स्वातंत्र्याच्या सार्थकतेच्या तीन पूर्वअटी

    15-Aug-2026

Meaningful Freedom

हजारो हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मिळालेले स्वातंत्र्य सार्थकी लावणे हे देखील प्रत्येक भारतीयाचे परम नागरी कर्तव्य. पण, अथक संघर्षानंतर गवसलेले हे स्वातंत्र्य सार्थक करण्याच्या तीन पूर्वअटी आहेत. आज भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने स्वातंत्र्याच्या सार्थकतेच्या या तीन पूर्वअटींचे केलेले हे चिंतन...
 
‘जागृती’ (१९५२) या चित्रपटातील एक गाणे खूप गाजले होते. त्याचे पहिले कडवे असे आहे -
पासे सभी उलट गए दुश्मन की चाल के
अक्षर सभी पलट गए भारत के भाल के
मंजिल पें आया मुल्क हर बला को टाल के
सदियों के बाद फिर उडे बादल गुलाल के
 
दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. कवी प्रदीप यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘सदियों के बाद फिर उडे बादल गुलाल के’ त्याचा अर्थ होतो, इंग्रज येण्यापूर्वीदेखील आपण पारतंत्र्यातच होतो. शेकडो वर्षांनंतर आपण राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झालो. दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपली राज्यघटना स्वीकृत झाली आणि दि. २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेचा अंमल सुरू झाला.
 
संविधानसभेपुढे डॉ. बाबासाहेबांचे दि. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी भाषण झाले. या भाषणात ते म्हणाले, "या देशाने आपले स्वातंत्र्य यापूर्वी अनेकवेळा गमावले आहे. आपापसांतील फितुरीमुळे स्वातंत्र्य गमावले गेले. राजकीय पक्ष देशहितापेक्षा आपल्या पक्षाची विचारसरणी श्रेष्ठ मानू लागले, तर देशाचे स्वातंत्र्य पुन्हा जाईल आणि ते कायमचे जाईल, अशी मला भीती वाटते.” बाबासाहेबांची ही चिंता देशहिताच्या उत्कट भावनेतून आली आहे.
 
कवी प्रदीप यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘सदियों के बाद‘ आपण स्वतंत्र होत आहोत, या स्वातंत्र्याचे सार्थक आपल्याला करायचे आहे. स्वातंत्र्याचा आस्वाद घेणारी ही चौथी पिढी. मागच्या तीन पिढ्यांनी देशाच्या औद्योगिक विकासात खूप मोलाची भर घातली. भारतीय शेतकर्‍यांनी ‘हरितक्रांती’ करून अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण केला. ऊर्जेच्या क्षेत्रात ‘अणुऊर्जा ते सौरऊर्जा’ असा आपला प्रवास. माहिती-तंत्रज्ञान, संगणक युग, डिजिटल युग आणि आता ‘एआय’ युग आपल्या पिढीने वेगाने आत्मसात केले आहे.
 
संरक्षणाच्या क्षेत्रात आपण सक्षम झालेलो आहोत. आपण अणुबॉम्ब तयार करू शकतो, ते वाहून नेणारी क्षेपणास्त्रे आपण विकसित केली आहेत. अवकाशात आपले उपग्रह फिरत आहेत. अत्याधुनिक युद्धनौका, पाणबुड्या तयार करण्यास आपल्याकडे विकसित तंत्रज्ञान आहे. आपली तीनही सेनादले अत्यंत सक्षम आहेत. आपले गुप्तहेर खातेही सक्षम आणि क्रियाशील आहे. जागतिक स्तरावर आपण महासत्ता म्हणून उदय पावत आहोत. तंत्रज्ञान आणि आर्थिक प्रगतीची वृद्धी शासन आपल्या क्षमतेने करीत आहे. पं. नेहरू ते नरेंद्र मोदी अशा शासनकर्त्यांचा हा प्रवास आहे आणि या प्रत्येकाचे देशाच्या विकासात, समृद्धीत फार मोठे योगदान आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी राजकीय विचारसरणीचा विचार न करता, आपण या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले पाहिजे.
 
मिळालेले स्वातंत्र्य सार्थक करण्याच्या तीन पूर्वअटी आहेत; त्या अशा- १) सामाजिक समरसता २) आर्थिक समता ३) घटनात्मक मूल्यांचे काटेकोर पालन. या पूर्वअटींची पूर्तता केवळ शासनाने करायची नसून, समाजाने करायची आहे. समाजाचे घटक म्हणून त्याबाबतीत आपल्या सर्वांची फार मोठी जबाबदारी आहे.
 
‘सामाजिक समरसता’ याचा अर्थ होतो, कोणत्याही प्रकारचे जातिभेद न पाळणे. सर्वांशी समानतेने व्यवहार करणे. अस्पृश्यतेचे कोणत्याही प्रकारे पालन न करणे. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागवणे. व्यक्तीचा दर्जा त्याच्या कामावरून ठरविला जाता कामा नये. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. साफसफाईचे काम प्रयोगशाळेत काम करणार्‍या शास्त्रज्ञापेक्षाही कमी दर्जाचे नसते. या प्रकारची मनोवृत्ती सर्वांची असली पाहिजे.
 
आपली राज्यघटना सांगते, बंधुतेचे आचरण आपण केले पाहिजे. बंधुता याचा अर्थ, आपण सर्व एकाच चैतन्याची विविध रूपे आहोत. ‘जे पिंडी, ते ब्रह्मांडी’ आहे. सृष्टिनिर्माता कोणताही भेदभाव करीत नाही. प्रत्येक जीवाला त्याच्या पद्धतीने जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्याचा आपण सन्मान केला पाहिजे. बंधुतेची भावना याचे दुसरे नाव आहे, राष्ट्रीय भावना. आम्ही सर्व एक आहोत, एकात्म आहोत, एकरस आहोत, ही भावना देशाला ‘राष्ट्र’ बनविते.
 
अशाप्रकारे भावनिक ऐयाने बांधले गेलेले राष्ट्र शेकडो अणुबॉम्बची शक्ती निर्माण करत, ते कधी पराभूत होत नाही. त्याला पराभूत करणे अशक्य असते. ब्रिटन, जपान, जर्मनी, रशिया ही त्याची फार मोठी उदाहरणे आहेत. आपल्या संविधानाचे बंधुतेचे तत्त्व आपण जगले पाहिजे.
 
स्वातंत्र्याचे सार्थक करण्याची दुसरी पूर्वअट आर्थिक समतेची आहे. आर्थिक समता याचा अर्थ, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगता येईल, एवढी अर्थप्राप्ती झाली पाहिजे. हे काम शासन, उद्योजक, व्यापारी, सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि सामाजिक संस्थांचे आहे. केवळ शासन हे काम करू शकत नाही. प्रत्येक उद्योजकाची ही नैतिक जबाबदारी आहे की, त्याने आपल्या कर्मचार्‍यांना सन्मानाने जगता येईल, एवढे वेतन दिले पाहिजे. व्यापार्‍याने केवळ पैशाची हाव न धरता, त्याच्या हाताखाली काम करणार्‍यांच्या सर्वांगीण हिताचीदेखील आस धरली पाहिजे. सेवाभावी संस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक कसे सक्षम करता येतील, याचादेखील विचार केला पाहिजे. महाराष्ट्रात त्याची अनेक मॉडेल्स आहेत. भालिवली येथील ‘सेवा विवेक केंद्र’ हे वनवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या कामात गुंतलेले आहे. छ. संभाजीनगरचा ‘सावित्रीबाई फुले’ प्रकल्प हेच काम करतो आहे. पोपटराव पवार, अण्णा हजारे अशी मोठमोठी माणसे आपल्यापरीनेे हेच काम आपापल्या क्षेत्रात करीत आहेत. त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे.
 
स्वातंत्र्याचे सार्थक करण्यासाठी संविधानिक नीतिमत्तेचे काटेकोर पालन आपण केले पाहिजे. संविधानिक नीतिमत्ता म्हणजे- १) कायद्याचे पालन २) संविधानिक संस्थांचा सन्मान ३) नागरी कर्तव्याचे प्रामाणिक पालन ४) हिंसक मार्गाचा त्याग ५) शांततामय आंदोलन ६) सत्याग्रह बंद इत्यादी मार्गांचा त्याग करणे.
 
घटना समितीच्या अखेरच्या भाषणात डॉ. बाबासाहेब सांगून गेले की, इथून पुढे जर वाईट घडले, तर त्याची जबाबदारी आपल्यावरच येईल; म्हणून व्यक्तिपूजेचा त्याग केला पाहिजे. जाती राष्ट्रविघातक आहेत, त्यातून मुक्त झाले पाहिजेत. धरणे, आंदोलने, हिंसक मार्ग हे सर्व अराजकतेचे व्याकरण आहे, त्यांचा त्याग केला पाहिजे. संविधानिक नीतिमत्ता रुजवावी लागते. राजनेत्यांची त्यातील जबाबदारी फार मोठी आहे. ते जबाबदारी पार पाडतात की, असंविधानिक मार्गानेच वाटचाल करतात, याची समीक्षा आपली आपण केली पाहिजे. आंधळेपणाने कोणत्याही नेत्यांच्या मागे धावत जाण्याची प्रवृत्ती सोडून दिली पाहिजे.
 
कवी प्रदीप यांच्या गीताने आपण लेखाला सुरुवात केली आहे, त्या गीतातील एक कडवे आजच्या ‘जेन-झी’ने काळजीपूर्वक समजून घेण्याचे आहे. ते कडवे असे-
 
दुनिया के दांव पेंच से रखना न वास्ता
मंजिल तुम्हारी दूर हैं लंबा हैं रास्ता
भटका न दे कोई तुम्हें धोके मे डाल के
इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के
हम लायें हैं,
तुफान से कश्ती निकाल के...
 
स्वातंत्र्याचे सार्थक करण्यासाठी आजची जी पिढी आहे, तिने जो वारसा प्राप्त झाला आहे, तो खांद्यावर घेऊन या भावनेने जागृत झाले पाहिजे
 
उठो छलांग मार के आकाश को छू लो
तुम गाड दो गगन में तिरंगा उछाल के|

रमेश पतंगे
९८६९२०६१०१




संबंधित मजकूर