मुंबई : (Swaratarangini Rashtra Sevika Samiti) राष्ट्र सेविका समितिच्या ९० वर्षपूर्तीचे औचित्य साधून संपूर्ण कोकण प्रांतामधून घोषवादन विशेष "स्वरतरंगिणी" या कार्यक्रमाचे रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोकण प्रांतात समाविष्ट गोव्यापासून ते डहाणूपर्यंत एकूण नऊ जिल्हे व एक महानगरातून शृंखला पद्धतीने घोषवादन करण्यात आले.
याप्रसंगी कोकण प्रांत कार्यवाहिका पद्मश्री फाटक यांची मुंबई येथील कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. तसेच, प्रांत सहकार्यवाहिका पद्मजा अभ्यंकर या वसईत व प्रांत सहकार्यवाहिका उमा दांडेकर या दक्षिण रत्नागिरी येथील कार्यक्रमांना उपस्थित होत्या.
त्याचबरोबर रूपा रावल (अखिल भारतीय सहप्रमुख, प्रचार विभाग) पार्ले येथे, क्षेत्रकार्यवाहिका सुनंदाताई जोशी ठाणे महानगर येथे आणि क्षेत्र सहकार्यवाहिका सुनंदाताई देवस्थळी यांची डोंबिवली येथे विशेष उपस्थिती होती.
त्याशिवाय प्रांतातील इतर अधिकारी वर्ग अन्य ठिकाणच्या कार्यक्रमांना उपस्थित होत्या. आंजर्ले या वं. ताई आपटे यांच्या जन्मस्थानी वादनाची सुरुवात झाली व मुंबईत झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शब्दबद्ध केलेल्या 'जयोsस्तुते' या गीताने शेवट झाला. संपूर्ण प्रांतात मिळून जवळपास ५५० वादिकांनी घोषवादनात सहभाग घेतला होता. ज्यात ४ वर्षाच्या बालसेविकेपासून ते ७१ वर्षांच्या सेविकेपर्यंत सर्व वयोगटाच्या सेविकांनी वादन केले.(Swaratarangini Rashtra Sevika Samiti)
राष्ट्र सर्वोपरि हा भाव समाजात रुजवण्यासाठी सक्षम मातृत्व महत्वाचे. तोच उद्देश घेऊन विकसित भारताच्या वाटचालीस पूरक मातृशक्ती जागृत व संघटीत करण्याचे काम राष्ट्र सेविका समिति गत नव्वद वर्षांपासून करत आहे. सेवा, संस्कार, 'स्वत्व'जागरण या आधारे महिलांमध्ये कार्यरत अखिल भारतीयच नव्हे तर अन्य देशातही सक्षमतेने उभे असलेले हे सांस्कृतिक महिला संघटन आहे. (Swaratarangini Rashtra Sevika Samiti)
प्रांताचे मुख्य कार्यालय असलेल्या ठाणे येथील राजमाता जिजाबाई ट्रस्टतर्फे अनेक महिलापयोगी उपक्रम चालतात, ज्यामध्ये आर्थिक सक्षमीकरणासाठी मसाल्याचे पदार्थ, पीठे, पापड यांची विक्री; तसेच पौरोहित्याचे वर्ग ई. गोष्टींचा समावेश आहे. समितिच्या अनेक प्रतिष्ठानांमार्फत मुलींसाठी वसतिगृहे, शैक्षणिक संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.(Swaratarangini Rashtra Sevika Samiti)
यंदाचे नव्वदावे वर्ष नियमित कामाचा भाग असणाऱ्या "घोष" या विषयाला समर्पित आहे. सांघिकता, समरसता आणि शिस्तपालन यांचा ताल-लयबद्ध मेळ हे घोषवादनाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय शास्त्रीय संगीत व राष्ट्रभक्तीच्या सुरावटींवर आधारित रचनांचे उत्साहपूर्ण वादन सेविकांसहित उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करते. यावेळी, विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण "समिति संवाद- कोकण प्रांत" या प्रांताच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात आले. https://www.facebook.com/share/1BghJjMeWJ/ या लिंकवर भेट देऊन वाचकांना हा कार्यक्रम पाहता येईल.(Swaratarangini Rashtra Sevika Samiti)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक