खारफुटीतला अदृश्य जीव

    17-Aug-2026

Smooth-Coated Otter Maharashtra
 
 
खारफुटीच्या गुंतागुंतीच्या मुळांमध्ये, चिखलाच्या वाटांवर आणि भरती-ओहोटीच्या लयीत एक अदृश्य जग सतत धावत असते. या जगाचा एक चपळ आणि महत्त्वाचा घटक म्हणजे, ‘स्मूथ-कोटेड ऑटर.’ खारफुटीची फुले, फळे, गळणारी पाने, मासे-खेकड्यांची हालचाल आणि ऋतूंचे बदल यांच्याशी त्याचे जीवन अतूटपणे जोडलेले आहे. त्याविषयीचा आढावा घेणारा लेख...
 
त सकाळची वेळ. काळिंजेच्या खारफुटीच्या जंगलात भरतीचे पाणी ओसरत असताना तीवर (Avicennia marina) आणि कांदळ (Rhizophora mucronata) झाडांची गुंतागुंतीची मुळे हळूहळू उघडी पडतात. तेवढ्यात या झाडांच्या मुळाशी काहीतरी हालचाल जाणवते. एक गुळगुळीत, काळसर आकृती पाण्यातून बाहेर येते आणि दाट पर्णसंभाराच्या सावलीतील चिखलाच्या किनार्‍यावर चढते. हा प्राणी असतो, ‘स्मूथ-कोटेड ऑटर’ (Smooth-coated Otter – Lutrogale perspicillata). खारफुटीच्या मुळांमध्ये लपलेल्या आपल्या बिळातून तो बाहेर येतो आणि आपले भक्ष्य शोधण्यास सुरुवात करतो. हे बीळ त्याला भक्षकांपासून आणि उन्हाच्या कडक झळांपासून सुरक्षित ठेवते.
 
मला आंजर्ले येथील जोग नदीच्या काठावर घालवलेला तो काळ आठवतो. ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसाइटी-इंडिया’च्या (डब्ल्यूसीटी) सागरी संशोधकांसोबत सागरी सस्तन प्राण्यांच्या किनारी आणि बोटीद्वारे केलेल्या सर्वेक्षणादरम्यान मी तिथे होतो. भरती ओसरली होती आणि तिथेच एका खारफुटीच्या पट्ट्यात लपलेले ऑटरचे बीळ आमच्या नजरेस पडले. झाडांच्या मुळांनी त्याच्यासाठी जणू नैसर्गिक किल्लाच तयार केला होता. आम्ही त्याठिकाणी शांतपणे निरीक्षण करत राहिलो. जवळच्या ताज्या विष्ठेच्या खुणा (spraints), पाण्याकडे जाणारी वारंवार वापरली गेलेली वाट आणि इतर चिन्हे नोंदवत होतो. तो एक छोटासा क्षण होता, पण माझ्या मनात कायमचा ठसला. या प्राण्यांचे जीवन आपल्या आसपासच सुरू आहे. फक्त आपण थांबून, शांतपणे आणि बारकाईने पाहण्याची गरज आहे, याची जाणीव त्या क्षणाने करून दिली.
 
खारफुटीची जंगले ना पूर्णपणे जमीन आहेत, ना पूर्णपणे समुद्र. ती निसर्गाने निर्माण केलेली एक जिवंत पूलव्यवस्था आहे. अशी परिसंस्था, जिथे खार्‍या पाण्यातही झाडांनी जगण्यासाठी स्वतःमध्ये विलक्षण बदल घडवून आणले आहेत. विशेष प्रकारच्या मुळांच्या साहाय्याने ही झाडे श्वसन करतात आणि त्यांचे संपूर्ण जीवन भरती-ओहोटीच्या लयीनुसार चालते. महाराष्ट्रात अशी खारफुटीची जंगले त्या नदीमुखांवर पसरलेली आहेत, जिथे सावित्री, जोग यांसारख्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात.
‘डब्ल्यूसीटी’च्या टीमसोबत काम करताना आम्ही आंजर्लेला अनेक वेळा आणि काळिंजेला एकदा भेट दिली. प्रत्येक भेटीत केवळ ऑटरविषयीच नव्हे, तर त्यांच्या अधिवासाच्या आसपास राहणार्‍या लोकांविषयीही काहीतरी नवीन शिकायला मिळाले.
 
काळिंजेमध्ये आम्ही खरोखरच विशेष असे काही पाहिले, ते म्हणजे स्थानिक महिलांकडून पूर्णपणे चालवला जाणारा खारफुटीशी संबंधित पर्यटन उपक्रम. या महिला खाडीच्या पाण्यात अतिशय सहजतेने होड्या चालवतात; पर्यटकांना खारफुटीच्या जंगलांच्या कथा सांगतात; पक्ष्यांची घरटी आणि खेकड्यांची बिळे दाखवतात आणि भरती-ओहोटीचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो, हे समजावून सांगतात. हे दृश्य प्रेरणादायी होते. विज्ञान, पर्यावरणशास्त्र आणि स्थानिक समुदाय एकत्र येऊन निसर्ग आणि माणूस या दोघांसाठीही फायदेशीर ठरू शकतात, याचे ते सुंदर उदाहरण होते. माझी ऑटरसोबतची भेट केवळ महाराष्ट्राच्या किनार्‍यापुरती मर्यादित नाही. बिहार आणि पश्चिम बंगालमधील गंगा आणि महानंदा नद्यांमध्ये ‘डब्ल्यूसीटी’ या संस्थेसोबत गंगेटिक डॉल्फिनच्या सर्वेक्षणादरम्यान, मला एक विलक्षण दृश्य पाहण्याचे भाग्य लाभले. सात ऑटरचे एक कुटुंब, ज्यामध्ये दोन अगदी लहान पिल्लांचाही समावेश होता. ही सर्व ऑटर एकत्र नदीकाठाने पुढे सरकत होती. पिल्ले मोठ्या ऑटरच्या अगदी जवळ राहात होती. प्रवाहाविरुद्ध पोहताना त्यांच्या छोट्या शरीरांना थोडा संघर्ष करावा लागत होता; पण जन्मापासूनच त्यांना भविष्यात जगण्यासाठी आवश्यक असलेले हे पाण्याचे जग शिकावे लागत होते.
 
महानंदा नदीत मला एक प्रौढ ऑटर एकटाच दिसला. कदाचित तो आपला अधिवास सोडून नवीन ठिकाणाच्या शोधात निघालेला नर असावा किंवा एकटी मादी असावी. तो नदीच्या काठावर अन्नाच्या शोधात फिरत होता.
 
हे क्षण फार छोटे, शांत आणि अक्षरशः जादुई होते. पण त्यांनी मला एक महत्त्वाची जाणीव करून दिली. कधीकाळी मोठ्या प्रमाणावर आढळणार्‍या या प्राण्यांची अधिवासक्षेत्रे आणि संख्या आता तुकड्या-तुकड्यांत विभागली गेली आहेत. मग या चपळ, पाण्यात सहज वावरणार्‍या ऑटरचा किनार्‍यावर शांतपणे उभ्या असलेल्या झाडांशी संबंध काय?
 
याचे उत्तर ऋतूंमध्ये दडलेले आहे. आणि हेच ते ऋतूंचे बदल आहेत, ज्यांचे निरीक्षण SeasonWatch आपल्याला करण्यास प्रवृत्त करते. नैऋत्य मोसमी पाऊस कोसळू लागला की सोनचिप्पी (Sonneratia apetala) या खारफुटीच्या झाडाला फळे येऊ लागतात. त्याची गरासारखी, मांसल फळे पाण्यात पडतात आणि भरतीच्या प्रवाहाबरोबर खार्‍या-गोड्या पाण्याच्या खाड्यांमध्ये वाहून जातात. ही केवळ वनस्पतीशास्त्रातील एक मनोरंजक घटना नसून ती जणू ऑटरसाठी जेवणाची घंटाच असते.
 
ही फळे मासे, खेकडे आणि इतर जलचरांना आकर्षित करतात आणि जिथे भक्ष्य मोठ्या प्रमाणात एकत्र येते, तिथे ऑटरही पोहोचतात. उन्हाळा आला आणि तापमान वाढले की, खारफुटीसमोर एक वेगळेच आव्हान उभे राहते. वाढलेल्या क्षारतेमुळे झाडांवर ताण येतो. काही कांदळवनाची झाडे, जसे की सुंदरी (Heritiera fomes), पाण्याची बचत करण्यासाठी आपली पाने गाळतात.
 
ही गळून पडलेली पाने पाण्यात कुजतात आणि सूक्ष्मजीवांच्या अन्नसाखळीला चालना देतात. त्यातून कोळंबी आणि लहान माशांना पोषण मिळते.
 
मात्र वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे स्रोत आटत जातात आणि उरलेल्या पाणवठ्यांमध्ये भक्ष्याची संख्या तुलनेने जास्त प्रमाणात एकवटते. त्यामुळे हेच मासे आणि इतर जलचर ऑटर, तसेच मच्छीमार, दोघांसाठीही सहज उपलब्ध होतात.
हिवाळ्यात तापमान सौम्य होते आणि पाणी अधिक स्वच्छ दिसू लागते. खारफुटीच्या जंगलात हूरी (एुलेशलरीळर रसरश्रश्रेलहर) यांसारख्या झाडांची कुजणारी पाने पाण्यात पोषकद्रव्ये सोडतात. यामुळे खेकडे आणि लहान माशांना अन्न मिळत आणि हेच ऑटरच्या प्रमुख भक्ष्यांपैकी आहेत.
 
ऑटर आणि खारफुटीच्या जंगलांसमोरील धोकेही एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून मला जाणवलेले काही प्रमुख धोके म्हणजे वाळू उत्खनन.
 
खारफुटीच्या जंगलांची बेकायदेशीर तोड आणि ऑटरच्या अधिवासाजवळ होणारी मासेमारी. पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या खारफुटीच्या जंगलाच्या काठावर उभे राहाल, मग ते सावित्री नदीकाठी असो, काळिंजेच्या पाणथळ भागात असो, थोडे थांबा आणि बारकाईने निरीक्षण करा. खारफुटीच्या झाडांकडे पाहा. त्यांची फुले आणि फळे पाहा. ऋतूनुसार त्यांच्यात होणारे बदल जाणून घ्या. जाळीसारख्या पायांचे ठसे, ऑटरची विष्ठा आणि खारफुटीच्या मुळांमधून पाण्याकडे जाणार्‍या वाटा आणि त्यांच्या चिखलात उमटलेल्या खुणा शोधा. कारण कदाचित, अगदी जवळच कुठेतरी, एखादा ऑटर आपल्या या अदृश्य जगात शांतपणे जगत असेल; आपल्या नजरेपासून थोडासा लपलेला, पण या परिसंस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनून...
 
(लेखक सागरी संशोधक
म्हणून कार्यरत आहेत.)
-प्रदीप चोगले




संबंधित मजकूर