नाशिक (Nashik Development Roadmap) : शेतकरी, युवक, महिला, पर्यटन, पर्यावरण आणि सिंहस्थ कुंभमेळा या सर्व क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून नाशिकच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप तयार करण्यात आला असून, आगामी काळात विकासकामांचा वेग आणखी वाढविण्यात येणार असल्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी नाशिकच्या विकासाच्या विविध योजनांची आणि आगामी प्रकल्पांची माहिती दिली.
२० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ
शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगत महाजन यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील २० हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पावणेदोनशे कोटी रुपये थेट जमा करण्यात आल्याचे सांगितले. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. (Nashik Development Roadmap)
सौर कृषी वाहिनीत नाशिक राज्यात आघाडीवर
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध करून दिल्याने नाशिक जिल्ह्यात सुमारे ५१५ मेगावॅट सौर वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीज उपलब्ध होण्यास मदत होत असून, या योजनेच्या अंमलबजावणीत नाशिक राज्यात प्रथम असल्याचे महाजन यांनी नमूद केले. (Nashik Development Roadmap)
३३ हजार वनहक्कधारकांना सातबाऱ्यावर हक्क
जिल्ह्यातील ३३ हजार वनहक्कधारकांच्या अधिकार अभिलेखावर म्हणजेच सातबाऱ्यावर नावे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या नोंदीमुळे वनहक्कधारकांना कृषी कर्जासह शंभरहून अधिक शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्यासाठी जिल्ह्यातील अडीच लाखांहून अधिक शेतकरी ‘महाविस्तार’ ॲपशी जोडले गेले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देत कृषी उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (Nashik Development Roadmap)
‘शिव मार्ग’ आणि ‘राम मार्ग’ने आध्यात्मिक पर्यटनाला नवी दिशा
नाशिकच्या धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच ‘शिव मार्ग’ आणि ‘राम मार्ग’ या विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून शहर आणि जिल्ह्यातील आध्यात्मिक, धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना जोडण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांची सुविधा वाढण्याबरोबरच स्थानिक पातळीवर पर्यटनाधारित रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
‘वीर प्रेरणा स्थळा’ची घोषणा; अभिनव भारत मंदिराचे लोकार्पण लवकरच
क्रांतिकारकांच्या इतिहासामुळे नाशिकला विशेष महत्त्व असल्याचे सांगत महाजन यांनी शहीद जवानांच्या स्मृती आणि त्यागातून युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘वीर प्रेरणा स्थळ’ उभारण्याची घोषणा केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेले अभिनव भारत मंदिर नव्या स्वरूपात उभे राहत असून त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Nashik Development Roadmap)
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा दि. ३१ ऑक्टोबर रोजी शंखनाद होणार असून त्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून तयारीला वेग देण्यात आला आहे. कुंभमेळ्याची कामे पूर्ण झाल्यानंतर नाशिक शहर आणि परिसराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. कुंभमेळा स्वच्छ, हरित, पर्यावरणपूरक आणि भाविकांसाठी आनंददायी करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. (Nashik Development Roadmap)
वारकरी संप्रदायाचा सिंहस्थ कुंभमेळ्यातील सहभाग वाढविण्यासाठी दि. २८ ऑगस्टपासून ‘कुंभ भक्ती संगम’ आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
१३ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार; निफाड ड्रायपोर्टकडून रोजगाराची अपेक्षा
नाशिकमध्ये झालेल्या गुंतवणूक परिषदेत १३ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे करार झाले आहेत. निफाड येथील ड्रायपोर्ट प्रकल्पामुळे हजारो रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असून, नाशिकच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला त्यातून चालना मिळेल, असे महाजन यांनी सांगितले. (Nashik Development Roadmap)
पावणेदोन लाख वृक्षांची लागवड; ‘हरित नाशिक’चा संकल्प
पर्यावरण संवर्धनासाठी ‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमांतर्गत शाळांच्या माध्यमातून पावणेदोन लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ‘उन्नत नाशिक’ अभियानाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवून नाशिकला स्वच्छ, सुंदर आणि हरित जिल्हा बनविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, पाण्याच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ‘कॅच द रेन’ उपक्रमाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये दखल घेतल्याचे सांगत महाजन यांनी नागरिकांनी जलसंधारणाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. (Nashik Development Roadmap)
पोलिस अधिकारी, क्रीडापटू आणि वीर नारींचा गौरव
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुनील कदम आणि संजय वायचळे, राज्य गुप्त वार्ता विभागाचे अपर उपायुक्त भगीरथ देशमुख यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस अकादमीचे अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, तर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांना उत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. (Nashik Development Roadmap)
पराऍथलेटिक्स कॉमनवेल्थ गेम्समध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल दिलीप महादू गावित यांचाही सत्कार करण्यात आला.
सैन्यदलातील दिवंगत शिपाई संतोष डामसे यांच्या पत्नी वीर नारी उषा संतोष डामसे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश व फिजिकल कॅज्युअल्टी आर्थिक मदत, तर दिवंगत नायक सदाशिव अशोक म्हसकर यांच्या पत्नी वीर नारी नीता सदाशिव म्हसकर यांना दोन लाख रुपयांचा धनादेश व आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. (Nashik Development Roadmap)
शेतकऱ्यांच्या कष्टाने, महिलांच्या शक्तीने, युवकांच्या स्वप्नांनी आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीने विकसित नाशिक घडेल. विकसित नाशिकमधून विकसित महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्रातून विकसित भारत घडेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. (Nashik Development Roadmap)
कार्यक्रमास आमदार सरोज अहिरे, महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Nashik Development Roadmap)