भारताच्या महान सनातन संस्कृतीचे चिरंतन वैभव आणि तिचा आत्मा येथील मंदिरांमध्येच वसलेला आहे. इतिहासाच्या उषःकालापासूनच मंदिरे केवळ पूजाअर्चा अथवा धार्मिक कर्मकांडांची केंद्रे राहिली नाहीत; तर ती समाजाच्या आर्थिक, सामाजिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक जीवनाचीही केंद्रबिंदू राहिली आहेत. एखाद्या स्थळी भव्य मंदिराची उभारणी किंवा जीर्णोद्धार होतो, तेव्हा तेथे केवळ एक आध्यात्मिक केंद्रच आकार घेत नाही, तर त्याच्या अवतीभोवती एक जिवंत सामाजिक आणि आर्थिक परिसंस्थाही विकसित होते. २१व्या शतकातील भारतात मंदिरांचा विकास आणि जीर्णोद्धार हा केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर सांस्कृतिक पर्यटनाच्या माध्यमातून, देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना देणारे एक प्रभावी साधन म्हणून उदयास आले आहे. ‘वारसा’ आणि ‘विकास’ या दूरदर्शी संकल्पनेने, भारतात मंदिरविकास आणि पर्यटनवृद्धी यांच्यात एक अभूतपूर्व संतुलन आणि सुसंवाद प्रस्थापित केला आहे.
प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात मंदिरे ही समाजाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संचालनाची केंद्रे होती. चोल, गुप्त, विजयनगर आणि चंदेल या राजवंशांनी उभारलेली विशाल मंदिरे स्थापत्यकलेचे अद्वितीय नमुने होतीच; त्याचबरोबर ती रोजगार आणि व्यापाराचीही प्रमुख केंद्रे होती. मंदिरांच्या परिसरात कारागीर, मूर्तिकार, संगीतकार, नर्तक, व्यापारी, तसेच वाहतूक सेवा पुरविणार्या लोकांची वस्ती असे. मंदिरांच्या कोषातून स्थानिक व्यापार आणि कृषी क्षेत्राला आर्थिक पाठबळही मिळत असे. मंदिरे केवळ प्रार्थनास्थळेच नव्हती, तर पाठशाळा, नाट्यशाळा आणि ग्रंथालये म्हणूनही ती कार्यरत होती. विद्या आणि ललित कलांना तेथे आश्रय आणि प्रोत्साहन मिळत असे. कालौघात परकीय आक्रमणे आणि वसाहतवादी काळातील उपेक्षांमुळे भारताच्या या समृद्ध पायाभूत व्यवस्थेची मोठीच हानी झाली. मात्र, वर्तमानकाळात आधुनिक पायाभूत सुविधांची सांगड घालत मंदिरांचा जीर्णोद्धार करून, त्या प्राचीन वैभवाची पुनर्प्रतिष्ठा करण्याचा प्रयत्न होत आहे.
मंदिर विकासाच्या प्रकल्पांमुळे प्रादेशिक, तसेच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेलाही थेट चालना मिळते. एखाद्या प्रमुख तीर्थक्षेत्राचा कायापालट होतो, तेव्हा त्याचे व्यापक परिणाम पर्यटन क्षेत्रावर दिसतात. मंदिर परिसर आणि मंदिर मार्गिकांचा विकास होतानाच रस्त्यांचे रुंदीकरण, नव्या उड्डाणपुलांची उभारणी, रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण आणि विमानतळांची निर्मिती केली जाते. यामुळे केवळ तीर्थयात्रेकरूंचीच सोय होत नाही, तर संपूर्ण परिसरातील संपर्कव्यवस्थेलाही नवीन बळकटी मिळते. धार्मिक पर्यटनाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे समावेशक विकासाचे प्रारूप. पर्यटनातून निर्माण होणार्या महसुलाचा थेट लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो. हॉटेल्स, घरगुती निवासव्यवस्था, धर्मशाळा आणि उपाहारगृहांची मागणी वाढते. पूजासाहित्य, पितळी मूर्ती, हातमागावरील वस्त्रे, स्थानिक खाद्यपदार्थ आणि स्मृतिचिन्हे विकणार्या छोट्या व्यापार्यांच्या उत्पन्नातही अनेक पटींनी वाढ होते. टॅसी, ऑटोरिक्षा आणि ई-रिक्षाचालकांनाही सातत्याने रोजगार मिळतो. पर्यटक मार्गदर्शक, डिजिटल सेवा पुरवठादार, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षारक्षक आणि कार्यक्रम व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांत कुशल, तसेच अकुशल मनुष्यबळाचीही मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण होते.
भारतात मंदिराधारित सांस्कृतिक पर्यटनाला नवी दिशा देऊन, त्याला जागतिक व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या प्रयत्नांमागे, सरकारची स्पष्ट दृष्टी असून, काशी विश्वनाथ धाम, उज्जैनमधील श्री महाकाल लोक, अयोध्येतील भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिर, तसेच केदारनाथ-बद्रीनाथ धामच्या पुनरुज्जीवनासारख्या प्रकल्पांनी या दृष्टिकोनालाच प्रत्यक्ष आकार दिला. भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि पर्यटनाचा परस्परसंबंध अधोरेखित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, "आपली संस्कृती आणि आपली श्रद्धाकेंद्रे ही जशी दर्शनाची स्थळे आहेत; तशीच ती आपल्या अर्थव्यवस्थेची आणि प्रगतीचीही समर्थ इंजिने आहेत. एखाद्या नव्या धामाची किंवा मार्गिकेची उभारणी होते, तेव्हा त्यासोबत असंख्य नव्या संधींचाही जन्म होतो. ‘वारसा आणि विकास’ हा आपला मंत्रच, भारताला २१व्या शतकात नव्या उंचीवर घेऊन जाईल. या विचारातून एक बाब स्पष्ट होते; ती म्हणजे, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि त्याचा विकास करणे, म्हणजे केवळ भूतकाळाप्रति आदर व्यक्त करणे नव्हे; तर भविष्यातील समृद्धीचा मार्ग प्रशस्त करणे होय.
मंदिर विकासाचा पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होतो, हे भारतातील अलीकडच्या काही महत्त्वपूर्ण उदाहरणांवरून स्पष्टपणे लक्षात येते. वाराणसीतील काशी विश्वनाथ मार्गिकेच्या उभारणीपूर्वी मंदिर परिसराचे क्षेत्रफळ अत्यंत मर्यादित होते. मार्गिकेच्या निर्मितीनंतर यात्रेकरूंना गंगा नदीवरूनच थेट मंदिरापर्यंत पोहोचणे सुलभ झाले. परिणामी, काशीत येणार्या भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. त्यासोबतच वाराणसीतील हॉटेल्स, बनारसी साडी उद्योग आणि नाविकांच्या उत्पन्नातही ऐतिहासिक वाढ झाली. उज्जैनमध्ये श्री महाकाल लोकाची निर्मिती झाल्यानंतर शहराचे संपूर्ण रूपच पालटले. पूर्वी जिथे लोक केवळ काही तासांसाठी उज्जैनला भेट देत, तिथे आता ‘महाकाल लोक’चे वैभव आणि लाईट आणि साऊंड शो कार्यक्रमाचा अनुभव घेण्यासाठी ते एक-दोन दिवस मुक्काम करू लागले आहेत. यामुळे स्थानिक घरगुती निवासव्यवस्था आणि पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली. अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी आणि शहराच्या पुनर्विकासानंतर, अयोध्या जागतिक पर्यटनाच्या नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास आली. आंतरराष्ट्रीय विमानतळ, आधुनिक रेल्वे स्थानक आणि तारांकित हॉटेल्सच्या आगमनामुळे अयोध्या संपूर्ण उत्तर प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेचाच कणा होत आहे.
वास्तविक पाहता, जगभरात धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. व्हॅटिकन सिटी (रोम), मक्का (सौदी अरेबिया) किंवा योटो (जपान) यांसारखी स्थळे हेच दाखवून देतात की, सांस्कृतिक स्थळांचे रूपांतर जागतिक पर्यटनकेंद्रांमध्ये कशा प्रकारे करता येऊ शकते. भारताकडे या देशांच्या तुलनेत कितीतरी अधिक वैविध्य आणि प्राचीन वारसा आहे. दक्षिण भारतातील विशाल आणि भव्य द्रविड शैलीतील मंदिरे (तंजावरचे बृहदेश्वर मंदिर, मीनाक्षी मंदिर), ओडिशातील कोणार्क आणि जगन्नाथ मंदिर, तसेच ईशान्य आणि उत्तर भारतातील शक्तिपीठे; या सर्वांचा आधुनिक पायाभूत सुविधांशी एकात्मिक विकास साधला गेल्यास, भारत जगातील सर्वांत मोठे सांस्कृतिक पर्यटनकेंद्र म्हणून नावारूपाला येऊ शकतो.
मंदिरविकासामुळे पर्यटनात अभूतपूर्व वाढ होत असली, तरी त्यासोबत अनेक आव्हानेही जोडलेली आहेत आणि त्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यकच असेच. तीर्थक्षेत्रांमध्ये, विशेषतः हिमालयीन प्रदेशातील चार धामांसारख्या ठिकाणी, वाढत्या गर्दीमुळे पर्यावरणावर मोठाच ताण पडतो. त्यासाठी पर्यावरणपूरक पर्यटन आणि पर्यटकांच्या वहनक्षमतेच्या व्यवस्थापनासंदर्भातील नियमांचे कठोरपणे पालन होणेही गरजेचे आहे. तीर्थयात्रेकरूंचा अनुभव अधिक सुखकर करण्यासाठी स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, आधुनिक स्वच्छतागृहे आणि कचरा व्यवस्थापन यांची आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यवस्था असली पाहिजे. ऑनलाईन दर्शन आरक्षण, आभासी वास्तव तंत्रज्ञान, गर्दीच्या व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि बहुभाषिक पर्यटक मार्गदर्शक अॅप्सच्या माध्यमातून तीर्थयात्रेकरूंचा अनुभव अधिक सुलभ करता येऊ शकतो. मंदिर परिसराच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत मंदिराचे प्राचीन स्वरूप, त्याचे आध्यात्मिक वातावरण आणि मूळ स्थापत्यकला यांच्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, याचीही दक्षता घेणे तितकेच आवश्यक.
मंदिर विकास आणि पर्यटनवृद्धी हा केवळ इमारती उभारण्याचा विषय नाही; ती भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची वाटचालही आहे. मंदिरे ही आपली ओळख आहेतच, आपल्या कलेची प्रतीकेही आहेत आणि समाजाला एका सूत्रात बांधून ठेवणारी केंद्रेही. आपल्या मंदिरांना आधुनिक सुविधा, स्वच्छता आणि उत्तम संपर्कव्यवस्थेशी जोडताना आपण केवळ आपल्या समृद्ध परंपरांचे भावी पिढ्यांसाठी जतन करत नाही, तर लाखो लोकांसाठी उपजीविकेची नवी दारेही खुली करत असतो. ‘वारसा आणि विकास’ यांचा हा संगम भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासोबतच, ‘विश्वगुरू’ म्हणून पुन्हा प्रतिष्ठित होण्याचा मार्गही प्रशस्त करेल.