मुंबई : (UGC NET Question Paper Errors) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) जून २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या युजिसी एनइटी परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन विषयांच्या पुनर्परीक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये तथ्यात्मक, मुद्रणविषयक, भाषांतरासंबंधी तसेच भाषिक स्वरूपाच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अशा स्वरूपाच्या चुका आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असून, त्यामुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या गुणवत्ता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अभाविपने यापूर्वीच तात्पुरती उत्तरतालिका जाहीर करण्यास झालेल्या विलंबाचा मुद्दा उपस्थित करत युजिसी सचिवांकडे निवेदनाद्वारे ती तातडीने जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर त्रुटी आढळून येणे ही बाब अधिकच चिंताजनक आहे.
प्रश्नपत्रिका तयार करताना, तज्ज्ञांकडून परीक्षण करताना तसेच अंतिम गुणवत्ता तपासणीच्या प्रक्रियेत या त्रुटी वेळेत का निदर्शनास आल्या नाहीत, याचे स्पष्ट उत्तर एनटीएने विद्यार्थ्यांना आणि देशासमोर द्यावे.
विद्यार्थ्यांना आधी परीक्षा द्यावी लागली, त्यानंतर निकालाची प्रतीक्षा करावी लागली आणि आता पुन्हा पुनर्परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. एनटीए च्या व्यवस्थात्मक त्रुटींचा भार विद्यार्थ्यांनी का सहन करावा? पुनर्परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा मौल्यवान वेळ, आर्थिक संसाधने आणि शैक्षणिक नियोजन यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. (UGC NET Question Paper Errors)
अनेक विद्यार्थ्यांना दूरच्या परीक्षा केंद्रांवर पुन्हा प्रवास करावा लागणार असून, त्यातून त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण होणार आहे. या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये असंतोष तसेच परीक्षा व्यवस्थेबाबतचा अविश्वास वाढत आहे, असे अभाविपचे म्हणणे आहे. (UGC NET Question Paper Errors)
पुढे त्यांनी म्हटले की, केवळ पुनर्परीक्षा घेऊन एनटीएची जबाबदारी संपत नाही. स्वतःच्या व्यवस्थात्मक त्रुटींमुळे पुनर्परीक्षा द्यावी लागणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त त्रास होणार नाही, याची पूर्ण जबाबदारी एनटीएने स्वीकारली पाहिजे. पुनर्परीक्षेसाठी योग्य आणि विद्यार्थ्यांना सुलभ अशी परीक्षा केंद्रे उपलब्ध करून देण्याबरोबरच, आवश्यकतेनुसार त्यांच्या प्रवासाची आणि इतर मूलभूत व्यवस्थांची योग्य तरतूद एनटीएने सुनिश्चित करावी.
प्रश्नपत्रिका तयार करणे, विषयतज्ज्ञांकडून परीक्षण, भाषांतर, प्रूफरीडिंग आणि अंतिम गुणवत्ता तपासणी या प्रत्येक टप्प्यावर कठोर आणि पारदर्शक प्रक्रिया असणे आवश्यक आहे. एका टप्प्यावर झालेली चूक पुढील टप्प्यांमध्येही निदर्शनास न येणे ही केवळ वैयक्तिक चूक नसून परीक्षा व्यवस्थेतील संस्थात्मक त्रुटीचे लक्षण आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून त्रुटींसाठी जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा चुका पुन्हा होणार नाहीत, यासाठी ठोस सुधारणा कराव्यात. (UGC NET Question Paper Errors)
परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्यासाठी अभाविप देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि इतर संबंधित घटकांकडून सूचना घेत आहे. या अनुषंगाने चंदीगड, दिल्ली आणि पाटणा येथे बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांमधून प्राप्त होणाऱ्या सूचना परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीसमोर मांडण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित कोणत्याही प्रश्नावर अभाविप ठामपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवेल. (UGC NET Question Paper Errors)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले, “युजिसी एनइटी सारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकांमध्ये अशा गंभीर त्रुटी आढळणे अत्यंत चिंताजनक आहे. एनटीएच्या व्यवस्थात्मक त्रुटींचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या वेळेवर, आर्थिक संसाधनांवर आणि शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. विद्यार्थ्यांनी एनटीएच्या चुकीची किंमत का मोजावी? एनटीएने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणे तातडीने थांबवावे. स्वतःच्या चुकीमुळे पुनर्परीक्षा द्यावी लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा केंद्रांची योग्य व्यवस्था करणे पुरेसे नाही. (UGC NET Question Paper Errors)
विद्यार्थ्यांना अनावश्यक आर्थिक आणि मानसिक त्रास होणार नाही, याची जबाबदारी एनटीएने घेतली पाहिजे. योग्य आणि सुलभ परीक्षा केंद्रांसोबतच विद्यार्थ्यांच्या प्रवासाचीही आवश्यक व्यवस्था एनटीएने सुनिश्चित करावी. प्रश्नपत्रिका तयार करणे, तज्ज्ञांकडून परीक्षण, भाषांतर, प्रूफरीडिंग आणि अंतिम गुणवत्ता तपासणी या संपूर्ण प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करून अशा चुका पुन्हा होणार नाहीत, याची एनटीएने खात्री करावी. या प्रक्रियेत स्पष्ट जबाबदारी निश्चित करणेही तितकेच आवश्यक आहे. (UGC NET Question Paper Errors)
विद्यार्थ्यांच्या समस्या वेळेत सोडविल्या गेल्या नाहीत आणि परीक्षा व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्यात आल्या नाहीत, तर अभाविप देशभरातील विद्यार्थ्यांसोबत हा मुद्दा अधिक तीव्रतेने मांडेल. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांचे निराकरण होईपर्यंत आणि विश्वासार्ह, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण परीक्षा व्यवस्था सुनिश्चित होईपर्यंत अभाविप आपला संघर्ष सुरू ठेवण्यास कटिबद्ध आहे.” (UGC NET Question Paper Errors)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक