सोमनाथ : ऐतिहासिक जखमांपासून पुनर्वैभवापर्यंत...

    14-Aug-2026

Somnath Temple History

गुजरातच्या समुद्रकिनार्‍यावर स्थित सोमनाथ मंदिर हे आजही कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान. नुकतीच या मंदिरावरील मेहमूद गझनीच्या हल्ल्याला एक हजार वर्षे पूर्ण झाली, तसेच नवीन सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेलाही ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे सोमनाथ मंदिर हे केवळ १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक नसून, भारतीय संस्कृतीच्या स्थित्यंतरातेही प्रतीक आहे. त्यानिमित्ताने सोमनाथ मंदिराचा इतिहास आणि या तीर्थक्षेत्राच्या विकासप्रवाहाचा आढावा घेणारा हा लेख...
 
सनातन धर्मात भगवान श्री शंकर, ब्रह्मदेव आणि भगवान श्री विष्णू हे त्रिमूर्ती. काही अभ्यासकांच्या मते, भगवान श्री शंकर यांच्या उपासनेचा इतिहास हा थेट सिंधु-सरस्वती संस्कृतीपर्यंत मागे जातो, तर काही विद्वानांचे असे मत आहे की, शैव संप्रदायाचे मूळ हे वैदिक धर्मात आहे. भगवान श्री शंकर यांचे पूजन मूर्तीच्या, तसेच शिवलिंगाच्या अशा दुहेरी रूपांत होते. ऐतिहासिक काळातील अनेक पुरातात्त्विक स्थळांवरून शिवलिंगांचे पुरावे सापडले आहेत. ही शिवलिंगे जरी मानवनिर्मित असली, तरी सनातन धर्मात ‘द्वादश ज्योतिर्लिंग’ अशी एक संकल्पना साधारण प्रारंभिक मध्ययुगापर्यंत उदयास आली. ही द्वादश किंवा १२ ज्योर्तिलिंगे स्वयंभू मानली जातात. या द्वादश ज्योतिर्लिंगांची महती अधोरेखित करणारे एक ‘द्वादशज्योतिर्लिंगस्तोत्र’ आद्य शंकराचार्य यांनी रचले आहे, अशी एक मान्यता आहे. या स्तोत्राची सुरुवात ‘सौराष्ट्रे सोमनाथं’ अशी होते. यावरून गुजरात राज्यातील सौराष्ट्र या प्रदेशात ‘श्री सोमनाथ’ या नावाने सुविख्यात असणार्‍या ज्योतिर्लिंगाचे महत्त्व लक्षात येते.
 
सौराष्ट्र या प्रांताचे मूळ नाव हे ‘कुशाव्रत’ असे होते. श्री सोमनाथ हे देवस्थान सौराष्ट्रातील प्रभास येथे स्थित आहे. सनातन हिंदू धर्मात प्रभास हे अत्यंत प्राचीन आणि पावन असे तीर्थक्षेत्र मानले गेले आहे. महाभारत, तसेच ‘स्कंद पुराणा’त प्रभासक्षेत्राच्या धार्मिक महत्त्वाचे वर्णन करण्यात आले. प्रभास या स्थानी सरस्वती नदीचा संगम सागराबरोबर होत असे. या कारणास्तव या स्थानाचे पावित्र्य द्विगुणित झाले होते. सोमनाथ येथील मूळ देवस्थान हे शैव पाशुपत संप्रदायाबरोबर जोडलेले होते. शैवाचार्य सोम शर्मा हे अखेरचे गुरू होते, ज्यांनी प्रभासला भेट दिली आणि ते आपल्या चार पुत्रांसकट तेथेच स्थायिक झाले, अशी नोंद शिवपुराणात सापडते. के. एम. मुन्शी यांच्या मते, सोमनाथ येथील पहिल्या देवस्थानाचा इतिहास इ. स. दुसर्‍या शतकाच्यादेखील पलीकडे जातो. दुर्दैवाने, या देवालयाशी निगडित कोणतेही पुराभिलेख अजून तरी उपलब्ध झालेले नाहीत. साधारण इ.स. ६४०-६४९ या कालखंडात सोमनाथ येथील दुसरे मंदिर बांधण्यात आले. त्यावेळेस गुजरातचा काही भाग हा सम्राट हर्षवर्धन याचा नातू धरसेन चौथा याच्या अधिपत्याखाली होता. या काळातील एक ब्राह्मी लिपीतील पुराभिलेख उत्खननाच्या वेळेस प्रकाशात आला. या द्वितीय मंदिराचे गर्भगृह हे बहुतेक प्रथम देवयालायाच्याच जागी बांधण्यात आले होते. या गर्भगृहासमोर एक खुला सभामंडपदेखील होता.
 
इ.स. आठव्या शतकापासून इस्लामी सत्तांच्या आक्रमणांना सुरुवात झाली. इ.स. ७२५ मध्ये सिंधचा शासनपाल जुनैद याने गुजरात, वर स्वारी केली आणि वलभी या नगराचा संपूर्ण विनाश केला. याच स्वारीदरम्यान सोमनाथ येथील द्वितीय देवालयाची नासधूस होण्याची शयता पूर्णपणे नाकारता येणार नाही. इ.स. ८१५च्या सुमारास गुर्जरप्रतिहार सम्राट नागभट्ट दुसरा याने प्रभास येथे सोमेश्वराचे पूजन केले, असा उल्लेख ‘प्रभावकचरित’ या ग्रंथात सापडतो. या राजाने जेथे भगवान श्री सोमनाथ यांचे दर्शन घेतले, हे मंदिर म्हणजे लाल वर्णाच्या दगडात बांधलेले सोमनाथ येथील तृतीय मंदिर. या मंदिराच्या बांधणीचा काळ इ.स. ८००च्या सुमारासचा मानला जातो. के. एम. मुन्शी असे मत व्यक्त करतात की, गुर्जरप्रतिहार राजवंशाच्या काळात प्रभास आणि सोमनाथ येथील देवस्थान या दोघांचे महत्त्व अनेक पटींनी वृद्धिंगत झाले. इ.स. दहाव्या शतकात मुलराज नावाच्या राजाने ग्रहरिपु या अभिर शासकाचा पराभव केला आणि या विजयाच्यापश्चात सोमनाथ येथे भगवान शंकरांची पूजा-अर्चा संपन्न केली.
 
साधारण दोन शतकांनंतर सोमनाथ येथील देवालयावर एक प्रचंड मोठे संकट आले. गझनीचा अत्यंत निष्ठुर आणि लोभी शासक मेहमूद याने सोमनाथवर आक्रमण केले. हा दुर्दैवी दिवस होता, दि. ६ जानेवारी १०२६; या दिवशी मेहमूद आणि त्याचे अश्वदल सोमनाथच्या किल्ल्यावर येऊन धडकले. दि. ८ जानेवारी रोजी एक घनघोर युद्ध झाले आणि श्री सोमनाथ या देवस्थानाच्या रक्षणाकरिता जवळजवळ ५० हजार भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मेहमूद सोमनाथ मंदिराच्या आत शिरला, तेथील परमपावन असे शिवलिंग त्याने तोडले, संपूर्ण मंदिर नुसतेच लुटले नाही, तर जाळून राख केले. या तिसर्‍या मंदिराचे काही अवशेष मेहमूदच्या क्रूर कृत्याचे मूक साक्षीदार म्हणून भंगलेल्या अवस्थेत आधुनिक काळापर्यंत टिकून राहिले होते. मार्सवादी इतिहासकार रोमिला थापर यांच्या मते, मेहमूद गझनीचा सोमनाथवरील हल्ला हा केवळ आर्थिक कारणांकरिता होता आणि त्यात कोणताही धर्मांधतेचा हेतू नव्हता. असे जर खरेच असते, तर मेहमूदने सोमनाथाचे शिवलिंग का भंग केले? एवढेच नव्हे, तर पूर्ण मंदिरच का नष्ट केले? सोमनाथवरील या अमानुष आक्रमणाबद्दल के. एम. मुन्शी लिहितात, ”A sacred city like that of Somantha armoured principally by the devotion and reverence of the whole country, fell a prey to an army pledged to fanatic destruction of alien shrines.''
 
सोमनाथ मंदिराच्या विद्ध्वंसानंतर या मंदिराची पुनर्निर्मिती झाली; कारण एका पुराभिलेखात असा उल्लेख आहे की, इ.स. १०४५ मध्ये सियक दुसरा हा राजा प्रभास येथे आला होता आणि त्याची तेथे सुवर्णतुला करण्यात आली होती. इ. स. ११४४ मध्ये कुमारपाल हा गुर्जरदेशाचा सम्राट झाला. हा राजा शिवभक्त होता आणि काही विद्वानांच्या मते, त्याने जैन धर्म स्वीकारला होता. पण, के. एम मुन्शी यांच्या मते, कुमारपाल हा शैवच होता. त्याकाळी भाव बृहस्पती नावाचे एक थोर शैवाचार्य यांनी कुमारपाल याला सोमनाथ येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास सांगितले. भाव बृहस्पती यांनी सोमनाथ येथे ‘मेरू प्रासादाची निर्मिती केली. याच वेळेस सोमनाथ नगराचादेखील विस्तार करण्यात आला. मंदिराच्या उत्तरेस आणि दक्षिणेस नवी तटबंदी बांधण्यात आली. सोमनाथ येथील मुखमंदिरावर, तसेच तेथील इतर मंदिरांवर भाव बृहस्पती यांनी सुवर्ण कळस चढवले. एक स्वच्छ पाण्याचे कुंडदेखील बांधण्यात आले. या काळापर्यंत सोमनाथ हे गुर्जरदेशाचे आणि तेथील राज्यांचे संरक्षक देव म्हणून ओळखले जाऊ लागले. इ.स. १२८७ मध्ये पाशुपत शैव संप्रदायाचे आचार्य त्रिपुरांतक यांनी सोमनाथ मंदिराचे नूतनीकरण केले. थोड्याच कालांतराने सोमनाथ मंदिरावर अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याने मोठे आक्रमण केले. या सैन्याने तेथील शिवलिंग भग्न केले आणि मंदिर, तसेच पूर्ण सोमनाथ शहर लुटले. अनेक राजपूत वीर आपला देव आणि धर्म यांच्या संरक्षणाकरिता प्राणपणाने लढले; पण खिलजीच्या सैन्यापुढे ते टिकाव धरू शकले नाहीत. परंतु, थोड्याच काळात जुनागढचा शासक महिपाल याने सोमनाथचे मंदिर नव्याने बांधले आणि त्याच्या मुलाने तेथे शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. पुढील चार शतकांत गुर्जरदेशाने आणि सोमनाथ मंदिराने अनेक ऐतिहासिक चढ-उतार बघितले. इ.स. १७०६ मध्ये औरंगजेबाने सोमनाथ मंदिर नष्ट केले; पण त्याच वेळेस गुजरातवर मराठ्यांच्या स्वार्‍या सुरू झाल्या आणि मुघल सत्तेचा हळूहळू अस्त होऊ लागला. इ.स. १७८३ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सोमनाथच्या पुरातन देवालयाजवळ सोमनाथाचे एक नवीन मंदिर बांधले. मूळ शिवलिंगाला कोणतीही बाधा होऊ नये, म्हणून त्याची प्राणप्रतिष्ठा गर्भगृहाच्या खाली एका तळघरात करण्यात आली. पुढे इंग्रजांच्या राज्यात जुनागढच्या नवाबाच्या अधिपत्याखाली सोमनाथचे देवस्थान होते. या नवाबांनी मंदिराचे प्रशासन नीट सांभाळले नाही. सोमनाथ मंदिराच्या व्यवस्थापनात आणि हिंदू भक्तांच्या हक्कांसाठी बरोडा संस्थानाने अनेक ठोस पाऊले उचलली.
 
पुढे स्वातंत्र्योत्तर काळात इ.स. १९४७ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराला भेट दिली आणि सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचे आदेश दिले. महात्मा गांधी यांनी अशी सूचना दिली की, सोमनाथच्या नवीन मंदिराचे बांधकाम हे भारत सरकारच्या आर्थिक पाठबळाशिवाय झाले पाहिजे आणि सरदार पटेल यांनी ही सूचना मान्य केली. सोमनाथ मंदिराच्या बांधकामाचे नियोजन करण्याकरिता के. एम मुन्शी यांच्या अध्यक्षतेखाली ‘सोमनाथ ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली. नवीन सोमनाथ मंदिर हे सोमपुरा स्थपती यांनी भारतीय मंदिर स्थापत्य परंपरा यांच्या तत्त्वांचा समावेश करून बांधले. दि. ११ मे १९५१ या दिवशी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या नवीन सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. या सर्व प्रक्रियेत सरदार वल्लभभाई पटेल आणि के. एम मुन्शी यांचा सिंहाचा वाटा होता. प्राचीन काळात सोमनाथ हे एक प्रसिद्ध विद्याकेंद्र म्हणून नावाजलेले होते. के. एम. मुन्शी यांना त्याच धरतीवर आधुनिक सोमनाथ क्षेत्राचा विकास करायचा होता. याकरिता त्यांना सोमनाथ येथे एक ‘ऑल इंडिया संस्कृत युनिव्हर्सिटी’ची स्थापना करायची तीव्र इच्छा होती. त्यांनी हा प्रस्ताव सरदार पटेल यांच्या समोर ठेवला आणि त्यांनी तो मान्यदेखील केला. पण, काही कारणास्तव के. एम. मुन्शी यांच्या जीवनकाळात हे विद्यापीठ आकार घेऊ शकले नाही. के. एम. मुन्शी यांना सोमनाथ येथे भक्तांसाठी राहण्याची स्थाने, तसेच एक गोशाळादेखील बांधायचे होते.
 
२००५ यावर्षी सोमनाथजवळ वेरावळ येथे गुजरात राज्य सरकारने ‘श्री सोमनाथ संस्कृत युनिव्हर्सिटी’ची स्थापना केली. ही एक ‘पब्लिक युनिव्हर्सिटी’ आहे. येथे संस्कृत भाषेच्या अनेक आयामांचे अध्यापन, अध्ययन आणि संशोधन केले जाते. भारत सरकारने मागील काही वर्षांत सोमनाथ येथे अनेक विकासकार्ये सुरू केली आहेत. त्यात विशेष उल्लेखनीय म्हणजे, ‘सोमनाथ प्रोमिनेड’, ‘सोमनाथ एक्झिबिशन सेंटर’, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी. ‘सोमनाथ एक्झिबिशन सेंटर’मध्ये सोमनाथ येथील प्राचीन मंदिरांचे काही अवशेष, तसेच शिल्पे यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. २०२१ मध्ये भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वरील प्रकल्पांचा, तसेच देवी पार्वतीमातेच्या नवीन मंदिराचा पाया रचला. देवी पार्वतीमातेच्या मंदिराच्या बांधणीची पाहणी करण्याचे दायित्व ‘श्री सोमनाथ ट्रस्ट’कडे सोपवण्यात आले आहे. या मंदिरात एक गर्भगृह आणि एक नृत्यमंडप असे दोन विभाग असणार आहेत. सोमपुरा स्थपती या मंदिराचे बांधकाम करत आहेत. २०२६ मध्ये सोमनाथवरील मेहमूद गझनीचे प्रलयंकारी आक्रमण होऊन हजार वर्षे लोटली; तसेच नवीन सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा होऊन ७५ वर्षे झाली.
 
सोमनाथ मंदिर हे भारतीय इतिहासातल्या अनेक स्थित्यंतरांचे साक्षी आहे. हे मंदिर अनेकवेळा जरी उद्ध्वस्त झाले, तरी तेवढ्याच दिमाखात त्याची पुनर्बांधणीदेखील झाली. आक्रमणकर्त्यांनी मंदिराची वास्तू नष्ट केली; पण भारतीयांच्या मनात सोमनाथप्रति असलेली आस्था आणि श्रद्धा अढळ राहिली. या श्रद्धेमुळेच सोमनाथचे मंदिर वर्तमानात प्रभास येथे भारताच्या पश्चिमी समुद्रतटावर उत्तुंग उभे आहे आणि असंख्य भाविक तेथे येऊन भगवान श्री सोमनाथ यांची मनोभावे पूजा-अर्चा करत आहेत.
 
(ऋणनिर्देश - हा लेख ऐतिहासिकदृष्ट्या अचूक होण्याकरिता लेखिकेला डॉ. राजेश चौहान, अनिता कोरडे, दीपाली पाटवदकर आणि प्रसाद फाटक यांनी बहुमोल साहाय्य केले. लेखिका त्यांची मनापासून ऋणी आहे.)




संबंधित मजकूर
404 - Page Not Found

404

Page not found

Sorry, we couldn't find the page you're looking for.

Return to homepage