मुंबईकरांसाठी मोठी बातमी; २३८ एसी लोकलची निर्मिती आता देशातील तीन कारखान्यांत होणार

AC Local Train Production
 
मुंबई : (AC Local Train Production) मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय लोकल रेल्वेच्या आधुनिकीकरणाला आता वेग देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मुंबईकर प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि आधुनिक करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या २३८ एसी लोकल गाड्यांच्या निर्मितीसाठी नवी उत्पादन रणनीती आखण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
 
मुंबईतील लोकल सेवा दररोज लाखो प्रवाशांसाठी अत्यावश्यक ठरते. गर्दी, उष्णता आणि प्रवासाचा वाढता ताण लक्षात घेता उपनगरीय रेल्वेचा आधुनिक आणि प्रवासी-केंद्रित विकास करण्याची गरज सातत्याने व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या लोकल ताफ्यात मोठ्या प्रमाणावर एसी लोकलचा समावेश करण्याचा केंद्राचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.(AC Local Train Production)
 
२३८ एसी लोकलला मंजुरी
 
केंद्र सरकारने मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी २३८ एसी लोकल गाड्यांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. या गाड्यांमुळे मुंबईच्या लोकल प्रवासात आराम, आधुनिक सुविधा आणि प्रवासी अनुभवात मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे.
 
मात्र या गाड्यांच्या निर्मिती आणि खरेदी प्रक्रियेत यापूर्वी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. पारंपरिक पद्धतीने निविदा आणि बाह्य उत्पादकांवर अवलंबून राहिल्याने अपेक्षित वेगाने गाड्यांची निर्मिती आणि उपलब्धता होण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली होती.(AC Local Train Production)
 
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या उत्पादन धोरणामुळे रखडलेली प्रक्रिया गतिमान करून मुंबईकरांना आधुनिक एसी लोकल उपलब्ध करून देण्याच्या दिशेने रेल्वे मंत्रालयाने निर्णायक पाऊल उचलले आहे.(AC Local Train Production)
  
तीन उत्पादन केंद्रांकडे जबाबदारी
 
या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने देशातील तीन प्रमुख सरकारी रेल्वे कोच उत्पादन केंद्रांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
 
यामध्ये, ICF – Integral Coach Factory, RCF – Rail Coach Factory, MCF – Modern Coach Factory या तीन उत्पादन केंद्रांचा समावेश आहे. या कारखान्यांकडे रेल्वे डबे आणि आधुनिक कोच निर्मितीचा प्रदीर्घ अनुभव तसेच आवश्यक पायाभूत सुविधा आहेत. त्यामुळे २३८ एसी लोकलच्या निर्मितीचे काम विविध उत्पादन केंद्रांमध्ये विभागून निर्मिती प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.(AC Local Train Production)
 
२०२७ पर्यंत पहिली एसी लोकल!
 
नव्या उत्पादन धोरणामुळे एसी लोकलच्या निर्मितीतील संभाव्य विलंब कमी करण्यास मदत होणार असून, २०२७ पर्यंत पहिली एसी लोकल उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर एसी लोकल मुंबईच्या उपनगरीय रेल्वे ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे. यामुळे बाह्य विक्रेत्यांकडून होणाऱ्या खरेदीवरील अवलंबित्व कमी होण्याबरोबरच रेल्वेच्या स्वतःच्या उत्पादन क्षमतेचा अधिक प्रभावी वापर करता येणार आहे.(AC Local Train Production)
 
प्रवाशांच्या सुविधेला प्राधान्य
 
मुंबई लोकलच्या आधुनिकीकरणाचा हा निर्णय केवळ नवीन गाड्या आणण्यापुरता मर्यादित नसून, मुंबईच्या उपनगरीय रेल्वे व्यवस्थेला अधिक आधुनिक, आरामदायी आणि सक्षम बनवण्याच्या व्यापक प्रयत्नांचा भाग आहे. एसी लोकलमुळे विशेषतः उन्हाळ्यात आणि दमट हवामानात प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या पिढीच्या रेल्वे डब्यांमुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.(AC Local Train Production)
 
मंजूर गाड्या : २३८ एसी लोकल 
निर्मिती केंद्रे : ICF, RCF आणि MCF
पहिली एसी लोकल : २०२७ पर्यंत आणण्याचे लक्ष्य
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर