"जर ‘नीट’चा फुलफॉर्मही माहीत नसेल, तर आंदोलनात जाऊन आणि केवळ घोषणा देऊन काय उपयोग?” असा सवाल ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी मागे उपस्थित केला होता. त्यांच्या याच विधानावरुन समाजमाध्यमांसह काही मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही अत्यंत खालच्या भाषेत दामले यांच्यावर तोंडसुख घेतले. याविषयी एक सणसणीत लेख लिहून लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अभिराम भडकमकर यांनी ट्रोलर्सचा खरपूस समाचारही घेतला होता. त्यानिमित्ताने प्रशांत दामले यांच्यावर इतया वाईट पद्धतीने टीका करणे योग्य आहे का? दामले खरंच काही चुकीचे बोलले का? राजकीय भूमिका घेतल्यावर कलाकारांना का लक्ष्य केले जाते? यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर परखडपणे भूमिका मांडणार्या अभिराम भडकमकर यांच्याशी साधलेला हा संवाद...
जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत प्रशांत दामले यांनी जी भूमिका मांडली, वक्तव्य केले, त्यावरुन मागे प्रचंड गदारोळ झाला. तेव्हा, प्रशांत दामले यांचे खरंच काही चुकले असे तुम्हाला वाटते का?
हो, मला असे वाटते, ते अभिव्यक्ती करताना चुकले. त्यांचे कदाचित शब्द, वायरचना आणि बोलण्याची पद्धत चुकली; पण त्यांना जो मुद्दा मांडायचा होता, तो योग्यच होता. आंदोलनात अजेंडा असलेले लोक शिरले होते, हे त्यांचे मत योग्य होते. मला अजूनही वाटते, जर ते आंदोलन ‘जेन-झी’चेच आणि त्यांच्या प्रश्नांभोवतीच केंद्रित राहिले असते, तर या आंदोलनाने इतिहास घडवला असता.
मग कलाकारांनी कुठलीही भूमिका घेणे हेच मुळी चुकीचे म्हणायचे का?
मुळात कलावंतांनी आपले मत व्यक्त करावे का? राजकीय भूमिका घ्यावी का? २०१४ मध्ये या सगळ्या संदर्भांमध्ये चर्चेला सुरुवात झाली. तत्पूर्वी आपण जर अगदी इतिहासात डोकावले तरी मला असे वाटते की, कलावंतांची भूमिका काय आहे किंवा कलावंतांचे नेमके मत काय आहे, याबद्दल समाजमनामध्ये पूर्णपणे एकस्पष्टता होती. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी स्वातंत्र्यलढा सुरू असताना, सामाजिक चळवळी ऐन भरात चालू असतानासुद्धा ‘केशवराव भोसले रंगमंदिर’ बांधले आणि त्याच्याबरोबर कुस्त्यांचे खासबाग मैदानही कोल्हापूरला बांधले. याचे कारण असे की, समाज हा चहूअंगांनी फुलला पाहिजे; तरच देश किंवा राष्ट्र पुढे जाऊ शकते. २०१४ नंतर काय व्हायला लागले की, सत्ताबदल झाला आणि हा सत्ताबदल खरेतर आपल्या देशामध्ये लोकशाहीमार्गाने अनेकदा झालेला आहे. परंतु, यावेळचा सत्ताबदल हा अनेकांनी इतका मनाला लावून घेतला की, ‘ताबडतोब सत्तांतर झाले पाहिजे’ या ईर्षेने पेटून काही कामे सुरू झाली आणि तीही योग्य आहेत. लोकशाहीमध्ये याला काही चुकीचे मानायचे कारण नाही. पण, मग प्रत्येक समाजातल्या घटकांनी बाकी सगळी कामे बाजूला ठेवून केवळ या एका सत्तांतराच्या मागे लागले पाहिजे, अशा पद्धतीचा एक दबाव सुरू झाला आणि त्यातून ‘भूमिका घ्या, भूमिका घ्या’ असे सुरू झाले. महेश कोठारेंनी एक भूमिका घेतली, ती सरकारच्या बाजूची होती. लगेच त्यांना ‘पद्मश्री’ पाहिजे, अशी टीका त्यांच्यावर सुरू झाली. निवेदिता जोशींनी भूमिका घेतली, त्यांना ट्रोल करायला सुरुवात झाली.
आजच्या काळात समाजमाध्यमांचा प्रभाव इतका वाढला आहे की, समोरच्याचे कर्तृत्व, त्या क्षेत्रातील उंची असे काहीही न बघता अत्यंत वाईट पद्धतीने ट्रोलिंग केले जाते. याविषयी काय सांगाल?
प्रशांत दामलेंनी ‘कोविड’च्या काळात एक ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुप केला होता. त्या माध्यमातून असंख्य पडद्यामागील कलाकारांचे घर त्यांनी चालवले. अश्विनी भावे यांनीही २५ लाखांची मदत केली होती. दामलेंनी तर दिवसरात्र फक्त याच माणसांचा विचार केला. पण, आपण हे सगळे विसरून एका वक्तव्यावरून त्यांना ट्रोल करणे हे कितपत योग्य आहे? हे जे ध्रुवीकरण सध्या झालेले आहे की, ‘तू या बाजूचा आहेस की, त्या बाजूचा आहेस’ हे अतिशय चुकीचे आहे, याला कलावंत बळी पडतात.
तुम्हाला असे वाटते का की, केवळ राष्ट्रहिताच्या बाजूने बोलणार्या कलाकारांनाच ट्रोल केले जाते?
कसे आहे, आपल्या एकूण वैचारिक विश्वामध्ये एक प्रवाह असा मांडला गेलाय की, पत्रकार, लेखक, कलावंत, विचारवंत यांनी कायम व्यवस्थेच्या विरुद्धच असले पाहिजे. ‘व्यवस्थेच्या विरुद्ध’ असणे म्हणजे काय? तर व्यवस्थेवरती टीका करणे! समजा, एखादा कलावंत जर सरकारच्या बाजूने बोलायला लागला, तर लगेच तो व्यवस्थेविरुद्ध बोलत नाही, असा अर्थ लोक घेतात. लगेच याला ‘पद्मश्री’ पाहिजे असेल, असाही सूर निघतो. मग मीपण माझ्या मित्रांना विचारतो की, ठीक आहे. आता जे लोक सरकारचे कौतुक करताहेत, त्यांना ‘पद्मश्री’ हवी आहे ना? मग आता जे सरकारचा विरोध करताहेत आणि ज्यांना मागच्या सरकारकडून ‘पद्मश्री’ मिळालेला आहे याचा अर्थ, ते त्यावेळेचे कर्ज फेडताहेत असा घेऊया का? आपण या देशाच्या ‘पद्म’ पुरस्कारांचा अपमान करत आहोत, असे आपल्याला वाटत नाही का? तर, अशी सगळ्या बाजूने कलाकारांची गोची होते.
दिल्लीमधील जंतरमंतरवरील आंदोलनात ‘जेन-झी’ची दिशाभूल करण्यात आली, असे तुम्हाला वाटते का?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘जेन-झी’ची माथी हे लोक भडकवणारच! कारण, ही पिढी लगेच उत्स्फूर्त प्रतिक्रिया देते. आपण आता ज्याला ‘जेन-झी’ म्हणतो, त्याला आधी आणीबाणीच्या काळामध्ये ‘तरुण तुर्क’ किंवा ‘तरुणाई’ म्हणत होते. त्यामुळे ‘तरुणाई’ म्हटले म्हणजे, ती उत्स्फूर्त असणारच! ‘नीट’चा जो प्रश्न होता, तो खरोखरच जिव्हाळ्याचा होता. पण, आंदोलन भरकटवले गेले. जर हे आंदोलन पूर्णपणे ‘जेन-झी’च्याच हातात राहिले असते, तर त्या आंदोलनाला एक वेगळी आणि चांगली दिशा मिळाली असती. पण, नंतर आंदोलनाला वेगळी दिशा मिळाली. ‘जेएनयू’च्या कोणीतरी बाई आहेत, त्यांनी तिथे येऊन ‘बस नाम रहेगा अल्ला का?’ हे गाणे गायला सुरुवात केली. मग तुम्ही हातामध्ये संविधान घेऊन ‘बस नाम रहेगा अल्ला का’
हे गाणेच कसे गाऊ शकता? मग आमच्या गौतम बुद्धांचे काय? महावीरांचे काय? आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईचे काय? आमच्या म्हसोबाचे काय? गणपतीचे काय? मरीआईचे काय? या देशामध्ये केवळ एकच देव आणि एकच धर्म असे असू शकत नाही, असे मानणारी आजूबाजूची कम्युनिस्ट मंडळी जर त्याठिकाणी उभी होती, तर त्यांनी त्या बाईंना अडवले का नाही? हे सगळे केवळ मोदीविरोधी अजेंडा घेऊन चालणारे लोक आहेत.
बरेच जण ‘व्ह्युज’ आणि ‘लाईस’साठीच ‘जेन-झी’च्या आंदोलनात सहभागी झाले होते का? आणि दुसरे या आंदोलकांनी पोलीस आणि सैन्यदलाचाही अपमान करणे चुकीचे नाही का?
एक सांगू का, त्यांनी तिथे जाऊन कितीही ‘लाईस’ मिळवले असले आणि एका कट्टर गटामध्ये प्रचंड टाळ्या मिळवल्या असल्या, तरी समाजाच्या सुप्त मनामध्ये हे कधीही आवडत नाही. आपल्या जवानांबद्दल बोललेले लोकांना आवडत नाही. स्त्रियांबद्दल अशा पद्धतीने बोललेले आवडत नाही आणि त्यामुळे मला असे वाटते की, समाजमाध्यमांवर कितीही धुरळा यांनी उडवला असला, तरी सामान्य माणसांनी हे चुकीचे झाल्याची नोंद घेतली आहे.