धर्माटनातून देशाटनाचा पाया हा मुख्यत्वे श्रद्धास्थळे असलेल्या तीर्थक्षेत्रांवर आणि मंदिरांवर आधारित आहे. पण, प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली मंदिरे म्हणजे केवळ आध्यात्मिक भक्तिभावाचे प्रतीक नाही, तर भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक संचिताशीही या मंदिरांची नाळ वर्षानुवर्षे जोडलेली आहे. त्यानिमित्ताने भारतातील मंदिर संस्कृतीचे शाश्वत दर्शन अधोरेखित करणारा हा लेख...
अफगाणिस्तानने अनेक आक्रमणे, यादवी, दहशतवाद आणि युद्ध अंगावर झेलली. या सगळ्याने घायाळ झालेला तो एक देश. एकेकाळी हा प्रदेश ‘गंधार’ म्हणून ओळखला जात असे. लॅपीस लाजुलीच्या (लाजवर्द) खाणी, बदाम, अंजीर, पिस्ता, अक्रोड आदी सुया मेव्याची निर्यात आणि येथून जाणार्या आंतरराष्ट्रीय मार्गाने होणारा व्यापार, या सगळ्याने हा प्रदेश समृद्ध होता.
गंधार विविध संस्कृतींनी नटला होता. येथे हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ग्रीक धर्माचे लोक वास्तव्यास होते. संस्कृत ग्रंथ ‘फारसी’ आणि ‘अरबी’ भाषेत भाषांतरित करणारा प्रदेश म्हणूनही याची ओळख होती. इथे विविध धर्मांच्या देवतांची मंदिरे होती. सूर्य, शंकर-पार्वती, कार्तिकेय, गणपती आदी देवांची मंदिरे होती. नाथपंथी साधूंचे मठ होते. बुद्धाच्या अनेक लहान-मोठ्या आणि भव्य मूर्ती होत्या. बौद्ध विहार आणि लेणी होती.
मात्र, परकीय सत्तांचे आक्रमण आणि नंतर त्यांचेच राज्य आल्यावर येथील धार्मिक वारसा मोठ्या प्रमाणात नष्ट झाला. मंदिरे, मूर्ती, विहार, स्तूप, गुरुद्वारा, मठ नष्ट होत गेले. उरले केवळ अवशेष. काही भंगलेल्या मूर्ती. अगदी नावालासुद्धा तिथे प्राचीन मंदिर राहिले नाही. मंदिरे नष्ट झाली आणि त्याबरोबर तेथील सांस्कृतिक वारसा नष्ट झाला. आज ‘तालिबान’च्या राजवटीत संगीतावर बंदी आहे. चित्रपटांवर निर्बंध आहेत. स्त्रियांचे शिक्षण, पेहराव आदींवर बंधने आहेत. धार्मिक अल्पसंख्याक असुरक्षित आहेत. २००१ साली बामियान येथील जगप्रसिद्ध बुद्धमूर्ती तोफा डागून उद्ध्वस्त करण्यात आल्या.
स्वतःची सांस्कृतिक ओळख धूसर झाल्याने होरपळलेला देश सांगतो- एखादा देश तेव्हाच जिवंत राहतो, जेव्हा त्याची संस्कृती जिवंत राहते. हे वाय अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संग्रहालयाबाहेर असलेल्या फलकावर लिहिले आहे - - Nation stays alive when its culture stays alive.
अफगाणिस्तानातील ब्रिटिश कौन्सिलचे माजी संचालक पॉल स्मिथ यांनी या देशाच्या पुनरुज्जीवनाबद्दल महत्त्वाचा विचार मांडला आहे. त्यांच्या मते, एखादा देश उभा राहण्यासाठी सुरक्षा, सुशासन, विकास आणि संस्कृती हे चारही स्तंभ मजबूत असले पाहिजेत. जगाने अफगाणिस्तानला पुन्हा उभे राहण्यासाठी तेथील सुरक्षा आणि विकासासाठी मोठी गुंतवणूक केली; पण तेथील संस्कृतीकडे पुरेसे लक्ष दिले नाही. त्यामुळे समाजाचा पाया कमकुवत राहिला.
त्यांनी असेही सांगितले की, अनेक धाडसी अफगाणी नागरिकांनी युद्धाच्या काळात प्राचीन मूर्ती, मातीची भांडी, हस्तलिखिते आणि इतर अमूल्य ठेवा जीव धोक्यात घालून वाचवला. या केवळ जुन्या वस्तू नाहीत, तर त्यामधून देशाची ओळख जपली गेली आहे. पॉल स्मिथ यांच्या मते, संस्कृतीच्या रक्षणाची पहिली पायरी म्हणजे मंदिरे, इमारती आणि पुरातत्त्व स्थळे जपणे होय. दुसरी पायरी म्हणजे, भाषा, संगीत, नृत्य, साहित्य, कला आणि पारंपरिक हस्तकला यांचे जतन. कारण, या सर्व गोष्टी समाजाला त्याची खरी ओळख देतात.
पॉल स्मिथ म्हणतात की, अफगाणिस्तानचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर सर्वांत आधी बामियान येथील बुद्धमूर्ती पुनश्च निर्माण केल्या पाहिजेत. हे कार्य केवळ एका पुतळ्याची पुनर्निर्मिती नसून, त्या देशाच्या आत्म्याला संजीवनी देणारे कार्य ठरेल. (बामियानच्या मूर्ती आपल्या डोळ्यादेखत फोडल्या गेल्या हे जगजाहीर आहे आणि त्या कारणास्तव त्यांनी त्या मूर्ती पुन्हा निर्माण केल्या पाहिजेत, असे सांगितले. पण, ते जर इतिहासाचे खरे अभ्यासक असते; तर त्यांनी पूर्वीची मंदिरे, विहार आणि गुरुद्वारासुद्धा पुन्हा बांधल्या पाहिजेत, असा उल्लेख केला असता. असो.)
थोडक्यात सांगायचे तर आजच्या काळातील एक पाश्चिमात्य तज्ज्ञ सांगतो की, बामियानच्या बुद्धमूर्ती अफगाणिस्तानच्या संस्कृतीचा आत्मा आहेत आणि संस्कृती जपली, ती जीवित ठेवली, तरच देशाला स्वत:ची ओळख मिळते आणि देश जगू शकतो, वाढू शकतो.
भारतीय मंदिरे आणि त्यांचे कार्य
अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहिल्यावर आता आपण भारतीय मंदिरांची ओळख आणि त्यांचे कार्य पाहू. मंदिर हे देवाचे घर आहे, देवालय आहे, ही झाली मंदिराची मुख्य ओळख. पण, मंदिरांचे महत्त्व केवळ धार्मिक नाही, तर ती आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. मंदिरांचे कार्य अनेक अंगांनी चालत असते -
आध्यात्मिक केंद्र : मंदिर हे उपासना चालवण्याचे आणि आध्यात्मिक शिक्षण देणारे केंद्र आहे.
सामाजिक केंद्र : सण, उत्सव कार्यक्रमाकरिता विविध लोकांना एकत्र येण्यासाठी असलेले स्थान आहे. तसेच काही कौटुंबिक कार्यक्रम जसे- विवाह, मुंज इत्यादीचे केंद्र आहे.
सांस्कृतिक केंद्र : मंदिर हे कलांचे आश्रयस्थान आहे आणि संगीत, नृत्य, नाटक इत्यादींसाठी मंच पुरवते. कठपुतळीचे खेळ, चित्रकथीचे खेळ, छाया खेळ या सर्वांसाठी मंदिराचे प्रांगण खुले असे. या सर्व कला ईश्वराची सेवा म्हणून सादर केल्या जात असत. त्यामधून ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘पुराणकथा’ सांगितल्या जात. सामान्य लोकांचे रंजन आणि सोबतच लोकशिक्षण, नीतीची शिकवण दिली जात असे.
शैक्षणिक संस्था : अनेक मंदिरे पाठशाळा म्हणून कार्य करत असत. तिथे भाषा, विज्ञान, गणित आदी विविध विषय शिकवले जात. कैक मंदिरांमध्ये खगोल निरीक्षणे करणारी वेधशाळा असे.
मंदिर ग्रंथालये : अनेक मंदिरे जुन्या हस्तलिखितांची ग्रंथालये सांभाळतात. भक्त आपण लिहिलेल्या पोथी इथे जमा करतात.
आर्थिक केंद्र : एखाद्या मोठ्या मंदिरामुळे ते नगर, व्यापाराचे केंद्र होते. देवदर्शनाला येणार्या यात्रेकरूंमुळे स्थानिक उद्योग आणि हस्तकलेला चालना मिळते. मंदिरांच्या बाहेर अनेक व्यावसायिक दुकाने थाटून आपला चरितार्थ चालवतात.
समाज कल्याण केंद्रे : अनेक मंदिरे अन्नछत्र चालवत, धर्मशाळा चालवत, तसेच चिकित्सालये आणि रुग्णालये पण चालवत असत. मानसिक रुग्णांनादेखील उपचार तिथे दिले जात असत.
कृषी विकासक : दक्षिणेतील काही मंदिरे सिंचन प्रकल्प उभारण्यात मदत करत असत.
वादनिवारण केंद्रे : पूर्वी काही मंदिरांनी त्यांच्या क्षेत्रात कायदा-सुव्यवस्था राखण्याचे कार्यदेखील केले. दोन गटांत काही वैमनस्य असेल अथवा जमिनीवरून वाद असेल, घरातील कलह असतील; तर न्यायनिवडा करून, संबंधित लोकांना उपदेश करून वाद सोडवले आहेत.
प्राणिसेवा केंद्रे : अनेक मंदिरे गोशाळा चालवतात. दक्षिणेतील काही मंदिरांत हत्ती पाळले जातात. या पद्धतीने हत्तींना प्रशिक्षण देण्याची कला जपली. माहूत, हत्तींवर उपचार करणारे वेटर्नरी वैद्य, त्यांचे चारा-पाणी करणारे अशा सर्वांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले.
भारतीय मंदिरांच्या विनाशाची कथा आणि व्यथा
परकीय सत्तेच्या जवळपास एक हजार वर्षांच्या काळात मंदिरांचा विध्वंस झाला. मंदिराला धरून असलेल्या व्यवस्था कोलमडून गेल्या. हा केवळ भौतिक इमारतीचा नाश नव्हता; तो भारतीय संस्कृतीच्या गाभ्यावर झालेला सुनियोजित आघात होता.
सीताराम गोयल यांनी 'Hindu Temples : What Happened to Them' या ग्रंथात तपशीलवारपणे या विध्वंस केलेल्या मंदिरांची यादी केली आहे. भारतभरातील सुमारे तीन हजार नष्ट झालेल्या मंदिरांची त्यांनी नोंद केली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, ही यादी केवळ हिमनगाचे टोक आहे. काही अंदाजांनुसार, या काळात नष्ट झालेल्या मंदिरांची संख्या दहा हजारांहून अधिक असू शकते. ही यादी इस्लामी आक्रमकांनी नष्ट केलेली मंदिरांची यादी. ब्रिटिश राजवटीत मंदिरांवर झालेला हल्ला सूक्ष्म स्वरूपाचा होता. त्यामध्ये मंदिरे चालवत असलेल्या संस्था एकेक करत बंद केल्या.
एका मंदिराचा विध्वंस केल्याने होणारे परिणाम -
आध्यात्मिक हानी : मंदिर फोडल्याने समाजाचा त्याच्या आध्यात्मिक वारशाशी असलेले नाते तुटते.
सांस्कृतिक नुकसान : मंदिर म्हणजे केवळ पूजास्थळ नव्हे, ते कला, साहित्य आणि पारंपरिक ज्ञानाचे भांडार असते. मंदिरांचा विध्वंस म्हणजे स्थानिक कलाप्रकार, तांत्रिक कौशल्ये आणि सांस्कृतिक परंपरांचा नाश.
आर्थिक परिणाम : मंदिरांच्या भोवती एक मोठी आर्थिक व्यवस्था उभी असते- कलाकार, कारागीर, विक्रेते व इतर लहान व्यावसायिकांचा जगण्याचा आधार असते. मंदिरे उद्ध्वस्त केल्याने या सगळ्यांचे रोजगार बुडाले आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढावले.
मानसिक आघात : मंदिरांच्या सातत्याने होणार्या विध्वंसाने हिंदू समाजात भीती निर्माण केली. ही भीती इतकी तीव्र होती की, जेव्हा मंदिर उभारण्याची संधी मिळाली, तेव्हासुद्धा अनेकजण मानसिक आघातामुळे पुढे येऊ शकले नाहीत.
जसे आघात ‘गंधार’ प्रदेशावर झाले, तसेच इथेदेखील झाले. खुद्द दिल्लीमध्ये अनेक शतके एकही नवीन मंदिर बांधले गेले नव्हते. १९३३ मध्ये बांधलेले बिर्ला मंदिर जवळपास ८०० वर्षांनी बांधलेले पहिले मंदिर ठरले. त्यानंतर बांधली गेलेली मोठी मंदिरे आहेत- सोमनाथ मंदिर, अक्षरधाम मंदिरे आणि आता श्रीराम जन्मभूमी मंदिर.
मंदिर बांधून काय मिळाले?
पॉल स्मिथने जे अफगाणिस्तानच्या बाबतीत म्हटले, तेच भारतालाही लागू पडते. अफगाणिस्तानची संस्कृती पुनरुज्जीवित करायची असेल आणि भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर त्यांनी सर्वप्रथम बामियान येथील बुद्धमूर्तींचे पुनर्निर्माण केले पाहिजे, असे म्हटले.
तसेच भारताचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर आपल्या देवतांच्या मूर्ती, देवालये, लेणी यांना सुरक्षित केले पाहिजे. मंदिरांच्या भोवतीने असलेल्या संस्था पुनरुज्जीवित केल्या पाहिजेत- त्यामध्ये पाठशाळा, गायन-वादन शाळा, आखाडे, दवाखाने, गोशाळा, धर्मशाळा, अन्नछत्रे या सर्व संस्थांचे पोषण झाले पाहिजे. त्यासाठी विविध संस्थांनी मंदिरांच्या बरोबर काम करायला हवे.
अर्थात, केवळ मंदिर बांधून उपयोग नाही. आपण प्रत्येकाने आपल्या जवळच्या मंदिरात आठवड्यातून किमान एकदा जाण्याचा नेम केला पाहिजे. मुलांनाही सोबत घेऊन जावे. आरतीच्या वेळी उपस्थित राहावे अथवा थोडावेळ शांतपणे बसून स्तोत्रपठण किंवा नामस्मरण करावे. मंदिरात होणार्या विविध उपक्रमांमध्ये, धार्मिक उत्सवांमध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे. आपल्या वेळेनुसार मंदिरात काही सेवा करावी. तसेच मंदिरात नियमित येणार्या भक्तांशी स्नेहबंध निर्माण करून एक जिव्हाळ्याचा भक्तपरिवार उभा करावा.
यामधून आपल्यावर, मुलांवर धार्मिक संस्कार होतीलच. कदाचित, आपली आध्यात्मिक प्रगतीपण होईल. आपली सांस्कृतिक ओळख जपली जाईल आणि संस्कृतीचे रक्षण केले असता, आपले राष्ट्रसुद्धा सक्षम व बलशाली होईल.