व्यवसायातून समाजसेवा, जीवनातून संघसेवा...

    17-Aug-2026
Ganesh Narayan Dandekar
 
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य रुजविणे, वाढविणे आणि समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये संघविचार पोहोचविणे यासाठी आयुष्यभर निष्ठेने कार्य करणारे कै. गणेश नारायण (भाऊराव) दांडेकर हे संघकार्याच्या इतिहासातील एक समर्पित, कर्तव्यनिष्ठ आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. व्यवसाय, सामाजिक जीवन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाही संघकार्याला त्यांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग मानले. प्रतिकूल परिस्थिती, नोकरीतील बदल्या, कारावास किंवा कौटुंबिक दुःख—कशामुळेही त्यांच्या संघनिष्ठेत कधीही खंड पडला नाही.
 
 
गणेश नारायण (भाऊराव) दांडेकर यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२१ रोजी रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरीतील दांडे आडम. त्यांचे वडील नारायण दांडेकर हे एसएससीपर्यंत शिक्षण घेतलेले असून पोस्ट खात्यात कार्यरत होते. देवरुख, गुहागर, चिपळूण तसेच गुजरातमधील बडोदे येथे त्यांनी नोकरी केली. आई वत्सला दांडेकर यांनी काही काळ मराठी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले.
 
गुहागर येथे चौथीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर भाऊरावांनी दापोली येथील ए. जी. हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. शाळेच्या वसतिगृहात राहत असतानाच त्यांच्या आयुष्यात संघाचा प्रवेश झाला. वसतिगृहातील चिपळूणच्या भावे आडनावाच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्राथमिक माहिती मिळाली. पुढे पुण्याहून येणारे विनायकराव बर्वे विद्यार्थ्यांना एकत्र करून देशभक्तांच्या कथा, संघाची पद्ये आणि संघाचे विचार सांगत असत.
 
याच वातावरणातून भाऊरावांच्या मनात संघकार्याचे बीज रुजले. १९३७ च्या सुमारास वसतिगृहाजवळ संघाची शाखा सुरू झाली आणि भाऊराव त्यात सक्रियपणे सहभागी झाले. १९३८ ते १९४० अशी सलग तीन वर्षे त्यांनी संघ शिक्षा वर्गाचे प्रशिक्षण घेतले. नागपूर येथील संघ शिक्षा वर्गात परमपूजनीय डॉ. केशवराव हेडगेवार यांचा अखेरचा बौद्धिक वर्ग ऐकण्याचे आणि त्यांना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्यही त्यांना लाभले. या संस्कारांचा त्यांच्या पुढील आयुष्यावर खोल परिणाम झाला.
 
१९४२ मध्ये भाऊरावांना पोस्ट खात्यात नोकरी मिळाली. मात्र नोकरीच्या तुलनेत संघकार्याला अधिक वेळ देता यावा, अशी त्यांची मनोभूमिका होती. शाखेच्या बैठका अनेकदा रात्री उशिरापर्यंत चालत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्ट कार्यालयात वेळेवर पोहोचणेही कधी कधी कठीण जात असे. १९४३ मध्ये बडोदे येथील विनायक धोंडो केळकर यांच्या ज्येष्ठ कन्या मंदाकिनी यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
 
संसाराची नवी जबाबदारी आली; मात्र संघकार्यावरील त्यांची निष्ठा कमी झाली नाही. १९४४-४५च्या काळात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील सुमारे १५-१६ गावांमध्ये त्यांच्या बदल्या करण्यात आल्या. अखेरीस संघकार्याला अधिक वेळ देता यावा म्हणून त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. १९४६ मध्ये दापोलीत स्थायिक होत त्यांनी ए. जी. हायस्कूलसमोर भाड्याने जागा घेऊन स्टेशनरीचे दुकान सुरू केले. पुढे जागा अपुरी पडल्याने बाजारपेठेतील वेदक यांची जागा भाड्याने घेऊन दुकानाचा विस्तार केला.
 
संघावर आलेल्या संकटाच्या काळातही भाऊरावांची संघनिष्ठा डळमळली नाही. १९४८ च्या संघ सत्याग्रहात भाऊराव आणि त्यांचे बंधू तात्या यांनी सहभाग घेतला आणि त्यांना कारावास सोसावा लागला. बंदी उठल्यानंतर त्यांनी पूर्वीपेक्षाही अधिक जोमाने संघकार्याला सुरुवात केली.
 
व्यवसायाच्या माध्यमातूनही समाजसेवा करण्याची त्यांची वृत्ती होती. त्या काळात दापोलीत औषधांचे केवळ एकच दुकान होते. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी आपल्या दुकानातून औषधविक्री सुरू केली. पुढे १९५२-५३च्या सुमारास स्वतंत्र जागा घेऊन ‘राजकमल मेडिकल स्टोअर्स’ सुरू केले. दोन दुकानांचा व्याप सांभाळतानाही संघकार्याला त्यांनी कधी दुय्यम स्थान दिले नाही.
 
१९६२च्या सुमारास संघ प्रचारक वसंतराव केळकर यांना मेडिकल स्टोअर्स देण्याचा निर्णय भाऊरावांनी घेतला. दुकानातील सर्व औषधे त्यांनी वसंतरावांना खरेदी किमतीत दिली. वैयक्तिक व्यवसाय आणि संपत्तीपेक्षा संघकार्य मोठे आहे, या भावनेचे हे अत्यंत बोलके उदाहरण होते. १९६४ मध्ये तुळपुळे यांच्याकडून साडेतेरा गुंठे क्षेत्राचे, कंपाऊंडमधील घरासह, त्यांनी घर विकत घेतले. त्यामुळे संघाच्या प्रचारकांच्या निवासाचीही सोय झाली.
 
दापोली तालुका संघ कार्यकारिणीचे भाऊराव अनेक वर्षे सदस्य होते. नागपूर येथील केंद्रीय कार्यकारिणीचेही ते सुमारे सहा वर्षे सदस्य राहिले. त्यामुळे वार्षिक बैठकींसाठी त्यांचा नागपूरशी नियमित संपर्क असे. पूजनीय श्रीगुरुजींनी विस्तारक वाढविण्याचे आवाहन केल्यानंतर सुमारे १९६५च्या काळात भाऊराव दोन आठवड्यांसाठी पणजी येथे विस्तारक म्हणून गेले. दापोलीच्या व्यापारी वर्गाला संघाशी जोडण्याच्या कामात त्यांनी विशेष पुढाकार घेतला.
 
व्यापारी बंधूंसाठी तेंडुलकर दत्त मंदिरात त्यांनी अनेक वर्षे साप्ताहिक रात्रशाखा चालवली. काही काळ प्रभात शाखाही घेतली. दापोलीत नोकरीनिमित्त नव्याने येणाऱ्या व्यक्तींशी परिचय करून घेणे आणि त्यांना संघाची ओळख करून देणे हा जणू त्यांच्या जीवनाचा नित्यक्रमच बनला होता. त्यांच्या दुकानात येणाऱ्या नव्या व्यक्तीशी संवाद साधून त्याला संघाशी जोडण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत.
 
भाऊरावांना वंशी आणि शंखवादन अवगत होते. विजयादशमीच्या संचलनात त्यांनी एकाच वेळी वंशी आणि शंख या दोन्ही वाद्यांचे वादन केल्याचा प्रसंग त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देतो. दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या स्थापनेत त्यांनी संस्थापक संचालक म्हणून योगदान दिले. दापोली शिक्षणसंस्थेच्या नियामक मंडळावरही ते सुमारे १९६९ ते १९७४ या काळात सदस्य होते.
 
१९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादण्यात आली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अनेक संस्थांवर बंदी घालण्यात आली. संघाचे असंख्य कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात डांबले गेले. भाऊरावांच्या कुटुंबासाठी हा प्रसंग विशेष वेदनादायी होता. १३ डिसेंबर १९७५ रोजी त्यांच्या मोठ्या मुलगा वसंत याचा आरवली येथे विवाह होणार होता. त्याच्या आदल्या दिवशी, १२ डिसेंबरला पहाटे भाऊराव मुंबईहून दापोलीला आले. मात्र त्याच दिवशी सकाळी पोलिसांनी त्यांना अटक केली आणि येरवडा कारागृहात पाठविले. पुढे त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात झाली.
 
कारागृहातून सुटल्यानंतर भाऊरावांनी संघकार्याबरोबरच भगवद्गीतेचा प्रसार आणि योगासनांचा प्रचार याकडेही लक्ष केंद्रित केले. तुरुंगातील प्रतिकूल काळ त्यांनी आत्मविकासासाठी वापरला आणि त्यातून मिळालेले ज्ञान समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. संघ शिक्षा वर्गातही त्यांनी अनेक वर्षे व्यवस्था विभागाची जबाबदारी सांभाळली. पडद्यामागे राहून कार्य सुरळीतपणे चालविणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचे होते.
 
भाऊरावांच्या आयुष्यात वैयक्तिक दुःखाचे प्रसंगही आले. त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांचे १९८८ मध्ये भरूच येथे निधन झाले. जानेवारी २००४ मध्ये त्यांचा दुसरा मुलगा श्रीराम याचे निधन झाले. या दुःखद प्रसंगांनंतरही भाऊरावांनी जीवनातील आपली कर्तव्यभावना आणि संघाशी असलेली नाळ कायम ठेवली. दि. ४ ऑगस्ट २००४ रोजी भाऊरावांनी देह ठेवला. त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.




संबंधित मजकूर