‘विकसित भारता’चा ‘सप्तधारा’ मंत्र

    17-Aug-2026
 
Viksit Bharat 2047
 
स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारता’साठी सप्तधारा मंत्र देत, देशाच्या प्रगतीचा नवा रोडमॅप मांडला. उत्पादन क्षेत्रापासून ते ‘सॉफ्ट पॉवर’पर्यंतच्या विकासाची ग्वाही देतानाच, ‘दिमागी नक्षल्यां’वर केलेल्या प्रहाराने काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टमच्या वर्मी अचूक घाव बसला आहे.
 
यंदाच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून सलग १३वी वेळ देशाला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या योजनांचा पाढा वाचण्याबरोरच, २०४७च्या विकसित भारताचे एक अत्यंत स्पष्ट, व्यापक आणि महत्त्वाकांक्षी चित्र देशवासीयांसमोर उभे केले. देशाच्या अमृतकाळातून वाटचाल करताना, भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधानांनी ‘सप्तधारा’ म्हणजेच विकासाच्या सात प्रमुख प्रवाहांचा महामंत्रच दिला. हा एक देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि समाजकारणाला एका नव्या उंचीवर नेण्याचा सुनियोजित आराखडा आहे. यात उत्पादन, कृषी आणि अन्नप्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवकल्पना, पायाभूत सुविधा, संरक्षण, हरित आणि नील अर्थव्यवस्था आणि भारताची सॉफ्टपॉवर या सात क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. आजवर भारत जगातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जाई, तथापि, आता भारताने जगाचे ‘मॅन्युफॅचरिंग हब’ बनले पाहिजे, हा मोदींचा आत्मविश्वास देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी झेप घेण्यासाठी प्रेरित करणाराच आहे.
 
भारताच्या या ‘सप्तधारा’ मंत्रामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासावर दिलेला भर अत्यंत कळीचा असून, रस्ते, रेल्वे आणि विमानतळांचे आधुनिक जाळे शहरांबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही थेट जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचे काम करत आहे. याशिवाय, हरित आणि नील अर्थव्यवस्था हे भारताचे भविष्यातील ‘ट्रम्प कार्ड’ असतील. हवामानबदलाच्या जागतिक संकटात भारत सौरऊर्जा आणि ‘हायड्रोजन मिशन’च्या माध्यमातून, जागतिक स्तरावर नेतृत्व करत असल्याचेही पुन्हा अधोरेखित मोदींच्या भाषणातून झाले. या ऐतिहासिक भाषणातील सर्वांत क्रांतिकारक आणि थेट सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारी घोषणा कोणती असेल, तर ती म्हणजे, देशातील सर्व स्पर्धा-परीक्षांचे कोचिंग, डिजिटल माध्यमातून पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा संकल्प!
 
आजकाल स्पर्धा-परीक्षांच्या ‘कोचिंग लासेस’चे जे बाजारीकरण झाले आहे, त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांची मोठीच आर्थिक कोंडी होते. लाखो रुपये ‘फी’ भरण्याची क्षमता नसल्याने, गुणवत्ता असूनही अनेक तरुण मागे पडतात. पंतप्रधानांच्या या एका घोषणेमुळे, खेड्यापाड्यातील आणि तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासाची समान संधी मिळणार आहे. यासोबतच, भारताला जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी, आगामी वर्षात एक कोटी तरुणांना ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’चेही प्रशिक्षण दिले जाईल. पंतप्रधानांची ही महत्त्वपूर्ण घोषणा देशाच्या युवाशक्तीला भविष्यातील रोजगारांसाठी सक्षम करणारी आहे. ‘एआय’चे प्रशिक्षण देण्याची घोषणा भारताच्या ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’चा पुरेपूर वापर करण्याचीच रणनीती आहे. आजचे तंत्रज्ञान उद्याचे जग नियंत्रित करणार असून, यामध्ये भारतीय तरुण ग्राहक न राहता, ते निर्माते आणि रोजगारदाते बनावेत, हाच यामागील मुख्य उद्देश.
 
भौतिक विकासासोबतच पंतप्रधानांनी भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’वरही यात मार्मिक भाष्य केले. योग आणि आयुर्वेद यांच्या माध्यमातून, भारताने जगात सांस्कृतिक ओळख आधीच निर्माण केली आहे. पण बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान, चित्रपट, अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग उद्योगातही, भारतीय तरुणांनी जगावर राज्य करावे, अशीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, विकासाच्या या गरुडझेपेसोबतच पंतप्रधानांनी देशासमोरील एका अत्यंत गंभीर आणि छुप्या संकटाकडे लक्ष वेधले, ज्याची चर्चा आजवर एवढ्या स्पष्टपणे कधीच झाली नव्हती. ते संकट म्हणजे ‘दिमागी नक्षलवाद!’ जंगलात राहून बंदुकीच्या जोरावर हिंसाचार करणार्‍या नक्षलवाद्यांपेक्षा, हे विद्वत्तेचा झगा घालून फिरणारे ‘दिमागी नक्षली’ देशासाठी अधिक घातक आहेत. विद्वत्तेचा झगा अंगावर चढविला म्हणून, राष्ट्रविघातक विचार राष्ट्रहितकारी होत नाही. ज्या बुद्धीला राष्ट्राचे अस्तित्वच अन्याय वाटते, त्या बुद्धीचे पांडित्य राष्ट्रासाठी संकट आहे. म्हणून पंतप्रधानांनी या अदृश्य शत्रूकडे देशाचे लक्ष वेधले आहे. हे ‘दिमागी नक्षल’ विकासाच्या प्रत्येक प्रकल्पाला जाणीवपूर्वक विरोध करतात. कधी पर्यावरणाच्या बेगडी प्रेमाखाली, तर कधी मानवाधिकारांच्या नावाखाली सर्वसामान्यांची दिशाभूल करून विकासाची गती रोखणे, हेच त्यांचे अंतिम ध्येय असते.
 
विदेशी निधीवर पोसल्या जाणार्‍या इकोसिस्टमच्या माध्यमातून हा भारतविरोधी अजेंडा राबवला जातो. पंतप्रधानांनी अत्यंत कठोर शब्दांत या प्रवृत्तींवरच प्रहार करत, या नक्षल्यांना ओळखून त्यांना समाजातून वेगळे करण्याचे स्पष्ट संकेत दिले. पंतप्रधानांनी ‘दिमागी नक्षल’ हा शब्द उच्चारताच सर्वांत जास्त मिरच्या कोणाला झोंबल्या असतील, तर त्या काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या इकोसिस्टमला! कारण, आजकाल काँग्रेसचे राजकारण याच अराजकतावादी विचारसरणीच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालले आहे. त्यामुळेच मोदींच्या प्रहाराने त्यांना घाम फुटला आहे. ‘दिमागी नक्षल’ हा शब्द जणू आपल्याच जिव्हारी लागल्यासारखी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते देत आहेत.
 
पंतप्रधान मोदींचे स्वातंत्र्य दिनाचे हे भाषण भारताच्या विकासाला सुनिश्चित दिशा देणारा कालबद्ध कार्यक्रम ठरला आहे. यात एकीकडे ‘सप्तधारा’ मंत्रातून तरुणांच्या हाताला काम, शिक्षणाची समान संधी आणि देशाला जागतिक महासत्ता बनवण्याचा स्पष्ट आराखडा, तर दुसरीकडे देशाच्या मुळावर उठणार्‍या नक्षली आणि अराजकवादी विचारसरणीला दिलेले आव्हान, असा हा दुहेरी प्रहार आहे. २०४७ सालापर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे ध्येय सर्व देशवासीयांच्या सामूहिक प्रयत्नांतूनच साध्य होणार आहे. विकासाच्या आड येणार्‍या या दिमागी नक्षलांना वेळीच ओळखून, त्यांना मूठमाती देणे नितांत गरजेचे आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात नकारात्मकतेचे ओझे झुगारून, प्रत्येक नागरिकाने देशाला जागतिक महासत्ता बनवण्याच्या या ‘सप्तधारा’ प्रवाहात सक्रिय योगदान देणे, हेच पंतप्रधानांच्या या ऐतिहासिक भाषणाचे खरे फलित ठरेल!




संबंधित मजकूर