'आवारापन २' अपेक्षाभंग

    16-Aug-2026
 
Awarapan 2 Movie Review

२००७ मध्ये आलेल्या ‘आवारापन’ने, इम्रान हाश्मीसाठी त्याची भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिमा बदलण्याचे काम केले. तेव्हा ‘आवारापन’ बॉस ऑफिसवर फारसा चालला जरी नसला; तरीही ‘तेरा मेरा रिश्ता’ आणि ‘तो फिर आओ’सारख्या गाण्यांमुळे त्याला नंतर ‘कल्ट लासिक’चा दर्जाही मिळाला. आता १९ वर्षांनंतर भट्ट कॅम्पने ‘आवारापन २’द्वारे, त्याच ‘नॉस्टॅल्जिया’चा फायदा पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण, ‘शिवम पंडित’च्या भूमिकेत इम्रान हाश्मीचे दमदार पुनरागमन होऊनही, हा चित्रपट तितकासा छाप पाडताना नाही.
 
मागचा चित्रपट जिथे संपतो, तिथूनच या चित्रपटाची कथा पुढे सुरू होते. शिवम पंडित (इम्रान हाश्मी) मृत्यूला चकवून अज्ञातवासात जगत असतो. पण, भारतीय इंटरपोल अधिकारी समर्थ (अतुल कुमार) त्याचा शोध घेतो, आणि बँकॉकमध्ये कार्यरत असलेल्या बाल तस्करीच्या टोळीत अडकलेल्या निष्पाप मुलांना वाचवण्यासाठी मदत मागतो. या मुलांमध्ये अनाथ आलियाही (मायरा) असते, जिच्याशी शिवमचे एक घट्ट नाते आहे. हे समजल्यावर तो आपला जीव या मोहिमेसाठी धोक्यात घालतो. आता आलियाशी शिवमचे नेमके नाते काय? या मोहिमेत त्याला कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो? या सगळ्यामागे नेमका कोणाचा हात असतो? हे जाणून घेण्यासाठी, तुम्हाला ‘आवारापन २’ बघावा लागेल.
 
इम्रान हाश्मी हाच या चित्रपटाची सगळ्यात मोठी ताकद आहे. त्याने शिवम पंडितची भूमिका जबरदस्त ताकदीने साकारली आहे. मात्र, बिलाल सिद्दिकी आणि विशेष भट्ट यांची कथा, इम्रानच्या अभिनयाला अपेक्षित न्याय देण्यास समर्थ ठरलेली दिसत नाही. त्यांनी अ‍ॅशन-पॅक गँगवॉर, भावनिक कौटुंबिक नाट्य आणि अपूर्ण प्रेम यांसारख्या घटकांचा समावेश करून, एक मास एंटरटेनर निर्मितीचा प्रयत्न केल्याचे चित्रपट पाहिल्यावर जाणवते. मात्र, त्यांचे हे मिश्रण प्रेक्षकांचा भ्रमनीरास करणारे ठरते.
 
चित्रपटाची पटकथाच कमकुवत असून, त्यात कोणतेही ‘थ्रिल’ असल्याचे दिसत नाही. मुळातच १९ वर्षांनंतर या चित्रपटाचा ‘सिक्वेल’ आणताना निर्मात्यांनी असलेली मोठीच संधी गमावली आहे. चित्रपटाची सुरुवात दणयात होते; पण पुढे मात्र तीच लय सांभाळताना उडालेली तारांबळ सहज लक्षात येते. त्यामुळे जसजसे चित्रपटाचे कथानक पुढे सरकते, तसे हळूहळू सिनेमा रुळावरून घसरु लागतो. सध्या एक म्हण चांगलीच प्रचलित झाली आहे, ‘अख्खा बॉलीवूड एक तरफ और अकेला इम्रान हाश्मी एक तरफ!’ या चित्रपटातही तेच प्रकर्षाने जाणवते. कारण, इम्रान सोडल्यास इतर कोणाचाच विशेष प्रभाव, चित्रपटात जाणवत नाही.
 
नितीन कक्करचे दिग्दर्शनही सामान्य दर्जाचेच आहे. गडद रंगसंगती, पावसातील अ‍ॅशन, जुन्या चित्रपटांमधील फुटेजचा वापर, हे सर्व मागील चित्रपटाची लोकप्रियता ’कॅश’ करण्यासाठी केलेले स्पष्ट जाणवते. शिवाय, मूळ ‘आवारापन’ची सगळ्यात मोठी ताकद त्यातील गाणी होती. ज्या जुन्या गाण्यांचा वापर सिनेमात करण्यात आला आहे, तीच फक्त ऐकावीशी वाटतात. बाकी एकही नवे गाणे लक्षात राहण्याजोगे झालेले नाही.
 
चित्रपटामध्ये इम्राननंतर जर कोणाची भूमिका जबरदस्त झाली असेल, तर ती दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांची. पण, त्यांना स्क्रीन टाईमच कमी असल्यामुळे तिथेही चाहत्यांची निराशाच होईल. दिशा पाटनीने इतर सिनेमाप्रमाणे, या सिनेमातही ग्लॅमरचे काम चोख बजावले आहे. बाकी अभिनयाच्या बाबतीत न बोललेलेच बरे. इतर कलाकारांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकेत जीव ओतण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला आहे पण, पटकथेतील त्रुटींमुळे त्यावरही पाणीच फेरले गेले. एकूणच काय, तर खूप जास्त अपेक्षा तुम्ही हा सिनेमा बघायला घेऊन जाल; तर तुमचा अपेक्षाभंग होईल. बाकी इम्रान हाश्मीचे फॅन असाल, तर निश्चितच सिनेमा तुम्ही एन्जॉय कराल.

निर्माता : मुकेश भट, विशेष भट
दिग्दर्शक : नितीन कक्कर
कलाकार : इम्रान हाश्मी, दिशा पाटनी, शबाना आजमी,पुरन गब्बी, सुविंदर विक्की
 
- कपिल देशपांडे 




संबंधित मजकूर