भक्तासाठी वळलेला महादेव - औंढा नागनाथ

    16-Aug-2026
 
Aundha Nagnath Temple
 
'भक्तीपाशी देव घालितसे उडी, धुत असे घोडी अर्जूनाची’ या काव्यातून भक्त आणि भगवंताचे नाते उलगडते. शुद्ध भक्तीचा भुकेला असलेल्या भगवंतांनी अनेकदा, भक्ताकडे जाऊन दर्शन दिले आहे. भगवंताच्या या प्रेमाचा अनुभव अनेक संतांनी याची देही अनुभवला. महाराष्ट्रातील औंढा नागनाथ हे देखील भक्तप्रेमाचेच एक उदाहरण. मात्र, या मंदिरामध्ये भक्ताबरोबर इतिहास, साम्राज्य आणि भक्ती चळवळींचाही इतिहास दिसून येतो. या मंदिराच्या सर्वांगसुंदरतेचा मागोवा घेणारा हा लेख...
 
देवाच्या दर्शनासाठी भक्त मंदिराकडे जातो हे आपण नेहमीच पाहिले आहे. पण, महाराष्ट्रात एक मंदिर असे आहे, जिथे लोकपरंपरा एक विलक्षण कथाच सांगते. भक्ताला देवापासून दूर केले गेले, तेव्हा जणू देवानेच आपले मंदिर भक्ताकडे वळवले. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर केवळ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते म्हणून महत्त्वाचे नाही; त्याच्या दगडांमध्ये शैव परंपरा, मध्ययुगीन महाराष्ट्राचे स्थापत्य, नाथ-सिद्धांचा विचार आणि पुढे महाराष्ट्राला नवी दिशा देणार्‍या भक्ती चळवळीचा विलक्षण प्रवासही एकत्र नांदताना दिसतो.
 
‘शिवपुराणा’तील ‘कोटिरुद्रसंहिते’त वर्णिलेल्या बारा ज्योतिर्लिंगांमध्ये, ‘नागेश’ अथवा ‘नागेश्वर’ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख दारुकावनात असल्याचे दिसते. या दारुकावनाचे नेमके स्थान कोणते, याबद्दल मात्र विद्वानांमध्ये एकमत नाही. गुजरातमधील द्वारकेजवळचे नागेश्वर, उत्तराखंडमधील जागेश्वर आणि महाराष्ट्रातील औंढा नागनाथ अशा विविध परंपरा आपापला दावा मांडतात. त्यामुळे औंढा हेच पुराणातील दारुकावन असल्याचा निर्विवाद ऐतिहासिक दावा करण्यापेक्षा, औंढ्याला नागेश ज्योतिर्लिंग मानणारी महाराष्ट्रातील प्राचीन आणि दृढ श्रद्धा-परंपरा समजून घेणे अधिक योग्य ठरते.
 
औंढ्याचा इतिहास मात्र या ज्योतिर्लिंगाच्या दाव्यापेक्षाही अधिक रोचक असाच आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन संदर्भांमध्ये हा परिसर ‘अमरदक’ किंवा ‘अमर्दक’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या, एका महत्त्वाच्या शैव केंद्राशी जोडला जातो. दहाव्या शतकापासून विविध शिलालेखांमध्ये, अमरदक परंपरेशी संबंधित शैव आचार्यांचे उल्लेख आढळतात. पुढे संशोधकांनी, अमरदकची ओळख औंढा नागनाथशी जोडली आहे. विशेष म्हणजे, अमरदक है शैव सिद्धान्ताच्या आचार्य परंपरेतील महत्त्वाचे केंद्र. म्हणजेच, आज आपण ज्या औंढ्याकडे प्रामुख्याने तीर्थक्षेत्र म्हणून पाहतो, ते कधीकाळी शैव तत्त्वज्ञान, साधना आणि आचार्य परंपरेचेही प्रभावी केंद्र असावे.
 
आज दिसणार्‍या मंदिराच्या बांधकामाचा निश्चित शिलालेख उपलब्ध नाही. स्थापत्य आणि शिल्पशैलीच्या आधारे अभ्यासक त्याचा काळ साधारण बारावे-तेरावे शतक, म्हणजे देवगिरीच्या यादवांच्या प्रभावाचा काळ मानतात. औंढा त्याकाळात राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा होताना दिसतो. काही पुराव्यांनुसार बाराव्या शतकात अर्धापूरच्या रट्ट सरदारांच्या सत्तेशी, या प्रदेशाचा संबंध होता. पुढे तो प्रदेश यादवांच्या अधिपत्याखाली आला. त्यामुळे मंदिराकडे केवळ ‘हेमाडपंथी’ असा एक शब्द लावून पुढे जाण्यापेक्षा, मध्ययुगीन दख्खनमधील अनेक स्थापत्य आणि धार्मिक प्रवाहांचा परिणाम म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते.
 
मंदिरासमोर उभे राहिल्यावर त्याची भव्यता लगेच जाणवते. पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर विस्तीर्ण प्राकाराच्या मध्यभागी उभे आहे. उंच जगतीवर उभारलेल्या मंदिरात गर्भगृह, अंतराळ, प्रशस्त मंडप, बाजूंचे अर्धमंडप आणि पुढील मुखमंडप अशी रचना दिसते. गर्भगृहाचा बाह्यभाग ‘पंचरथ’ योजनेचा आहे. मंदिराच्या पीठापासून जंघेपर्यंत नजर वर नेत गेली की, दगडाचे थर जणू इतिहासाचे थर बनून उलगडतात.
 
त्यावरचे अधिष्ठानावरील शिल्पपट विशेष पाहण्यासारखेच आहेत. सर्वांत खाली कीर्तिमुखांची मालिका, गजथर अर्थात विविध मुद्रांतील हत्ती, पुढे अश्वथर अर्थात घोडेस्वारांची रांग आणि त्यावर नरथर म्हणजे मानवी जीवनाचे विविध प्रसंग, योद्धे, योगी, कृष्णचरित्रातील प्रसंग आणि सामान्य जीवनातील दृश्ये यांमधून मंदिर केवळ देवांचे विश्व न राहता, तत्कालीन समाजाचे दगडी दस्तऐवज झालेे. मंदिराची जंघा दोन आडव्या स्तरांमध्ये विभागलेली असून त्यावर देवता, अप्सरा, साधक आणि विविध शैव प्रतिमांची विपुल शिल्पसंपदा दिसते. यामध्ये रावणानुग्रह, शिव-पार्वती विवाह, नटेश, चामुंडा, अंधकांतक शिव, गजांतक, भैरव, कार्तिकेय, गणेश, उमा-महेश्वर अशा अनेक प्रतिमा आहेत. बहुमुखी आणि बहुभुज सदाशिवाची प्रतिमा तर विशेष उल्लेखनीयच. एका भैरव प्रतिमेत २० हात दाखवलेले असून वज्र, परशू, डमरू, कपाल, पाश, अंकुश आणि धनुष्य यांसारखी आयुधे ओळखता येतात. आश्चर्य म्हणजे, या शैव मंदिराच्या बाह्यभागावर विष्णूच्या प्रतिमांनाही महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. या शिल्पसंपदेतून मध्ययुगीन महाराष्ट्रातील धार्मिक विश्व एका बंद चौकटीत अडकलेले नव्हते, हेच जाणवते.
 
मंदिराचे मूळ शिखर आज अस्तित्वात नाही. अभ्यासकांच्या नोंदीनुसार, नंतर अहिल्याबाई होळकरांनी १८व्या शतकात विटा आणि चुन्यामध्ये शिखराची पुनर्बांधणी केली. त्यामुळे आज आपण पाहतो त्या मंदिरात, दोन वेगवेगळे काळ एकाच वेळी उभे आहेत खाली मध्ययुगीन दगडी स्थापत्य आणि त्यावर नंतरच्या काळातील पुनरुज्जीवनाची खूण.
 
पण, औंढा नागनाथचा सर्वांत वेगळा अनुभव मंदिराच्या आत आहे. गर्भगृहात प्रवेश केल्यावर, ज्योतिर्लिंग नेहमीच्या पातळीवर दिसत नाही. त्यासाठी मुख्य मंडपाच्या पातळीखाली असलेल्या छोट्या जागेत उतरावे लागते. छत कमी असल्यामुळे भाविकाला वाकून, जवळजवळ नम्र होतच पाताळलिंगाचे दर्शन घ्यावे लागते. संशोधकांनी येथे एक रोचक शक्यता मांडली आहे. मंदिराची खालची पातळी मूळ गर्भगृहाची असावी आणि नंतरच्या अस्थिर काळात शिवलिंगाचे संरक्षण करण्यासाठी, त्यावर दुसरी पातळी निर्माण करण्यात आली असावी. हे आजवर निश्चितपणे सिद्ध झालेले नसले, तरी मंदिराच्या असामान्य रचनेचे संभाव्य स्पष्टीकरण म्हणून ही मांडणी महत्त्वाचीच ठरते.
 
औंढ्याची खरी कथा मात्र दगडातून माणसाकडे वळते, ती नाथ आणि भक्ती परंपरेतूनच! मंदिराच्या शिल्पांमध्ये अनेक योगी-सिद्धांच्या प्रतिमा दिसतात; अगदी मत्स्येंद्रनाथाची लहान प्रतिमाही ओळखण्यात आली आहे. संशोधिका कुमुद कानिटकर यांनी औंढ्याच्या शिल्पयोजनेत एक महत्त्वपूर्ण परिवर्तन पाहिले, ते म्हणजे ज्ञानमार्गाकडून भक्तिमार्गाकडे जाणारा प्रवास!
 
देवाच्या निर्गुण, अव्यक्त स्वरूपाचा बौद्धिक आणि योगिक शोध एका बाजूला; तर सामान्य भक्ताला सगुण देवाशी थेट जोडणारी भक्ती दुसर्‍या बाजूला. औंढ्याच्या शिल्पविश्वात या दोन्ही प्रवाहांचे सहअस्तित्व दिसते. याच ठिकाणी संत नामदेव आणि विसोबा खेचर यांची परंपरा, औंढ्याला महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीशीही जोडते. ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून नामदेवांनी विसोबा खेचरांना गुरू म्हणून स्वीकारण्यासाठी, औंढ्याला भेट दिल्याची कथा प्रसिद्ध आहे. एका कथेत नामदेवांना मंदिराच्या मागील बाजूस जाऊन भजन करण्यास सांगितले आणि त्यांच्या निर्मळ भक्तीपुढे, मंदिरानेच आपली दिशा बदलली असेही सांगितले जाते.
 
कदाचित म्हणूनच, औंढा नागनाथचे महत्त्व केवळ ज्योतिर्लिंगाच्या यादीत शोधणे अपुरे ठरणार आहे. हे मंदिर महाराष्ट्राच्या धार्मिक विचारांमध्ये घडत गेलेल्या एका मोठ्या बदलाचेच साक्षीदार आहे. शैव सिद्धान्ताचे आचार्य, योगी आणि नाथसिद्ध यांच्यापासून संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि विसोबा खेचरांच्या भक्तीपर्यंतचा प्रवास, येथे एका मंदिराभोवती एकत्र येतो. श्रावणात औंढा नागनाथला गेल्यावर, म्हणूनच केवळ बेलपत्र वाहून आणि अभिषेक करून परत येऊ नये.
 
मंदिराभोवती सावकाश प्रदक्षिणा घालावी. हत्तींच्या रांगा पाहाव्यात, कैलास हलवणारा रावण शोधावा, भैरव आणि सदाशिवाच्या प्रतिमांसमोर थांबावे आणि मग त्या लहानशा पाताळगर्भगृहात उतरावे. बाहेर आल्यावर मंदिराच्या मागील बाजूस जाऊन नामदेवांची कथाही आठवावी.
 
तेव्हाच कदाचित, औंढ्यात आपल्याला एका वेगळाच शिवाचे दर्शन होईल जो केवळ गर्भगृहातच नाही, जो केवळ ज्योतिर्लिंगात नाही; तर योगींच्या ज्ञानात, संताच्या अभंगात आणि सामान्य भक्ताच्या निर्मळ भावातही आहे. देवाच्या दर्शनासाठी आपण मंदिराकडे जातोच; पण भक्ती खरी असेल, तर कधीकधी देवच भक्ताकडे वळतो; औंढा नागनाथची खरी कथा कदाचित हीच आहे.

- इंद्रनील बंकापुरे




संबंधित मजकूर