चाकणमधील वाहतूककोंडी सुटणार ?

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा पाहणी दौरा ; उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय

    17-Aug-2026
Udyog Mantri Samant  
 
मुंबई : (MIDC Maharashtra) चाकण एमआयडीसी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पावसाच्या पाण्याचा निचरा, अतिक्रमणे, पार्किंग तसेच अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवार दि.१६ रोजी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. पाहणीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकण औद्योगिक वसाहतीतील विविध समस्या आणि त्यावर करावयाच्या कालबद्ध उपाययोजनांचे सविस्तर सादरीकरण केले. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून तातडीच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात तसेच भविष्यातील औद्योगिक विस्तार आणि वाढती वाहतूक लक्षात घेऊन दीर्घकालीन व शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उद्योगमंत्री सामंत यांनी दिल्या.
 
उद्योगमंत्री सामंत यांनी चाकण एमआयडीसीतील प्रमुख व अंतर्गत रस्ते, महत्त्वाचे चौक, वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणे, पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे, नाले, अतिक्रमणे, पार्किंगची उपलब्धता तसेच वाहतूक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यांची सद्यस्थिती, वाढती वाहनांची वर्दळ आणि औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीवर होणारा परिणाम याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. (MIDC Maharashtra)
 
पाहणीनंतर झालेल्या सादरीकरणात जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी चाकण औद्योगिक वसाहतीतील विविध समस्या तसेच त्यावर करण्यात येणाऱ्या शॉर्ट, मिड आणि लॉंग टर्म स्वरूपाच्या उपाययोजनांची माहिती दिली. महामार्ग व अंतर्गत रस्ते, वाहतूक व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा, वीज, वाहनतळ, अतिक्रमणे आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांवर संबंधित विभागांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचे सादरीकरण करण्यात आले. (MIDC Maharashtra)
 
रस्ते दुरुस्तीसाठी ३१ ऑगस्टची डेडलाईन
 
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी चाकण औद्योगिक वसाहतीचा दौरा केला. चाकण औद्योगिक क्षेत्रातील सर्व रस्ते आणि खड्डे दि. ३१ ऑगस्ट रोजीपर्यंत दुरुस्त करण्याचे आदेश मंत्री सामंत यांनी दिले आहेत. कामात दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आढळल्यास कंत्राटदारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा सामंत यांनी दिला. (MIDC Maharashtra)
 
 




संबंधित मजकूर