महाडीबीटीवर २९ नवीन योजनांसह आता १०५ योजना; स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने २९ नवीन योजनांच्या लोकार्पण

MahaDBT Portal
 
मुंबई : (MahaDBT Portal) राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर स्वातंत्र्यदिनी नव्याने २९ योजनांचे लोकार्पण (ऑनबोर्डिंग) करण्यात आले. त्यामुळे महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता १०५ झाली आहे.
 
शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्याने या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असून, त्याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. महाडीबीटीची व्यवस्था सुरू झाल्यापासून शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले असून, योजनांचा गैरवापर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.(MahaDBT Portal)
 
सह्याद्री अतिथीगृह येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने २९ नवीन योजनांच्या लोकार्पण (ऑनबोर्डिंग) कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या प्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, माहिती तंत्रज्ञान आयुक्त भुवनेश्वरी पी. तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी प्रमुख उपस्थित होते.(MahaDBT Portal)
 
शासनाच्या ‘सेकंड जनरेशन रिफॉर्म्स’ अंतर्गत महाडीबीटी व्यवस्था अधिक सक्षम, कार्यक्षम आणि विश्वासार्ह करण्याचे काम सुरू आहे. विविध विभागांच्या योजनांचे टप्प्याटप्प्याने ऑनबोर्डिंग करण्यात येत असून, भविष्यात शासनाच्या सर्व प्रमुख योजना या एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये किंवा पोर्टलवर जाण्याची आवश्यकता कमी होऊन सेवा वितरण अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले. आज ऑनबोर्ड करण्यात आलेल्या २९ योजनांमध्ये इतर मागासवर्गीय विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या योजनांचा समावेश आहे.(MahaDBT Portal)
 
महाडीबीटी २.०
 
विविध योजनांसाठी एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा नागरिककेंद्रित एकात्मिक प्रणाली महाडीबीटी २.० ने दिली आहे. सिंगल साइन-ऑन, रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी लाईव्ह डॅशबोर्ड आणि ‘नो युवर बेनिफिट’ यांसारख्या सुविधा या पोर्टलमध्ये उपलब्ध आहेत. महाडीबीटीवर यापूर्वी ७६ योजना कार्यान्वित होत्या. १५ ऑगस्ट २०२६ रोजी आणखी २९ योजनांचा समावेश झाल्याने कार्यान्वित योजनांची एकूण संख्या १०५ झाली आहे. याशिवाय आणखी २३१ योजनांचे काम प्रक्रियेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.(MahaDBT Portal)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर