रेल्वे, आधुनिक महामार्ग आणि घरांपर्यंत सुविधा; विकसित भारताच्या संकल्पाला पायाभूत विकासाची गती

Narendra Modi Red Fort Speech
 
मुंबई : (Narendra Modi Red Fort Speech) २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग देणे आवश्यक असून, रेल्वे, आधुनिक महामार्ग, सार्वजनिक वाहतूक आणि सर्वसामान्यांसाठी घरांची उभारणी या क्षेत्रांत गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्याहून भारतीयांना संबोधित केले. गेल्या दशकात देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाने अभूतपूर्व वेग घेतल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आधुनिक पायाभूत सुविधांसाठी मेट्रोचा विस्तार, सार्वजनिक वाहतुकीला बळकटी तसेच वेगवान आणि सुलभ कनेक्टिव्हिटीवर सरकारने भर दिल्याचे त्यांनी सांगितले.(Narendra Modi Red Fort Speech)
 
रेल्वे विद्युतीकरणाला विक्रमी गती
 
रेल्वेच्या विद्युतीकरणाचा वेग हा देशाच्या पायाभूत विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. १९२५ मध्ये रेल्वे विद्युतीकरणाला सुरुवात झाली; मात्र त्यानंतरच्या सुमारे ९० वर्षांत केवळ ३० टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले होते. गेल्या दशकात उर्वरित कामाला मोठी गती देत देशाने शंभर टक्के विद्युतीकरणाचे लक्ष्य पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे डिझेलवरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच पर्यावरणालाही फायदा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर भारताने हायड्रोजनवर चालणारी रेल्वे सुरू करून नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही पाऊल टाकल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आधुनिक, पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाधारित रेल्वे व्यवस्था विकसित भारताच्या प्रवासातील महत्त्वाचा आधार ठरणार असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.(Narendra Modi Red Fort Speech)
 
आधुनिक महामार्गांपासून मल्टिमोडल कनेक्टिव्हिटीपर्यंत
 
विकसित भारतासाठी देशातील कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि अखंडित करण्यावर भर देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. ‘गतिशक्ती’ला विकसित भारताच्या सात प्रमुख शक्तींपैकी एक म्हणून मांडताना शहरांना हायस्पीड रेल्वेने जोडणे, आधुनिक महामार्ग उभारणे, अंतर्देशीय जलमार्ग विकसित करणे, विमानतळांची क्षमता वाढवणे आणि मल्टिमोडल लॉजिस्टिक व्यवस्था उभारणे यावर त्यांनी विशेष भर दिला. देशातील बंदरांचा केवळ माल चढ-उतारासाठी वापर न करता ‘पोर्ट-लेड डेव्हलपमेंट’च्या माध्यमातून आर्थिक विकासाची केंद्रे म्हणून त्यांचा विकास करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे रस्ते, रेल्वे, जलमार्ग, विमान वाहतूक आणि बंदरे यांना एकमेकांशी जोडणारी एकात्मिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचा सरकारचा दृष्टिकोन अधोरेखित झाला.(Narendra Modi Red Fort Speech)
 
गरीबांसाठी घरांची उभारणीही वेगवान
 
पायाभूत सुविधांसोबतच सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांवरही सरकारने लक्ष केंद्रित केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या दशकात गरीबांसाठी घरे बांधण्याच्या कामाला पूर्वीपेक्षा तीनपट अधिक वेग देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर नळाद्वारे पाणी, गॅस जोडणी आणि स्वच्छतागृहांच्या निर्मितीलाही वेग देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांच्या म्हणाले , विकसित भारताचा अर्थ केवळ मोठे प्रकल्प किंवा वेगवान आर्थिक विकास नसून विकासाचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे हा आहे. सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि घरांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्याशिवाय विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.(Narendra Modi Red Fort Speech)
 
'गतिशक्ती’तून विकासाचा नवा वेग
 
रेल्वे, महामार्ग, मेट्रो, विमानतळ, जलमार्ग आणि बंदरे यांना एकात्मिक पद्धतीने जोडून देशाच्या आर्थिक क्षमतेला चालना देण्याचे धोरण पंतप्रधानांच्या भाषणातून स्पष्ट झाले. पुढील काळात पायाभूत सुविधांचा विकास हा केवळ वाहतूक सुधारण्यासाठी नव्हे, तर उद्योग, रोजगार, व्यापार आणि सर्वसामान्यांच्या जीवनमानात सुधारणा घडविण्यासाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे. २०४७ च्या विकसित भारताच्या दिशेने पुढील काही वर्षांत मागील अनेक दशकांत प्रलंबित राहिलेली कामे वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला.(Narendra Modi Red Fort Speech)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर