मंदिरे ही ऐतिहासिक काळापासून श्रद्धेची आणि समरस समाजाची केंद्रे होती. मंदिरांचे कार्य हे केवळ धार्मिकतेवरच आधारित होते किंवा आहे का? तर अजिबात नाही. मंदिरांच्या अंतरात्म्यातला गाभाच निखळ श्रद्धाशील मानवतेचा आहे. त्यामुळे प्रत्येक कालखंडात भारतीय मंदिरांमधून सामाजिक समरसतेची आणि प्रगतीची प्रेरणा दिली गेली. या मंदिरांमुळेच धर्मासाठी, समाजासाठी हिंदू समाज एकवटला. त्यानिमित्ताने या मंदिरांचे सामाजिक समरसतेचे वास्तव मांडणारा हा लेख...
छत्रपती शिवरायांनी अपार शौर्य आणि धैर्यातून हिंदू साम्राज्य उभे केले. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांनी रायरेश्वर मंदिरामध्ये घेतली. तेव्हा त्यांच्यासोबत कोण होते? तर कोणत्याही एका जातीचे नव्हे, तर सोबत होते अठरापगड जातीचे मावळे! या सर्वांना छत्रपतींनी देवाच्या साक्षीने ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन करण्याची सामूहिक शपथ दिली. हिंदवी स्वराज्याचा इतिहास रचणारे मंदिर! रायरेश्वराचे ते मंदिर ऊर्जेचे प्रतीक आहेच; पण समरसतेचे मूल्य जागवणारे ते केंद्र आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनीही उत्तरेकडे काशी विश्वनाथ (उत्तर प्रदेश), पश्चिमेकडे सोमनाथ (गुजरात), पूर्वेकडे जगन्नाथ पुरी (ओडिशा) आणि दक्षिणेकडे रामेश्वरम् (तामिळनाडू) या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे कार्य केले. का? तर देशभरातील हिंदू समान धार्मिकतेने, समाजभावनेने एकत्र राहावा म्हणून! मंदिरांच्या उत्सवांमुळे गावातील गुरव, सुतार, लोहार, कुंभार, माळी आणि वाजंत्री अशा सर्व थरांतील बलुतेदारांना रोजगार मिळत असे आणि आजही मिळत आहे. या आर्थिक साखळीमुळे मंदिराच्या माध्यमातून संपूर्ण गाव, शहर आणि राज्य ही एकमेकांशी जोडली गेली आहेत. ही मंदिरेच होती, ज्यांच्यामुळे परकीयांच्या क्रूर गुलामीमध्येही हिंदू त्यांचा धर्म विसरले नाहीत की, त्यांची सामाजिक नीतिमत्ता विसरले नाहीत.
सगळीच मंदिरे ही समाजाला जोडणारी केंद्रेच. आजही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांत, शहर-गावांत ठिकठिकाणी मंदिरे उभी आहेत. काही भव्य आहेत, तर काही बांधकामाच्या दृष्टीने अगदी छोटी; पण या मंदिराच्या बांधणीमध्ये-निर्मितीमध्ये स्थानिक समाजाचा सहभाग असतो आणि लोकश्रद्धा आहे. ही मंदिरे त्या-त्या ठिकाणी लोकांना एकत्र करतात, जोडून ठेवतात आणि सामूहिक प्रश्नांवर विचार करून मार्ग काढण्यासाठी प्रेरणा देतात. मंदिरे ही समरसतेची केंद्रेच आहेत. नव्हे, मंदिरांच्या आजच्या वास्तवाचे जेव्हा आपण विश्लेषण करतो; तेव्हा जाणवते की, मंदिरे आता केवळ धार्मिक आस्थेची केंद्रे नाहीत; तर ती सर्व समाजाच्या समरसतेची केंद्रे आहेत. यावर काहीजण नक्की म्हणतील की, मंदिरे समरसतेचे प्रतीक कशी असतील? काही वर्षांपूर्वी तर मंदिरांमध्ये मागासवर्गीय समाजाला प्रवेश नव्हता. मग, तिथे समरसता कशी? पण, मंदिरांमध्ये जातिभेद, स्पृश्य-अस्पृश्यता विषमता बाळगणारे लोक हे त्या-त्या परिस्थितीचे मानसिक गुलाम होते आणि त्या मानसिकतेमध्ये कमालीची निर्दयता होती.
मात्र, त्याही काळात देवाच्या दारी सगळ्याच भक्तांची भक्ती ही समानच होती. त्यामुळेच तर संत गोरा कुंभार पंढरपूरच्या विठुरायाबद्दल आणि अर्थोअर्थी मंदिरासंदर्भात म्हणतात-
संत कबीर, संत रोहिदास,
संत चोखामेळा
एकचि विठ्ठल अवघ्यांचा सखा झाला...
तसे पाहायला गेले, तर भारतात अनेक अशी मंदिरे आहेत, जिथे शतकानुशतके मागासवर्गीय किंवा बहुजन समाजातील व्यक्तीच पारंपरिक आणि वंशपरंपरागत पुजारी आहेत. महाराष्ट्राच्या डहाणूमधील महालक्ष्मी मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी हे कोळी (मागासवर्गीय) समाजातील आहेत, तर अंबरनाथच्या ऐतिहासिक शिव मंदिराची देखभाल आणि पूजा पारंपरिकरीत्या कोळी समाजाकडे आहे. महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण आणि स्थानिक देवतांच्या (उदा. ज्योतिबा, खंडोबा किंवा स्थानिक शिव मंदिरे) मंदिरांचे व्यवस्थापन आणि पुजारीपद पारंपरिकपणे गुरव समाजाकडे असते. देशभरात अशी अनेक मंदिरे आहेत, ज्यांचे पुजारी-पुरोहित हे मागासवर्गीय समाजाचे आहेत. पण, हे सत्य कुणीही सांगत नाही. ज्यांना समाजात फूट पाडायची आहे, ते सांगत बसतात की, बघा साडेतीन टक्केवाले ब्राह्मणच पुजारी-पुरोहित आहेत आणि इतर समाजाला पौरोहित्यापासून वंचित केले आहे. आजच्या घडीला अनेक प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या देवस्थानांमध्ये पुजारी किंवा अर्चक म्हणून विविध समाजबांधव कार्यरत आहेत. एका अहवालानुसार, ‘विहिंप’ने देशभरात सुमारे पाच हजारांहून अधिक दलित आणि मागासवर्गीय व्यक्तींना वैदिक पद्धतीने पूजा करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षण घेतलेले बांधव आता अनेक मंदिरांमध्ये पुजारी म्हणून सेवा देत आहेत. एकट्या तामिळनाडूमध्ये असे २ हजार, ५००हून अधिक पुजारी प्रशिक्षित आहेत, तर 'केरळम्'मधील तिरुवनंतपुरम आणि त्रावणकोर देवस्वम बोर्डाने अधिकृत सरकारी धोरणांतर्गत आरक्षण लागू करून ३६हून अधिक बिगर-ब्राह्मण आणि सहाहून अधिक दलित पुजार्यांची सरकारी मंदिरांमध्ये नियुक्ती केली आहे. तामिळनाडू सरकारने ‘सर्व धर्मीय/जातींचे पुजारी’ योजना राबवून मागासवर्गीय, अतिमागास आणि दलित तरुणांना ‘आगमशास्त्रा’चे प्रशिक्षण देऊन मंदिरांमध्ये नियुक्त केले आहे. दूरचे कशाला, आपल्या नाशिकच्या गोदावरीकाठी आणि कोल्हापूरच्या काडसिद्धेश्वरांच्या मठातही ब्राह्मणेतर समाजासाठी पुजारी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला जातो. प्रशिक्षण घेतल्यानंतर ज्यांना मंदिरामध्ये पौरोहित्य करायचे आहे, त्यांना संधीही उपलब्ध झाल्या आहेत. हे सगळे लिहिण्याचे कारण की, मंदिरांमध्ये सर्व समाजाचे सर्वसमावेशक प्रतिनिधित्व वाढले आहे, हे सत्य मांडणे गरजेचे आहे.
असो. समरसता आणि मंदिर हा विषय जेव्हा केव्हा येईल, तेव्हा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे नाव अग्रणीच असेल. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हणत असतानाचा विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याआधी संत चोखामेळा यांच्या समाधीचे दर्शन घेतले जाते. विठ्ठल मंदिराच्या अनुषंगाने विचार केला, तर संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार ते संत जनाई आणि संत मुक्ताई या सगळ्या संतविभूतींनी जातिभेद आणि लिंगभेदापलीकडे जाऊन समान-समरस भक्तीची गाथा निर्माण केली. याच पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या वारीला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणारे हे अठरापगड जातीचे, विविध समाजांचे, विविध आर्थिक आणि शैक्षणिक स्तरांचे लोक वारकरी म्हणून एकत्र आलेले असतात. इथे सगळे भौतिक भेद मिटलेले असतात. केवळ पंढरीच्या विठुरायाचे भक्त आहोत आणि आम्हाला विठ्ठल मंदिरात विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे, ही जाणीव सगळ्यांमध्ये असते. याच परिक्रमेत अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या परिसरात संत गाडगेबाबांनी कीर्तनांद्वारे सामाजिक जागृती केली. त्यांनी मंदिरांचा उपयोग लोकांना एकत्र करण्यासाठी केला, ‘स्वच्छता हीच सेवा आणि भुकेलेल्यांना अन्न द्या’ हा संदेश दिला. त्यांनी मंदिराच्या माध्यमातून अंधश्रद्धा आणि स्वच्छतेविषयी मोठी क्रांती घडवली.
ही जातिपल्याडली एकी समाजाच्या समरसभावाचे प्रतिनिधित्व करते आणि हीच ती समरस भावना निर्माण झाली ती मंदिरांमुळे!
या मंदिरांच्या माध्यमातून अनेक समाजोत्थानाची कार्य होत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे ते आरोग्य सुविधा पुरवणे, असे अनेक समाजोपयोगी कार्य मंदिर व्यवस्थापनामार्फत होत असतात. उदाहरणार्थ, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर असू दे की, शिर्डीचे साई संस्थान असू दे, ही मंदिरे केवळ पूजेपुरती मर्यादित न राहता समाजाच्या अनेक प्रश्नांवर या मंदिरांच्या माध्यमातून काम केले जात आहे. मंदिर स्त्री-भू्रणहत्येविरोधात, तसेच रक्तदान, अवयवदान आणि प्लाझ्मादान यांविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करतात. स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरामध्ये येणार्या लाखो तरुणांना तंबाखू, दारू आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ दिली जाते, तर इस्कॉन मंदिरे प्लास्टिकचा वापर टाळणे, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक जीवनपद्धती यांविषयी शहरांमध्ये मोठी जागृती करतात. पालघरमधील त्यांचे ‘इको व्हिलेज’ हे ग्रामीण विकास आणि पर्यावरणरक्षणाचे उत्तम मॉडेल आहे. अनेक मंदिरे समाजामध्ये धार्मिक नीतिमत्ता, सामाजिक एकता, स्वच्छता, याशिवाय जलसंधारण आणि सेंद्रिय शेती यांविषयी शेतकर्यांमध्ये जागृती निर्माण करत आहेत.
हे सगळे कशासाठी? तर, सर्व समाजाच्या प्रगतीसाठी. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ समाजाला एकाच स्तरावर आणत, त्यांच्यात समाजभाव आणि देशनिष्ठा जागावी म्हणून! मंदिर आणि मंदिरातला देव हे सगळ्या समाजासाठी समान आहेत, हे सत्य समाजाला सांगावे म्हणून!
या पार्श्वभूमीवर २००५ सालची ती ‘समरसता मंचा’ची यात्रा आठवते. ते वातावरण अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक होते. सामाजिक समरसतेची यात्रा नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आली. यात्रेत अनुसूचित जातीचे बांधव सहभागी झालेले. समाजबांधव मंदिराच्या गाभार्यात भक्तिभावाने उभे होते. महंत सुधीरदास पुजारी म्हणाले, "माझे आजोबा रामदास बुवा पुजारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांना मंदिरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले, ही एक अत्यंत मोठी ऐतिहासिक चूक होती. त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. आम्ही या मंदिरामध्ये तुमचे स्वागत करीत आहोत. आपण सगळे एक आहोत,” असे म्हणत त्यांनी बांधवांचे स्वागत केले. आज २१व्या शतकामध्येही दोन समाजाला जोडू पाहणारी ही कृती आणि ते काळाराम मंदिर! खरेच समाजाच्या सहभागितेचा-आस्थेचा मार्ग म्हणजे मंदिर! मंदिरांना समरसतेची केंद्रे म्हणून पाहताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतित पावन मंदिरासंदर्भात जे उद्गार काढले, त्याचा संबंध आजही तितकाच ताजा आहे. ते म्हणाले होते की, "केवळ महार, चांभार किंवा अस्पृश्य समाजच नव्हे; तर संपूर्ण हिंदू समाजच परकीय जोखडामुळे पतित झाला आहे आणि या संपूर्ण हिंदुराष्ट्राला पावन करणारे हे मंदिर आहे.” आता समाजात विशिष्ट समाजाला प्रवेश नाही, ही अमानवी बाब कालबाह्य झाली आहे. संविधानाने आणि प्रत्यक्ष हिंदू समाजाने स्वतःत सकारात्मक परिवर्तन केले आहे. त्यामुळे मंदिर सर्वांसाठी हाच अलिखित नियम सर्वत्र आहे. सर्व समाजाला धर्म-आस्थेच्या बंधात गुंफणार्या मंदिराची व्याप्ती ही नेहमीच सामाजिक समरसतेच्या मंगल भावनेवर कार्यरत आहे. संत ज्ञानेश्वर सांगतात -
जे खळांची व्यंकटी सांडो| तयां सत्कर्मीं रती वाढो|
भूतां परस्परें पडो| मैत्र जीवांचें॥
म्हणजेच, माणसाच्या मनातील भेदभावाची आणि कुटिलतेची व्यंकटी (वाकडेपणा) नष्ट व्हावी, सर्व ‘भूतांमध्ये’ (म्हणजेच, जगातील सर्व प्राणिमात्रांमध्ये आणि मानवांमध्ये) हृदयापासूनचे मित्रत्व निर्माण व्हावे. अर्थात, जिथे निखळ मैत्री असते, तिथे उच्च-नीच किंवा जातीचा भेदभाव टिकू शकत नाही; तर हे जे श्रद्धेचे मैत्र आहे, जे नाते आहे, त्या नात्यातून समरस समाजाचा भक्कम पाया रचणारी मंदिरे! ही मंदिरे समरसतेची केंद्रे आहेत.