उठा... राष्ट्रवीर हो...

    15-Aug-2026
 
 Captain Chandrashekhar Waralkar
 
चित्रपट पाहताना ‘थलसेने’त जाण्याची झालेली इच्छा महत्त्वाकांक्षेने पूर्ण करणार्‍या आणि निवृत्तीनंतरही पुढील पिढीला ऑफिसर बनवण्यासाठी झटणार्‍या कॅप्टन चंद्रशेखर वारळकर यांचा आजच्या स्वातंत्र्यदिनी हा परिचय...
 
कॅप्टन चंद्रशेखर वारळकर यांचा त्यांच्या कार्यकाळात दहशतवाद्यांशी बरेचदा सामना झाला. पण, म्हणतात ना, गणवेशधार्‍यालाही मन असतेच. त्यांच्या मनात आले, त्या दहशतवाद्यांच्या आईने दहशतवादी जन्माला घालण्याची कामना केली असेल का? तर नक्कीच नाही! मग ते अशा विनाशकारी मार्गावर का बरे गेले असतील? याच तरुण रक्ताला योग्य वयात अचूक दिशा देत, सैन्यात ऑफिसर होण्यास प्रेरित करण्याचे शिवधनुष्य ‘शत्रुजीत अ‍ॅकेडमी’च्या माध्यमातून कॅ. चंद्रशेखर यांनी उचलले.
 
परंतु, कॅ. चंद्रशेखर यांच्या बालपणी अशा कोणत्याही अ‍ॅकेडमी उपलब्ध नव्हत्या. त्यांचे कुटुंबही अगदी मध्यमवर्गीयच. शाळेतील स्काऊट गाईड, मल्लखांब, मिलिटरी बॅण्ड अशा अनेक अभ्यासेतर उपक्रमांमध्ये ते आघाडीवर असत. त्या ऊर्जेला दिशा मिळाली, ती दहा-बारा वर्षांचे असताना पाहिलेल्या ‘हकीकत’ आणि ‘प्रहार’ या चित्रपटांमुळे. चंद्रशेखर यांनी ते चित्रपट केवळ पाहिले नाहीत, तर त्यांचा बारकाव्यांसह अभ्यास केला, त्यावर मनन केले आणि आपणही ‘थलसेने’त ऑफिसर व्हायचे, असे मनोमन पक्के केले.
 
१९९० साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर माहिती-तंत्रज्ञानाची साधने कमी असली, तरी चंद्रशेखर यांना नाशिकच्या भोंसला मिलिटरी कॉलेजबद्दल माहिती मिळाली. आईच्या भक्कम पाठिंब्याने त्यांनी तेथे प्रवेशही घेतला. वसतिगृहातील मिलिटरी प्रशिक्षण सुरू झाले आणि तेथील ‘रगड्या’मुळे पहिल्याच आठवड्यात ते रुग्णालयात भरती झाले. परंतु, तेव्हाच ‘आर्मी एनसीसी’साठी निवड होणार होती. मग काय, त्यांनी जिद्दीने त्यात सहभाग घेतला आणि रुग्णालयातून थेट धावण्याच्या परीक्षेत उतरले. चंद्रशेखर यांनी तब्बल दहा किमी पळून, त्यानंतर इतरही शारीरिक तंदुरुस्तीचे निकष पूर्ण करुन ‘एनसीसी’त झेंडा रोवला.
 
‘एनसीसी’मधून ‘राष्ट्रीय कॅम्प्स’ करत त्यांनी महाराष्ट्राचे मानाचे ब्लेझर आणि ‘सुवर्णपदक’देखील मिळवले. ‘रायफल शूटिंग कंटिजेंट’चे कमांडर, ‘ऑब्स्टॅकल्स’चा आजतागायत अभेदित रेकॉर्ड, ‘हॉर्स-रायडिंग टीमलीडर’, राज्यस्तरीय क्रिकेट टीमचे कप्तान असे अष्टपैलुत्व गाजवत चंद्रशेखर यांनी आदर्श आणि शिस्तप्रिय कॅडेट म्हणून अनेक बक्षिसे पटकावली. त्यांच्या ‘कडक’ परेडमुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावरील बर्‍याच सन्माननीय व्यक्तींचे ‘पायलट’ होण्याचाही मान मिळाला. त्याचबरोबर, त्यांनी ‘भोंसला’च्या समृद्ध ग्रंथालयातील पहिले-दुसरे महायुद्ध, संरक्षणशास्त्र यांविषयी संपूर्ण अध्ययन केले. एवढेच नाही, तर शैक्षणिक अभ्यासक्रमातही ते कायमच अव्वल राहिले.
 
तेरावीलाही ‘एनसीसी’चे कॅम्प्स करण्यात गुंग असणार्‍या चंद्रशेखर यांना आईने, "यापुढे वसतिगृहाचे शुल्क परवडणार नाही, तेव्हा पुढील वर्षी ठाण्याला येऊन एखाद्या सामान्य महाविद्यालयात शिकायला लागेल,” असे सांगितले. महाविद्यालय बदलण्यासाठी लागणारे किमान ६० टक्के गुण परीक्षेला एकच महिना बाकी असताना मिळवणे, हे चंद्रशेखर यांच्यासमोरील मोठे आव्हान बनले. पैकी १५ दिवस तर पुस्तके मिळवण्यातच गेले; पण तरीही, उरलेल्या काळात रात्रंदिवस एक करत चंद्रशेखर यांनी अचूक ६० टक्के गुण मिळवत त्यांचे ‘टार्गेट’ अचूक साधले.
 
ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतानाही त्यांचा अधिकांश वेळ ग्रंथालयातच व्यतीत व्हायचा. ‘रायफल शूटिंग’मुळे साधलेल्या कमालीच्या एकाग्रतेने अभ्यास करत ते पहिल्याच प्रयत्नात ‘सीडीएस’ आणि ‘एसएसबी’देखील उत्तीर्ण झाले. ‘एसएसबी’साठी प्रयागराजला असताना कॅ. विक्रम बात्रांची मुलाखत प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभल्याचेही चंद्रशेखर विनम्रतेने सांगतात.
 
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर १९९९ साली चंद्रशेखर एक वर्षासाठी चेन्नईच्या ‘ऑफिसर ट्रेनिंग्स अ‍ॅकेडमी’मध्ये पोहोचले. मिलिटरी कॉलेज, ‘एनसीसी’चा अनुभव, उत्तम परेड आणि कमालीची शारिरीक क्षमता यांमुळे तेथील प्रशिक्षणात चंद्रशेखर नेहमीच आघाडीवर होते. प्रशिक्षणानंतर ऑफिसर्सना त्यांच्या कौशल्यांनुसार ‘रेजिमेंट’ आणि ‘बटालियन’ नेमून दिले जात असे. पण, चंद्रशेखर यांना मात्र केवळ ‘मराठा रेजिमेंट’ आणि त्यातही खडतर जीवन असलेल्या ईशान्य भारतातीलच बटालियनमध्ये प्रवेश हवा होता, अन्यथा, ‘थलसेना’च सोडून जाण्याचा निर्धारही त्यांनी वरिष्ठांसमोर बोलून दाखवला. पण, १५ दिवस धाकधुकीत गेल्यानंतर ते अखेर त्यांच्या उत्तम कामगिरीच्या बळावर ईप्सित स्थळी ‘लेफ्टनंट’पदी रुजू झाले.
 
ईशान्य भारतात सीमेवर नियुक्त असताना, दहशतवाद्यांशी सामना हा तर त्यांचा दैनंदिन जीवनाचाच भाग बनला होता. त्यांनी ‘ऑपरेशन रायनो-II’ आणि ‘ऑपरेशन पराक्रम’मध्येही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. रुजू झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांतच कॅ. चंद्रशेखर यांना दोन ‘गॅलेंट्री अ‍ॅवॉडर्स’ मिळाले. परंतु, काही वैद्यकीय कारणास्तव त्यांनी आपल्या सैन्यातील प्रवास पाच वर्षांच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनवरच थांबवला आणि २००५ साली ते ‘कॅप्टन’पदावरून निवृत्त झाले.
 
पण, गणवेश नसला तरी त्यातील व्यक्ती तर ‘फौजी’च होता; तो स्वस्थ कसा बसेल? त्यांनी त्याच वर्षी आपली ‘शत्रुजीत अ‍ॅकेडमी’ सुरू करत पुढील ऑफिसर्स घडवण्याचा वसा घेतला. आजवर लाखो विद्यार्थी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन ‘सीडीएस’, ‘एसएसबी’, ‘एनडीए’ उत्तीर्ण होत सैन्यात ऑफिसर म्हणून रुजू झाले आहेत. त्यांना त्यांच्या देशसेवेसाठी ‘ठाणेभूषण शौर्य पुरस्कार’ आणि ‘ठाणे युवा पुरस्कारा’नेही गौरवण्यातही आले आहे. आजही जेव्हा त्यांचा एखादा विद्यार्थी सैन्यात ऑफिसर होतो, तेव्हा कॅ. चंद्रशेखर यांना देशकार्यात खर्‍याअर्थी योगदान दिल्यासारखे वाटते. कॅ. चंद्रशेखर वारळकर यांच्याकडून उत्तरोत्तर आणखी ऑफिसर्स घडोत, या दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
 
- ओवी लेले  




संबंधित मजकूर