सारे जहाँ से अच्छा...

    15-Aug-2026   
 
India Independence Day 2026
 
आज हिंदुस्थानचा स्वातंत्र्य दिन! ‘तिरंगा’ आपली आन-बान-शान! तो खाली झुकू नये म्हणून स्वातंत्र्यदिनीच नव्हे; तर आयुष्याच्या प्रत्येक श्वासापर्यंत भारतीय दक्ष असतात. या परिप्रेक्ष्यात पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन जगभरात विनोदाचा विषय ठरला. कारण, दि. १४ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या उपस्थितीत १०० किलोचा मोठा केक कापण्याचा कार्यक्रम होता. त्या केकवर सजावट काय होती, तर पाकिस्तानच्या झेंड्याची. केक कापतानाच तिथे शेकडो लोक गोळा झाले.
 
केक कापत असतानाच, त्यांनी तो अक्षरश: ओरबाडायला सुरुवात केली. हातात मावेल तितका केक ओरबाडून गपागपा खायला लागले. असा हा पाकिस्तान्यांचा स्वातंत्र्य दिन! अर्थात, पाकड्यांनी पाकिस्तानी झेंड्याच्या स्वरूपाचा केक बनवू दे की, पाकिस्तानी झेंड्यालाच कापू दे, आपल्याला काय? मात्र, कधीकाळी पाकिस्तान हा भारताचा भाग होता याची लाज वाटावी, असे सध्याचे पाकिस्तानचे वास्तव!
 
तसेही भारतापासून धर्माच्या नावावर अधर्मी निर्माण झालेला हा देश. त्याचा नकाशा जर पाहिला, तर नेमका कुत्र्याच्या आकाराचा आहे. छे, छे! कुत्रा बिचारा इमानी असतो आणि आहे. पण, पाकिस्तानी धर्मांधांकडून या इमानदारी आणि नीतिमत्तेची अपेक्षा ठेवणे म्हणजे महामूर्खपणा, हे पाकिस्ताननेच स्वतःहून सिद्ध केले आहे.
 
स्वतःच्याच देशातील एका प्रांतावर बलुचिस्तानवर सशस्त्र लढाई पुकारणार्‍या या देशात सदैव अस्थिरता आणि भिकेकंगालीची वृत्ती अबाधित राहिली आहे. देशभरात गृहयुद्ध सुरू असलेला पाकिस्तान एका बाबतीत पुढे आहे, ते म्हणजे जगभरात भीक मागण्यासाठी कटोरा घेऊन फिरण्यामध्ये पाकिस्तानचा हात कुणी धरू शकत नाही. हो, पाकिस्तानी नागरिकही आणखीन एका बाबतीत पुढे आहेत; ते म्हणजे दुसर्‍या देशात शरणार्थी म्हणून किंवा शिक्षण/नोकरीसाठी जायचे आणि शरण दिलेल्या देशालाच अस्थिर करण्याचे प्रयत्न करायचे. जगभराचा दाखला घेतला तर, ‘लव्ह जिहाद’, धर्मांध हल्ले, सांस्कृतिक दहशतवाद यासाठी पाकिस्तानी शरणार्थींचे नाव नेहमीच पुढे!
 
थोडक्यात, भारतापासून फुटून पाकिस्तानने काय मिळवले, तर हे मिळवले. दुसरीकडे लाखो हिंदूंची कत्तल करत पाकिस्तान निर्माण झाला. निर्मितीच अशी घाणेरडी, भयंकर होती की त्यातून विकृतताच जन्माला येणार. पाकिस्तानचा जन्म आणि आजचे तेच अस्तित्व हेच सांगते.
 
असो. सध्या स्वातंत्र्य दिनीच पाकिस्तान देशाअंतर्गत असलेल्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या दोन प्रांतांना पाकिस्तानपासून फुटून निघायचे आहे, म्हणून पाकिस्तान या प्रांतांशीच युद्ध करत आहे. पण, जरा मागोवा घेतले तर कळते की, या दोन प्रांतांत चीनला पाय स्थिर करता आले नाहीत. चिनी नागरिकांवर इथे हल्ले होतात. चीनने या प्रांतांत आर्थिक गुंतवणूक केली. मात्र, इथली जनता त्या गुंतवणुकीचेच नुकसान करत आहे. त्यामुळे चीनचा या दोन प्रांतांवर राग आहेच. चीनला खूश करण्यासाठी पाकिस्तान आपल्याच देशाअंतर्गत असलेल्या भूभागावर हल्ला करत आहे. ‘जसे पेरावे, तसे उगवते,’ त्यामुळे पाकिस्तानचे सध्याचे वास्तव हे पाकिस्तानचेचे कुकर्म!
 
दुसरीकडे बांगलादेशामध्ये काय सुरू आहे? तर तिथेही इंधनाचा तुटवडा, वीजकपात लागू करण्यात आली. रात्री ८ नंतर कोणत्याही रोषणाईला बंदी. भारताने यासाठी मदत करावी, अशी याचना बांगलादेश करत आहे. भारत शेजारधर्म पाळतो, हे काही नवीन नाही. मात्र, याच बांगलादेशातील धर्मांधांनी एक-दोन वर्षांपूर्वी तिथल्या हिंदूंच्या कत्तली केल्या होत्या. भारताविरोधात सूर आळवले होते. भारताने चोख प्रत्युत्तर दिले, तर एक-दोन वर्षांपूर्वी आपण भारताबद्दल काय बोललो, हे बांगलादेश जणू विसरलाच. ही परिस्थिती पाहून वाटते की, काही दिवसांनी अस्थिरता आणि गृहयुद्ध या दोन आघाड्यांवर बांगलादेशही पाकिस्तानची दुसरी आवृत्ती होणार आहे.
 
भारताच्या स्वातंत्र्य दिनी या दोन देशांच्या स्थितीचा आढावा यासाठी की, भारतद्वेष करून त्यांना हातात कटोराच घ्यावा लागणार आहे. तसेच भारताविरोधात कितीही दहशतवाद माजवला, तरी भारतापुढे झुकावेच लागणार. ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ असे काय उगीच म्हटले जाते!




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर