राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक नानाराव ढोबळे यांच्या निधनास दि. १५ ऑगस्ट रोजी ४० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण करणारा लेख...
जाज्वल्य राष्ट्रभक्ती श्वासात नित्य होती,
सर्वस्व अर्पणाची ती धुंद लाट होती
पुण्याच्या डॉ. अरविंदराव लेलेंनी नानांचे हे केलेले वर्णन इतके यथार्थ आहे की, ते वाचल्यावर नानांच्या जीवनाचे पूर्ण चित्रच डोळ्यांसमोर उभे राहते. ज्यांनी-ज्यांनी नानांना पाहिले, ऐकले आहे, अशांचा रोमरोम त्यांच्या आठवणींनी पुलकित होतो आणि मन व डोळे भरून येतात. ज्यांनी नानांना बघितले नाही, त्यांनाही ही कविता वाचून त्यांच्या ध्येयधुंद जीवनाची काहीशी कल्पना येऊन प्रेरणा मिळेल.
माझा आणि नानांचा परिचय कधी आणि कसा झाला, हे आता नेमके स्मरत नाही. परंतु, १९६०च्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांत झाला, हे नक्की. काळीसावळी मूर्ती, मध्यम बांधा, दुटांगी धोतर व पांढरा कॉलरचा बाह्या अर्ध्या दुमडलेला शर्ट, पायात चपला या वेशातच त्यांना पहिल्यांदा आणि शेवटपर्यंत मी बघितले. त्यावेळी ते नाशिक विभागाचे (नाशिक, धुळे, जळगाव) विभाग प्रचारक होते. मोटर सायकल, स्कूटर तर सोडाच; पण प्रचारकासाठी संघाला सायकल घेणेसुद्धा न परवडणार्या काळात, नाना रेल्वेच्या तिसर्या वर्गाने वा ‘एसटी’ने प्रवास करीत. जिथे बसही जात नसे, अशा खेडोपाडी पायी जात व शाखा आणि कार्यकर्ते उभारण्याचे काम ते करीत. तत्पूर्वी, (१९५०च्या दशकात) ते धुळे जिल्ह्याचे (आताचा धुळे व नंदुरबार हा वनवासी जिल्हा) जवळजवळ १० वर्षे प्रचारक होते. खान्देशच्या रणरणत्या उन्हाची पर्वा न करता, नानांनी गावोगावी जाऊन संघाचे काम उभे केले. आजही धडगाव अक्कलकुव्यासारख्या, सातपुड्याच्या रांगांमधील तिसर्या-चौथ्या रांगांमध्ये वसलेल्या खेड्यात असलेले स्वयंसेवक याचे साक्षीदार आहेत. या प्रचंड पायपिटीमुळे त्यांना पुढे टाचेचे दुखणे जडले, ते कायमचेच. त्या वेदना असतानाही, ते सदैव हसतमुख व प्रसन्न असत. त्यांच्या मनात वसत असलेले सर्वांविषयीचे आत्यंतिक प्रेम, हे त्यांच्या नजरेतून ओसंडत असे. त्यामुळे रस्त्यात नाना दुरून जरी दिसले, तरी धावत जाऊन त्यांच्याशी बोलावे, असेच वाटे. त्यांचे नुसते हास्य त्यांच्या हृदयात असणारा स्नेह व प्रेम प्रकट करे. अशी भेट/बोलणे होत असताना, त्याच्याआधी एखादा मनस्ताप देणारा प्रसंग जरी घडून गेला, तरी त्याचा लवलेशही त्यांच्या चेहर्यावर वा देहबोलीतून प्रकट होत नसे.
सदा प्रसन्न आणि अंतर्बाह्य प्रेममूर्ती असणारे नाना, यामुळेच अनेक कुटुंबांतील ज्येष्ठ सदस्य होते. अशी अक्षरशः शेकडो कुटुंबे या विभागात आहेत. त्यांच्या या प्रेमळ सात्त्विक स्वभावामुळे, आपल्या सुख-दुःखाच्या प्रसंगी नाना जवळ असावेत, असेच सर्वांना मनापासून वाटे. नानाही त्या-त्या कुटुंबातीलच असल्याप्रमाणे, त्यांची व्यक्तिगत कौटुंबिक स्वरूपाची कामेही अगदी सहजतेने करीत. या निर्मळ व प्रेमळ वर्तनाचा प्रभाव सर्वांवरच पडत असे. काहीवेळा कौटुंबिक वादात नानांना मध्यस्थीही करावी लागली व त्यावेळी नानांचा शब्द पाळलाही गेला. असे वाद मिटविण्यामागे, नानांचा कोणताही व्यक्तिगत लाभ नव्हता. त्यांची भूमिका एका पद्यात म्हटल्याप्रमाणे, ‘कलह मिटावे परस्परांतील ऐक्यबीज रुजवावे! ऐयाच्या वटवृक्षावरती संघपुष्प विलसावे! स्वदेश सेवेवाचून दुसरा, पंथ आम्हास नसावा!’ हीच भावना कुटुंबातील दोन्ही पक्षांत दृढ व्हावी, अशीच होती. कुटुंबांमध्येच काय; पण समाजातही असे कलह निर्माण होऊ नयेत, यासाठीच ते झिजत होते.
समाजाविषयीची अपार आणि अलौकिक प्रेमभावना मनात बाळगणारे नाना, प्रत्यक्षात सामान्य माणसांप्रमाणेच राहात, त्यांच्यात सहजतेने मिसळत. ते जणू सामान्य माणसांसाठीच जगत होते; त्यांच्यातील कर्तृत्व, भक्ती जागृत करण्यासाठी झिजत होते. त्यासाठी त्यांनी व्यक्तिगत लौकिक जीवनातील, सर्व आकांक्षा-इच्छांचा त्यागही केला होता. एकच इच्छा होती, ती म्हणजे हा माझा समाज सुखी, संपन्न, संघटित राष्ट्रभक्त व्हावा. त्यासाठी ते छोट्या-छोट्या खेड्यांत जात; गरीब, अशिक्षित मुला-माणसांत मिसळत. बा. भ. बोरकरांनी वर्णन केल्याप्रमाणे, ‘अंगीकारिली ज्यांची निष्ठा, त्यांच्यास्तव ठोकरू प्रतिष्ठा, परलोकहून प्रियतर आम्हा श्वानाचा विश्वास’ या धर्मराज युधिष्ठिरांच्या भावनेचे साक्षात प्रकटीकरण म्हणजेच नाना!
त्यामुळे सर्वसामान्य लोकांत समरस होऊन त्यांनी त्यांच्यातले असामान्य गुण हेरले, ज्याचे प्रकटीकरण अशा अनेक सामान्य माणसांनी आणीबाणीच्या काळात केलेले आपण बघितले आहे. अशा गुणांचे प्रकटीकरण करणार्या, लौकिकार्थाने सामान्य स्वयंसेवकांचा परिचय नानांनी आपल्या ‘समाज तळातील मोती’ या पुस्तकात करून दिला आहे. त्यांनी आणखी दोन पुस्तके लिहिली- १. ‘राष्ट्रनिष्ठेचा नंदादीप - खंडो बल्लाळ’ आणि २. ‘कथा देशभक्तीच्या’. ही पुस्तके वाचली की असे वाटते, ते जर संघप्रचारक झाले नसते; तर उत्तम साहित्यिक झाले असते. परंतु, स्वा. सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘हे मातृभूमी तुजला मन वाहियेले, वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले, तुतेंचि अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तूंचि अनन्य झाला!’ अशा संघसमर्पित मानसिकतेमुळे त्यांनी जे काही केले, ते फक्त संघ, समाज आणि राष्ट्रासाठीच!
नाना म्हणजे साक्षात संतच! आपण कोणीही नामदेव, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास अशा संतांना बघितलेले नाही; परंतु ते समाजातील सर्व घटकांमध्येच नव्हे, तर पशुपक्ष्यांमध्येही परमेश्वर पाहात. याविषयीच्या कथाही आपण ऐकल्या आहेत. हे सांगणारी त्यांची वचने, श्लोक, अभंग, ओव्याही आपण नेहमी ऐकतो व सांगतोसुद्धा! परंतु, आपले वर्तन तसे होत नाही. परंतु, नाना प्रत्यक्षात स्वतः तसे जगले, हे मात्र आपण पाहिले आहे. त्यामुळे ते एक संत कोटीतले पुरुष होते, हीच माझी भावना आहे.
उपेक्षित, वंचित, अशिक्षित, दरिद्री समाजबांधवांविषयी मनात असणार्या अपार करुणेपोटी, त्यांनी धुळे जिल्ह्यातील अक्कलकोस या १०० टक्के वनवासी (भिल्ल) वस्तीच्या गावात एक ‘शेतकरी सोसायटी’चा प्रयोग सुरू केला. दोंडाईचे या गावापासून सुमारे १०-१२ किमीवर हे गाव. त्या गावाच्या अलीकडेच सुराय नावाच्या गावात संघाची शाखा होती, स्वयंसेवक होते. अक्कलकोस गावातील लोकांची दयनीय अवस्था पाहून, या संतपुरुषाचे हृदय कळवळले. आपण यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, या तळमळीतून त्यांनी एक प्रयोग करायचे ठरवले. दोंडाईचे, धुळे, नंदुरबार अशा मोठ्या गावांतील सधन मंडळींकडून काही रक्कम उभी केली. ती तेथील मंडळींना शेतीसाठी बिनव्याजी दिली. अट एकच होती, आलेले उत्पन्न सोसायटीकडे (म्हणजे जो एक प्रमुख नेमला होता त्याच्याकडे) जमा करावे. तो त्याच्या विक्रीतून आलेल्या पैशांचे वाटप उत्पन्नाच्या प्रमाणात सर्वांना करेल. शहरी भागातीलच काय; पण सुरायसारख्या खेड्यात राहणार्यांनाही हे असे होणार नाही, असेच वाटत होते. कारण, त्यांचा त्या भिल्ल समाजाविषयीचा तोपर्यंतचा अनुभव. नानांचा मात्र माणसातील चांगुलपणावर विश्वास होता. त्यांनी सांगिल्यावर त्या मंडळींनी ‘हो’ म्हटले आणि पैसे घेतले. दुर्दैवाने पहिल्या वर्षी इतर अनुभवी मंडळींच्या म्हणण्याप्रमाणेच घडले. नानांनाही वाईट वाटलेच; परंतु मोरोपंत पिंगळे यांनीही नानांना पाठिंबा दिला आणि पुढच्या वर्षी त्यांनी पुन्हा हा प्रयोग केला. एकदा मोरोपंत स्वतः अक्कलकोस येथे येऊनही गेले. नानांच्या तपःपूत जीवनाच्या प्रभावाने, पुन्हा एकदा धनिक स्वयंसेवकांनी पैसे दिले. यावेळी काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून पीक काढणीच्या वेळी तेथे कोणीतरी जाऊन राहावे, असे सर्वांचे मत पडले. ऐन हंगामात आपली शेती सोडून कोण जाणार? शेवटी नाना म्हणाले, ‘मीच जाऊन राहतो.’ त्यावेळी ते महाराष्ट्र प्रांताचे बौद्धिक प्रमुख होते. त्यांनीच असे म्हटल्यावर, जिल्ह्यातील कार्यकर्ते जागे झाले आणि कोण जाईल, असा विचार करू लागले. नानांनीच सुचवले, शंकरराव वाघांना सांगून बघा. त्यांना बोलवण्यासाठी मीच पारोळ्याजवळील बहादरपूरला गेलो. पाहतो तो घरात अतिशय गरिबीची स्थिती. शंकरराव धुळ्याला गेलेले, दुसर्या दिवशी कोर्टाची तारीख. अशा परिस्थितीत मी वहिनींना का आलो ते सांगितले. त्यांनी गरम भाकरी करून मला खाऊ घातली. दमलो होतोच, लगेच झोप लागली. शंकरराव रात्री केव्हा आले, वहिनींनी त्यांना काय सांगितले, मला पत्ताच नाही. सकाळी उठलो, तो शंकरराव तयार होते. मला म्हणाले, ‘चला जाऊया अक्कलकोसला.’ मी म्हटले, ‘अहो तुमची तारीख आहे ना? ती झाल्यावर आलात तरी चालेल.’ ते म्हणाले, "तारखेला ही जाईल. नानांनी बोलावले आहे ना, आपण तिकडे जाऊ.” ही त्यांची संघनिष्ठा पाहून त्याक्षणी माझ्या मनावर जो परिणाम झाला, तो शब्दांत सांगता येणार नाही. मला वाटते त्यामुळेच मी अजूनपर्यंत संघकामात आहे. हा नानांचा प्रभाव स्वयंसेवकांवर होता. शंकरराव आले, आठ-दहा दिवस राहिले. आवश्यक ती सर्व कामे पार पाडली आणि मगच घरी परतले, असे ‘समाज तळातले मोती’ नानांनी वेचले.
नानांची वाणी अत्यंत ओजस्वी होती. बौद्धिक वर्ग/भाषण करताना समोरच्यांना ते भारून टाकीत. समाज आणि देशाच्या दुःस्थितीचे वर्णन करताना, तर ते स्वतःही रडत असत व ऐकणार्यांच्या डोळ्यांतूनही पाणी काढीत. दोंडाईचे येथील गोविंदशास्त्री जोशी तर त्यांना ‘संघातील सानेगुरुजी’च म्हणत. त्यांच्या भाषणांमुळे कार्यकर्ते-स्वयंसेवक कार्यतत्पर होत, मरगळ झटकून कामाला लागत. त्यांचा संतसाहित्याचा अभ्यासही मोठा होता. साध्या बोलण्यातही अशी उदाहरणे सहजपणे येत. संघकार्याविषयी आपल्या मनात काय भाव आहे, ते सांगताना ते सहजपणे बोलून गेले, ‘बहुत सुकृताची जोडी, म्हणूनी विठ्ठली आवडी’ संघकार्य हे ईश्वरीकार्य आहे, असेच आपण म्हणतोच; पण ते करण्यासाठी त्याची आवड उत्पन्न होण्यासाठी आपलीही पूर्वपुण्यायी हवीच. संघकार्य हा त्यांचा विठ्ठलच होता. त्यांच्या साध्या बोलण्यालाही, एकप्रकारचा सुभाषिताचा सुगंध व अमृतवचनाचे मोल प्राप्त झालेले होते, ते त्यांच्या तपःपूत जीवनामुळेच!
एकदा जळगावी एक क्षेत्रीय स्तरावरची बैठक व्हायची होती. मोरोपंतांसारखे अधिकारी येणार होते. तीन दिवसांची बैठकीत कोणताही व्यत्यय नको म्हणून, त्यावेळी (१९६८/६९) गावाबाहेर असलेला बंगला निश्चित केला. निरनिराळ्या स्वयंसेवकांवर जबाबदार्याही दिल्या. मुख्य जबाबदारी अर्थातच, शहर कार्यवाहांची! काही अपरिहार्य कारणाने त्यांना त्याच काळात बाहेरगावी जाणे भाग पडले. परंतु, स्वयंसेवकांनी आपापली जबाबदारी नीटपणे पार पाडल्याने व्यवस्था जशी अपेक्षित होती, तशीच झाली. काही काळानंतर नाना प्रवासात जळगावी आल्यावर शहर कार्यवाहांकडे बैठकीचा विषय निघाल्यावर, श. का. म्हणाले, "नाना माझ्या असे लक्षात आले आहे की, मी येथे असताना जशी व्यवस्था झाली असती, त्यापेक्षाही अधिक चांगली व्यवस्था मी नसताना झाली.” यावर नाना जे म्हणाले ते इतके उद्बोधक व दिशादर्शक होते की, ते ऐकणार्यांच्या मनावर कायमचे कोरले जाईल. नाना म्हणाले होते, "म्हणूनच, अण्णा आपण असून नसल्यासारखे राहायला शिकले पाहिजे.” केवढा मोठा संदेश नानांनी, या वायातून दिला. ‘सहज बोलणे हितगुज’ असे नानांचे बोलणे होते.
अमोघ वक्तृत्व ही काही नानांना आनुवंशिक किंवा दैवी देणगी नव्हती. तर ते वक्तृत्व म्हणजे संघकार्य करीत असताना, त्यांच्या हृदयात असलेल्या समाज व राष्ट्रभक्तीचे प्रकटीकरणच होते. त्यांचे ध्येयासाठी जे संपूर्ण समर्पण होते, त्यातूनच निर्माण झालेली भावना बोलण्यातून अभिव्यक्त होई.
प. पू. श्रीगुरुजींवर तर त्यांची नितांत श्रद्धा. प्रवासात असलेल्या गुरुजींना भेटायला स्टेशनवर स्वयंसेवक जात असत. त्या घोळयात नाना सगळ्यात मागे असत आणि हात जोडून नमस्कार करीत. गाडी जाण्याच्या दिशेने, गाडी दिसेनाशी होईपर्यंत बघत राहून गुरुजींची मूर्ती डोळ्यांत साठवून घेत असत.
संघकार्य करताना आलेल्या अनेक संकटांना नाना खंबीरपणे सामोरे गेले, कधीच डगमगले नाहीत. भारतमाता हेच त्यांचे आराध्य दैवत होते. परंतु, ४०-४२ वर्षांच्या अथक परिश्रमांमुळे, व्याधिग्रस्त शरीराला आपल्या सेनाप्रमुख ज. वैद्यांच्या हत्येचा धक्का सहन झाला नाही. अखंड भारताचे स्वप्न अहोरात्र हृदयाशी बाळगणार्या या हळव्या पुरुषाचे भारत खंडित झाला, त्याच तारखेला निधन झाले, दि. १५ ऑगस्ट १९८६.
गोविंद श्रीधर तथा नानाराव ढोबळे या संघरूप झालेल्या संतपुरुषाविषयी त्यांच्या इतकेच संघसमर्पित; परंतु गृहस्थी असणारे नाशिकचे त्र्यंबक गंगाधर तथा राजाभाऊ गायधनी यांनी, नानांच्या अस्थी विसर्जनापूर्वी त्यांच्या (राजाभाऊंच्या) घरी दर्शनार्थ ठेवल्या असताना आपल्या भावना प्रकट करताना लिहिले की, "माझ्या दृष्टीने त्या अस्थी नव्हत्याच, तर भारतमातेच्या चरणांवर अर्पित झालेल्या एका सुगंधित जीवनपुष्पाचे ते निर्माल्य होते.” राजाभाऊ गायधनी एक प्रतिभावान व्यक्ती असल्याने, ते आपल्या भावना अशा प्रभावी शब्दांत व्यक्त करू शकले. परंतु, नानांविषयी इतक्याच उत्कट भावना मनात बाळगणारे शेकडो स्वयंसेवक आपल्या प्रांतात आहेत.
समाजरूपी ईश्वराच्या चरणी लीन झालेल्या या प्रेममूर्ती राष्ट्रभक्त संतपुरुषाचे पुण्यस्मरण करत असताना, संत तुकारामांच्या ‘तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांचिया’ या शब्दांत थोडा बदल करून मी म्हणेन, ‘मज ठेवी पायी नानांचिया.’ कारण, नाना हे संतांसारखे नव्हे; तर संतच होते, अशी माझी भावना आहे.
नानांच्या पावन स्मृतीस शतशः वंदन!
गोविंद यार्दी
(लेखक रा. स्व. संघ जनकल्याण समिती, नाशिक पूर्व प. महा. संभाग कार्यवाह आहेत.)
९७६३७२५७२९