क, संवाद साधत त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्यांची नाशिकला स्वतःच्या घरी राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्या पत्नी वैशाली यांनी आईच्या मायेने मुलींची देखभाल केली, लक्ष दिले. आज त्या मुलींचे भविष्य उज्ज्वल झाले. त्या कट्टर भारतीय म्हणून काश्मीरमध्ये परतल्या आहेत.
 
देश आणि देशाच्या सैन्यासाठी मनात सर्वोच्च आदरभाव असणारे ऋषिकेश हे मूळचे नाशिकचेच. त्यांचे बाबा मोहन आणि आई मनोरमा हे दोघेही अत्यंत समाजशील आणि साधे राहणीमान असलेले दाम्पत्य. परमार कुटुंब हे संयुक्त कुटुंब. घरात एकच शिकवण दिली जाई की, आपल्यामुळे कुणाला त्रास होईल असे वागू नये आणि होता होईल तिथपर्यंत सगळ्यांना मदतीचा हात द्यावा. ऋषिकेश यांचे काका संघ स्वयंसेवक होते. समाजासाठी त्यांची असलेली तळमळ, त्यांची राष्ट्रनिष्ठा याचे संस्कार त्यांच्यावर झाले. त्यांनी ‘बीएएमएस’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर मुंबईच्या ‘टिस’मधून ‘मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ’ हे प्रशिक्षण घेतले. पुढे गोरगरीब जनतेला आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, म्हणून त्यांनी डॉ. राहुल शिंदे, डॉ. अजित बोरस्ते, डॉ. सुरज देशमुख, डॉ. सुदर्शन देशमुख, डॉ. कौस्तुभ यांच्या साथीने नाशिकमध्ये साईश्री हॉस्पिटल, तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटल उभे केले.
 
असो. एकदा ते काश्मीरला गेले असता, तिथे त्यांचा सैन्यातील ऑफिसर्सशी संपर्क आला. कश्मीरचे लोकजीवन त्यांनी जवळून पाहिले. काश्मीरमध्ये आपले सैन्य जीवाची बाजी लावून देशाचे आणि तिथल्या समाजाचे रक्षण करते. त्यांच्या कार्यात आपण खारीचा वाटा उचलायलाच हवा, असे ऋषिकेश यांना वाटले. त्यांनी पुढे काश्मीरमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. तिथे एका बालिकेचा अपघात झाला होता. तिला तातडीने उपचार मिळणे गरजेचे होते. त्यामुळे तिच्या पालकांसोबत ते तिला घेऊन रुग्णालयात निघाले. मात्र, बाहेर पडताच दिसले की, मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. जाळपोळ करत होते. कारण, दहशतवादी बुरहान वानी मेला होता. दहशतवाद्यांनी पैसे देऊन तिथल्या युवकांना दगडफेक-जाळपोळ करायला तयार केले होते. त्यातल्या एका गटाने ऋषिकेश यांची गाडी अडवली. त्यांना मारणार इतक्यात गाडीत बसलेली त्या मुलीची आई बाहेर आली. तिने सांगितले की, हा हिंदू भाई आपल्या लोकांसाठी काम करतो. मग त्यांच्या मधलाच एकजण पुढे आला. म्हणाला, "मी ‘आयआयटी रुरकी’मधून ‘एमटेक’ शिक्षण पूर्ण केले. तुम्ही चांगले काम करता.” या घटनेमुळे ऋषिकेश यांना वाटले की, दहशतवादी या तरुणांचा वापर करत आहेत, त्यांच्यात गैरसमज पसरवत आहेत. या तरुणाईसाठी काम करत राहायचे.
 
काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, काश्मिरी आपले बांधव आहेत, या भावाने देशासाठी आणि सैन्यासाठी ते काम करत राहिले. त्यांच्या पत्नीने वैशाली यांनी त्यांना सर्वच स्तरावर साथ दिली. मात्र, २०१५ साली एक दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाचा अपघात झाला, त्यातच त्याचे निधन झाले. परमार दाम्पत्याने निर्णय घेतला, मुलाचे डोळे दान करायचे. मुलाचा ‘रेटिना’ दान केल्यामुळे दोन बालकांना दृष्टी मिळाली. या घटनेमुळे डॉ. ऋषिकेश अवयवदान जागृती क्षेत्राकडे वळाले. देश, देशाचे सैनिक आणि समाज, यासाठी तळमळीने काम करणारे डॉ. ऋषिकेश म्हणतात, "मला देशासाठी, सैन्यासाठी काम करताना कधीच भीती वाटली नाही.”
 
दिल दिया हैं
जान भी देंगे ए वतन तेरे लिये!




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर