आयकर भवनात भीषण आग; अग्निशमन दलाने २८ जणांना वाचवले

    17-Aug-2026
Mumbai Income Tax Building Fire
 
​मुंबई: (Mumbai Income Tax Building Fire) दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे रोडवर असलेल्या आयकर भवनात सोमवारी दुपारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या तळघरात लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत इमारतीत अडकलेल्या सुमारे २८ जणांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली असून, या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
 
​सोमवारी दुपारी २ वाजून ०१ मिनिटांनी आयकर भवनाच्या तळघरातून धूर निघत असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या अग्निशामक दलाला मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दुपारी २:१० वाजता या आगीला 'लेव्हल-१' घोषित करण्यात आले. आगीचा फैलाव तळघरातील सुमारे ७,००० ते ८,००० चौरस फूट परिसरात झाला होता. तेथील इलेक्ट्रिक वायरिंग, विद्युत उपकरणे, कागदपत्रे, जुने रेकॉर्ड्स, लाकडी पार्टिशन्स आणि भंगार साहित्याने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणावर धूर संपूर्ण इमारतीत पसरला.(Mumbai Income Tax Building Fire)
 
​घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, मुंबई पोलीस, 'बेस्ट'चे पथक, १०८ रुग्णवाहिका आणि पालिकेचे प्रभाग कर्मचारी तातडीने मदतीसाठी दाखल झाले. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून १५ जणांना जिन्यावरून सुरक्षितपणे खाली आणले, तर ५ ते ६ जणांना पहिल्या मजल्यावरून शिडीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. आगीच्या भीतीने इमारतीच्या छतावर आश्रय घेतलेल्या ८ जणांना टर्न टेबल लॅडरच्या मदतीने सुखरूप खाली आणण्यात आले.(Mumbai Income Tax Building Fire)
 
​आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी 'बी.ए. सेट' परिधान करून इमारतीच्या आत प्रवेश केला. ८ फायर इंजिन, २ हाय प्रेशर लाईन्स आणि ७ होज लाईन्सच्या साहाय्याने आगीवर पाण्याचा मारा सुरू करण्यात आला. इमारतीमधील धूर बाहेर काढण्यासाठी स्मोक एक्स्ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला तसेच खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. इमारतीत कोणी अडकले किंवा बेपत्ता आहे का, याबाबत पोलीस, आयकर विभागाचे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांकडून कसून चौकशी सुरू आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.(Mumbai Income Tax Building Fire)
 
 




संबंधित मजकूर