स्वातंत्र्यदिनी धारावीतील विद्यार्थ्यांनी रंगवले भविष्याचे चित्र; ‘मेरे सपनों की धारावी २.०’मध्ये ४० हून अधिक शाळांतील १,००० विद्यार्थ्यांचा सहभाग

Dharavi Science Exhibition
 
मुंबई : (Dharavi Science Exhibition) भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त धारावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीतून भविष्यातील धारावीचे चित्र रंगवले. ‘मेरे सपनों की धारावी २.०’ या उपक्रमांतर्गत धारावीतील ४० हून अधिक शाळांमधील १,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी आंतरशालेय चित्रकला स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
 
अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एएनडीपीएल) आणि धारावी सोशल मिशन यांच्या सहभागातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कला, विज्ञान आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील धारावीची संकल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. (Dharavi science exhibition)
 
हरितपट्टे, स्वच्छ परिसर, स्वच्छ ऊर्जा, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी चित्रे, मॉडेल्स आणि वैज्ञानिक प्रकल्प सादर केले. विशेष म्हणजे, यंदा चित्रकला स्पर्धेसोबत विज्ञान प्रदर्शनाची जोड देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी केवळ समस्या मांडण्याऐवजी त्यावरील संभाव्य उपायही सादर केले. ‘मेरे सपनों की धारावी’ उपक्रमाची सुरुवात जानेवारी २०२५ मध्ये झाली होती. गेल्या वर्षीच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर यंदा अधिक व्यापक स्वरूपात उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.(Dharavi science exhibition)
 
नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक आणि ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ अरविंद परांजपे यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. पाणी, कचरा आणि ऊर्जा यांसारख्या विषयांवरील प्रकल्पांमधून त्यांची जिज्ञासा, निरीक्षणशक्ती आणि चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता दिसून येते, असे त्यांनी सांगितले.(Dharavi science exhibition)
 
प्रसिद्ध कलाकार आणि अॅनिमेटर धिमंत व्यास यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमधील अस्सलपणा आणि आशावाद अधोरेखित केला. तर कलाकार वंदना कोरी यांनी धारावीतील मुलांनी भविष्याची कल्पना मांडताना आपल्या परिसराची ओळख कायम ठेवली, याचे कौतुक केले.(Dharavi science exhibition)
 
चित्रकला स्पर्धेतील विजेती यशिका कोरी हिने भविष्यातील धारावीमध्ये अधिक झाडे, बागा, खेळण्यासाठी मोकळ्या जागा आणि चांगली घरे असावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. विज्ञान प्रदर्शनातील विजेता शेख अली याने स्वच्छता, पाणी आणि ऊर्जेच्या समस्यांवर विज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या कल्पनांतून अधिक स्वच्छ, सुरक्षित, हरित आणि संधींनी समृद्ध धारावीचे चित्र या उपक्रमातून समोर आले.(Dharavi science exhibition)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर