दोन पिढ्यांतील विचारांचा संघर्ष ‘समर्थ’

    16-Aug-2026
 
Samarth Marathi Movie Review
 
मराठी सिनेसृष्टीत आध्यात्मिक आणि ऐतिहासिक चित्रपटांची नेहमीच चलती असते. नुकतीच ‘देऊळबंद २’ने १०० कोटींची झेप घेऊन मराठी सिनेमाला नवी स्वप्ने दाखवली. आता श्रीस्वामी समर्थांच्या विचारांची अनुभूती घेतल्यावर रामदास स्वामींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी, ‘समर्थ’ हा उत्तम चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाला आहे. ‘समर्थ’ दोन पिढ्यांमधील वैचारिक संघर्ष आणि समर्थ रामदास स्वामींच्या विचारांवर आधारित एक भावनिक व आध्यात्मिक प्रवासावर तुम्हाला घेऊन जाईल.
 
मर्थविचारांनी अनेक पिढ्यांना जीवन जगण्याची प्रेरणा दिली. त्याच विचारांचा आधुनिक संदर्भात अर्थ उलगडण्याचा प्रयत्न ‘समर्थ’ या चित्रपटातून करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा एका तरुण सिव्हिल इंजिनिअर असलेल्या समर्थ (भूषण प्रधान )च्या आयुष्याभोवती फिरते. त्याच्या आयुष्यात अचानक एक मोठे संकट येते. एका बाजूला अध्यात्माकडे झुकणारे वडील (पुष्करराज चिरपुटकर), समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा वारसा जपणारे त्यांचे विचार; तर दुसरीकडे आधुनिक व व्यावहारिक विचारसरणीचा मुलगा, ज्याचा या विचारांना तीव्र विरोध असतो.
 
संकटांनंतर नायक स्वतःच्या भूतकाळाचा पुन्हा शोध घेऊ लागतो, अशी साधारणतः चित्रपटाची मध्यवर्ती कथा. आता नायकाच्या आयुष्यात नेमके काय संकट येते? तो त्यावर कशी मात करतो? अध्यात्माचे विचार त्याला पटतात का? याची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘समर्थ’ चित्रपट बघावाच लागेल.
 
आयुष्याच्या एका टप्प्यावर अध्यात्माचा स्वीकार करणारे वडील आणि त्यांच्या विचारांना विरोध करणारा मुलगा यांच्यातील संघर्ष या चित्रपटात अधिक ठळकपणे समोर येतो. बदलत्या काळात नात्यांमधील संवाद कसा हरवत चालला आहे, कुटुंबात निर्माण होणारा दुरावा किती खोलवर जातो आणि अशा वेळी समर्थ रामदास स्वामींची शिकवण माणसाला स्वतःकडे नव्याने पाहण्याची शक्ती कशी देते, याची भावनिक आणि प्रेरणादायी गोष्टच दिग्दर्शक योगेश फुलपगार यांनी उत्तम पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे.
 
नात्यांतील ताण, दोन पिढ्यांतील विचारांचा संघर्ष आणि समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीतून आयुष्याला मिळणारी नवी दिशा यांचा प्रभावी संगम, प्रेक्षकांच्या अंतर्मनाला नक्की स्पर्श करेल. ‘समर्थ’ हा चित्रपट आजच्या पिढीसमोर उभ्या असलेल्या अनेक प्रश्नांकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतो. समर्थ रामदास स्वामींचे विचार हे आजच्या काळातही तितकेच प्रेरणादायी आहेत, हे ठसठशीतपणे तरुणाईवर बिंबवण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो. हा चित्रपट दोन पिढ्यांमधील संवाद पुन्हा सुरू करण्याचाही संदेश देतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यात हरवत चाललेली नाती, संस्कार आणि जीवनमूल्ये यांची नव्याने जाणीव या चित्रपटात करून देण्यात आली आहे. कुटुंबातील भावनिक क्षण आणि रामदास स्वामींच्या विचारांची आजच्या पिढीशी केलेली जोड प्रेक्षकांच्या लक्षात राहते.
 
अभिनेता म्हणून भूषण प्रधानसाठी हा चित्रपट नक्कीच ‘गेम चेंजर’ ठरू शकतो. आतापर्यंतची भूषणने साकारलेली ही कठीण भूमिका आहे. पुष्कराजने नेहमीप्रमाणेच धीरगंभीर भूमिकेत जीव ओतला आहे. त्याची भावनिक दृश्ये नक्कीच प्रेक्षकांचे डोळे ओले करतात. इतक्या ताकदीनेच पुष्कराज भूमिका साकारली आहे. शर्वरी जमेनीस उत्तम! ती बर्‍याच प्रसंगात केवळ नजरेतूनच बोलली आहे. हार्दिक जोशी, ईशा केसकर, निखिल राऊत, प्रसाद खांडेकर, राजन भिसे अयान दरेकर या सगळ्यांनीच आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.
 
दिग्दर्शक योगेश फुलपगार यांनी रवींद्र पाठक यांच्या कथेला उत्तम पद्धतीने न्याय दिला आहे. चित्रपटातील बरेच प्रसंग उत्तम जमून आलेत. विशेषतः वडील आणि मुलामधील बरीच दृश्ये हृदयाला स्पर्श करणारी आहेत. विशेषतः भूतकाळातील आठवणींना उजाळा देणारे प्रसंग मनोरंजक वाटतात. फक्त ‘एडिट टेबल’वर सिनेमा अजून १५ मिनिटे कमी केला असता, तर अजून चटपटीत झाला असता.
 
केदार पंडित आणि रोहित राज यांचे संगीतही उत्तम असून, ‘वाट गवसली’, ‘मुखी नाम आणि वेड मन’ ही गाणी ऐकायला आणि बघायलाही छानच वाटतात. सिनेमाचे कॅमेरावर्क कमाल झाले आहे. अर्थात, अथीत नाईक यांनी कोकण कॅमेर्‍यामध्ये उत्तम टिपलेय. एकूणच काय, तर ‘समर्थ’ हा रामदास स्वामींच्या विचारांनी अंतर्मुख करायला लावणारा चित्रपट असून, आपल्या कुटुंबासोबत बघावा असा आहे.
 
निर्माता : थर्मोलाईन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए-३ इव्हेंट्स अ‍ॅण्ड मीडिया सर्व्हिसेस
दिग्दर्शक : योगेश फुलपगार
कलाकार : भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनीस, हार्दिक जोशी, ईशा केसकर, निखिल राऊत, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, अयान दरेकर
- कपिल देशपांडे




संबंधित मजकूर