सुमारे ५०० वर्षांच्या हिंदूंच्या अथक संघर्षानंतर अयोध्येतील रामजन्मभूमीच्या पवित्र स्थळी भव्य असे श्रीराम मंदिर उभे राहिले. आज श्रद्धा आणि विकास यांचा सुवर्णसंगम अयोध्येत पावलोपावली दिसून येतो. अगदी लहानमोठ्या उद्योगांपासून ते रेस्टॉरंट्स, सेवा उद्योगांपर्यंत राम मंदिरामुळे अयोध्येसह संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये रोजगाराच्या विपुल संधी निर्माण झाल्या. नागरिकांचे राहणीमानही उंचावले. तेव्हा, धर्माटनातून देशाटनाचा विचार करताना, अयोध्येतील राम मंदिराची स्वप्नपूर्ती ते शहर विकासातून झालेली रोजगारनिर्मिती यांचा आश्वासक प्रवास उलगडणारा हा लेख...
‘रामायण’ ही केवळ कथा नाही, तर तो मानवी जीवनाची उदात्तता दर्शवणारा, संस्कृतींना जोडणारा, काळाच्या मर्यादा ओलांडणारा एक अक्षुण्ण प्रवाह आहे. हा प्रवाह भारताच्या सीमा ओलांडून आग्नेय आशियाच्या समृद्ध संस्कृतीपर्यंत पोहोचला. थायलंड, मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशियातील मंदिरांमध्ये, लोककथांमध्ये, नृत्यात व चित्रशिल्पांमध्ये तो प्रकटला आणि शेवटी युरोपीय भूमीपर्यंत पोहोचला. त्यामुळेच ‘रामायण’ केवळ कथा न राहता, संपूर्ण मानवी जीवनाचे भावविश्व व्यापून टाकते. आज हजारो वर्षांनंतरही ते टिकून राहिले, ते त्यातील शिकवण आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे म्हणून. त्यातील चिरंतन जीवनमूल्यांचा कालातीत संदेश समस्त मानवजातीला मार्गदर्शन करीत आहे.
श्रीराम चरित्राचे रजकण देशाच्या कानाकोपर्यांत दिसतात. आपण पूर्वेला गेलो तर त्या ठिकाणी ‘रामभद्र’, दक्षिणेला गेलो तर ‘रामचंद्रन’, उत्तरेला गेलो की ‘रामलाल’, तर पश्चिमेला ‘रामदास’ भेटतात. कोणत्याही प्रदेशातील दोन व्यक्ती एकत्र आल्यावर एकमेकाला ‘राम-राम’ म्हणतात, व्यक्तीच्या गुणा-अवगुणांची चर्चा करताना आपण ‘त्या व्यक्तीत राम आहे’ वा ‘राम नाही’ असे म्हणतो. आजारी व्यक्तीला लवकर बरे वाटण्यासाठी एखादे औषध ‘रामबाण’ आहे, असे सांगून सुचवतो. म्हणजेच ज्याच्या नावाने जीवनाचा प्रारंभ होतो आणि जीवनाची अखेरही त्याच्याच नावाने व्हावी, असे वाटते. ते नाम आहे ‘श्रीराम!’
पण, स्वातंत्र्यानंतरही श्रीरामांना वनवास घडला. वास्तविक, प्रत्येक देश स्वतंत्र झाल्यानंतर गुलामीच्या सर्व श्रृंखला फेकून देतो. आपली संस्कृती, मानबिंदू आणि स्वाभिमानाची पुनर्प्रतिष्ठापना करणे, हाच स्वातंत्र्यप्राप्तीचा मूळ उद्देश असतो. पण, दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर तसे झाले नाही. स्वातंत्र्यापूर्वी जे अल्पसंख्याक तुष्टीकरणाचे धोरण अवलंबिले होते, त्याचीच री स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या सत्ताधीशांनी ओढली. भारताचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा शंखनाद केला. हेच धोरण अयोध्या, मथुरा, काशी आणि इतर श्रद्धास्थानांबाबत व्हायला हवे होते; पण दुर्दैवाने तसे झाले नाही.
अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी मुक्तीसाठी ७६ वेळा संघर्ष झाले. तीन लाखांहून अधिक रामभक्तांनी आपले रक्त सांडले. १९८४ नंतर पूजनीय संतांच्या मार्गदर्शनात ‘धर्मस्थान मुक्ती यज्ञ समिती’ची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतरही आमचे आराध्य कडी-कुलपात बंद आहे, ते स्थानमुक्त झाले पाहिजे, यासाठी जागरणाचे विविध कार्यक्रम सुरू झाले. गावागावांमधून शिलापूजनाचे कार्यक्रम झाले. श्रीराम जानकी रथयात्रा, श्रीराम पादुकायात्रांनी जनमानस ढवळून काढले. ‘रामलला हम आयेंगे, मंदिर वही बनायेंगे’ अशी घोषणा देत १९९०ला प्रथम कारसेवा करण्यात आली. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या आदेशाने पोलिसांनी निशस्त्र कारसेवकांवर गोळीबार केला. अनेकांचे मृतदेह शरयू नदीत फेकून दिले. संपूर्ण उत्तर प्रदेशला पोलीस छावणीचे स्वरूप आले. पण त्यावेळी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी, संविधानरक्षक मूग गिळून गप्प बसले होते. त्यांच्या गळ्यात दही जमा झाले होते. कारण, मरणारे हिंदू होते. १९९२ला दुसर्यांदा कारसेवा झाली. न्यायालयाच्या तारीख-पे-तारीख भूमिकेमुळे श्रीरामभक्तांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि हिंदुस्थानच्या माथ्यावरील बाबरी ढाँचारूपी कलंक मिटला, आनंदवनभुवनीचा स्वर आसमंतात निनादला. पुढे न्यायालयीन लढाई सुरू झाली. १५२८ला सुरू झालेल्या श्रीरामभक्तांच्या ५०० वर्षांच्या संघर्षाला यश आले. अयोध्येच्या जन्मभूमी स्थानी श्रीराम मंदिर दिमाखाने उभे राहिले. श्रीराम मंदिराच्या निर्माणाने राष्ट्र मंदिराच्या पुनर्प्रतिष्ठापनेचा मार्ग प्रशस्त झाला.
रोजगारनिर्मिती-श्रद्धेतून आर्थिक संधी
भारतीय संस्कृतीत श्रीराम हे केवळ पूजनीय देव नाहीत. ते आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श मित्र आणि लोक कल्याणकारी शासनाचे प्रतीक आहेत. रामराज्याची संकल्पना म्हणजे प्रत्येक व्यक्तीला सन्मान, न्याय, सुरक्षितता आणि रोजगार मिळणे. आज अयोध्येतील विकासाकडे पाहिले, तर या संकल्पनेची झलक दिसते. अयोध्येतील श्रीराम मंदिरनिर्माणाने हे सिद्ध करून दाखविले आहे की, श्रद्धा आणि विकास यांचा सुंदर संगम झाला, तर समाजातील शेवटच्या रांगेत बसलेल्या माणसापर्यंत समृद्धी पोहोचू शकते. पूर्वी शांत असलेले शहर आज जागतिक पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे उभे राहिले आहे. अयोध्या हे भारतातील ‘श्रद्धेवर आधारित विकास’ या संकल्पनेचे सर्वांत यशस्वी उदाहरण ठरले आहे. पूर्वी रस्त्याच्या कडेला फुले विकणारा विक्रेता आज अनेक पटींनी अधिक भक्तांना सेवा देत आहे. प्रसाद वितरण करणार्या छोट्या दुकानांचे उत्पन्न वाढले आहे. स्थानिक मिठाई विक्रेते, पूजेचे साहित्य विकणारे व्यापारी, हस्तकला कारागीर, मातीच्या वस्तू बनवणारे कुंभार, लाकडी कोरीव काम करणारे कारागीर या सर्वांच्या व्यवसायाला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. महिला स्वयंसाहाय्य गटांच्या माध्यमातून स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तनिर्मित स्मृतिचिन्हे यांना भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून असलेल्या या महिला आज आत्मनिर्भर बनल्या आहेत. ‘बेटरप्लेस’ या रोजगारविषयक संस्थेच्या माहितीनुसार, गत तीन-चार वर्षांत सुमारे दीड लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार-व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रात दरवर्षी २० हजार ते २५ हजार रोजगार निर्माण होत आहेत, असा तज्ज्ञांचा अहवाल सांगतो. मंदिरनिर्माणापूर्वी उत्तर प्रदेशातील अनेक युवकांना रोजगारासाठी महाराष्ट्र, गुजरात किंवा पंजाबकडे जावे लागत असेल. आज चित्र बदलत आहे. अयोध्येत हॉटेल्स, होम-स्टे, टॅसी सेवा, ई-रिक्षा, पर्यटन मार्गदर्शक, धार्मिक वस्तूंची विक्री, रेस्टॉरंट्स आणि अन्य सेवा उद्योग वाढल्यामुळे रोजगारांच्या संधी झपाट्याने वाढल्या आहेत. त्यातून रोजगारासाठी अन्य प्रांतात होणारे पलायन अत्यंत कमी झाले आहे.
पायाभूत आणि अन्य सुविधांचा विकास
श्रीराम मंदिरामुळे अयोध्येत रस्ते, रेल्वे, विमानतळ, महामार्ग, स्वच्छता, वीजपुरवठा, निवासव्यवस्था, डिजिटल सेवा, आरोग्य सुविधा आणि सुरक्षा यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. केंद्र शासनाच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये १६ कोटींहून अधिक पर्यटकांनी अयोध्येला भेट दिली. २०२५ मध्ये महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर ३० कोटींपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी आले. २०२८ पर्यंत अयोध्येतून दरवर्षी १८ हजार कोटींची पर्यटन अर्थव्यवस्था निर्माण होण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचा विस्तार
अयोध्येतील वाढत्या पर्यटनामुळे हजारो सूक्ष्म आणि लघु उद्योगांना नवी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. आज उत्तर प्रदेशात सुमारे ९९ लाख सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग नोंदणीकृत स्वरूपात कार्यरत आहेत. राज्य शासनाची लघु आणि मध्यम उद्योगांबाबतची धोरणे, तसेच ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रमामुळे स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळाली आहे. अयोध्येत मिठाईची दुकाने, धार्मिक साहित्य, स्मृतिचिन्हे, हस्तकला, होम-स्टे, रेस्टॉरंट्स आणि स्थानिक सेवा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. एका अभ्यासानुसार, रेस्टॉरंट्सची संख्या गेल्या चार वर्षांत २०० वरून सुमारे दोन हजार, ई-रिक्षांची संख्या ५०० वरून १७ हजार, तर होम-स्टे शून्यावरून १ हजार, १०० हून अधिक झाले आहेत. आर्थिक विषयाच्या तज्ज्ञांकडून प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, येत्या पाच वर्षांत जवळपास दीड ते दोन लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील. तसेच दरवर्षी २० ते २५ हजार नोकर्या आदरातिथ्य सेवांमधील असतील. उत्तर प्रदेशच्या आर्थिक वाढीवर प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटले आहे की, जवळपास सहा हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग स्थापन झाले आहेत. आणखीन एका लेखानुसार, उत्तर प्रदेशचे लघु आणि मध्यम उद्योग जवळपास एक कोटी हातांना काम देत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश राज्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा वाटा जवळपास दीड टक्क्यांनी वाढला आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त होणारे स्थलांतरण अत्यंत कमी झाले आहे. पूर्वी छोट्या दुकानदारांचे उत्पन्न दररोज ४०० ते ५०० रुपये होतं. पर्यटनवाढीमुळे आता त्यांचे उत्पन्न सरासरी २ हजार, ५०० पर्यंत वाढल्याचे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
निष्कर्ष
भारतीय तत्त्वज्ञान धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे चार पुरुषार्थ मांडते. धर्म हा समाजाला जोडणारा आणि उन्नतीकडे नेणारा मार्ग आहे. धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे जीवनदृष्टी. धर्म केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर समाजाच्या सर्वांगीण कल्याणाचा विचार आहे. अयोध्येचा विकास ही त्याचीच साक्ष देतो. अयोध्येतील श्रीराम मंदिर हे केवळ दगड-विटांचे मंदिर नाही; ते नव्या भारताच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. या मंदिराने जगाला दाखवून दिले की, सांस्कृतिक वारसा जपला, तर तो आर्थिक प्रगतीचा आधारही बनू शकतो. अयोध्येप्रमाणे इतर तीर्थक्षेत्रांचा विकासही अशाच नियोजन पद्धतीने झाला, तर लाखो युवकांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
चला, अयोध्येकडून आपण एक प्रेरणा घेऊया. आपल्या श्रद्धेचे रूपांतर सेवेत, सेवेचे रूपांतर विकासात आणि विकासाचे रूपांतर राष्ट्रनिर्माणात करूया. तेव्हाच राम मंदिराची स्वप्नपूर्ती ही केवळ एका शहराची कथा राहणार नाही; ही संपूर्ण भारताच्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल बनेल.
(लेखक विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांताचे प्रांतमंत्री आहेत.)