ठाणे : (Ambernath Shiv Temple) पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त अंबरनाथच्या ऐतिहासिक अंबरनाथ शिवमंदिर येथे भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची लगबग सुरू झाली असून दर्शनासाठी लागलेली रांग थेट उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपर्यंत पोहोचली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
श्रावणातील सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात असल्याने पहिल्याच सोमवारी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांचा मोठा ओघ पाहायला मिळाला. अंबरनाथसह मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातूनही हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले.(Ambernath Shiv Temple)
भाविकांनी पहाटेपासून रांगेत उभे राहून महादेवाचे दर्शन घेतले. अनेक भाविकांनी शिवलिंगावर जलाभिषेक करून बेलपत्र, फुले अर्पण करत मनोभावे पूजा केली. दीर्घकाळ रांगेत उभे राहावे लागत असतानाही महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.(Ambernath Shiv Temple)
‘गर्दी कितीही असली तरी महादेवाचे दर्शन मिळाले की समाधान मिळते’
दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाने सांगितले, “श्रावणी सोमवारच्या दिवशी अंबरनाथच्या महादेवाचे दर्शन घेणे ही आमच्यासाठी श्रद्धेची बाब आहे. पहाटेपासून रांगेत उभे आहोत, मात्र महादेवाचे दर्शन झाल्यानंतर सगळा थकवा दूर होतो.”(Ambernath Shiv Temple)
तर दुसऱ्या भाविकाने सांगितले, “अंबरनाथचे शिवमंदिर अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे श्रावणात येथे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येतो. पहिल्या सोमवारी दर्शन घेतल्याने मनाला विशेष समाधान मिळाले.”
दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांकडून मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीचे नियोजन, वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.(Ambernath Shiv Temple)
श्रावणातील पुढील सोमवारीही अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात मोठ्या संख्येने भाविक दाखल होण्याची शक्यता असून, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण अंबरनाथ नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे.(Ambernath Shiv Temple)