एनएफडीसी-एनएमआयसीतर्फे तीन दिवसीय ‘हर घर तिरंगा’ देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

    15-Aug-2026   
NFDC NMIC Har Ghar Tiranga Film Festival
 
मुंबई : (NFDC NMIC Har Ghar Tiranga Film Festival) नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी) आणि नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (एनएमआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सहकार्याने आयोजित तीन दिवसीय ‘हर घर तिरंगा’ देशभक्तीपर चित्रपट महोत्सवाचे आज मुंबईतील एनएमआयसी सभागृहात उद्घाटन करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार आणि प्रसिद्ध अभिनेते शरद केळकर यांच्या हस्ते पारंपरिक क्लॅपबोर्ड वाजवून महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जतन करण्यात आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या त्यागाची प्रेरणा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यात चित्रपट माध्यमाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
 
एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे भारताचा राष्ट्रीय अभिमान, सांस्कृतिक वारसा आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. प्रकाश मगदूम यांच्या नेतृत्वाखाली, तसेच महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन आणि एनएमआयसीच्या संपूर्ण टीमच्या मार्गदर्शन व सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.(NFDC NMIC Har Ghar Tiranga Film Festival)
 
महोत्सवासाठी चित्रपटांची निवड आणि संकलन (क्युरेशन) एनएमआयसीचे उपमहाव्यवस्थापक सत्यजित मांदले यांनी केले असून, भारतीय चित्रपटसृष्टीच्या विविध कालखंडांतील चित्रपट आणि माहितीपटांचा समावेश असलेली वैविध्यपूर्ण मालिका त्यांनी सादर केली आहे. या निवडीमध्ये फिल्म्स डिव्हिजन निर्मित माहितीपटांसह क्रांती, सात हिंदुस्तानी यांसारखे अभिजात चित्रपट आणि उरी : द सर्जिकल स्ट्राइक यांसारख्या समकालीन चित्रपटांचाही समावेश आहे.(NFDC NMIC Har Ghar Tiranga Film Festival)
 
भारतीय स्वातंत्र्यलढा, राष्ट्रीय अभिमान आणि देशभक्तीची भावना अधोरेखित करणारे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणणे, तसेच विशेषतः युवा पिढीला चित्रपटांच्या माध्यमातून भारताचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा यांच्याशी जोडणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. हा तीन दिवसीय चित्रपट महोत्सव १६ ऑगस्ट पर्यंत एनएमआयसी सभागृहात सुरू राहणार असून, सर्व चित्रपटांचे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आणि खुले आहे.(NFDC NMIC Har Ghar Tiranga Film Festival)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर