मुंबई : (Kolhapur) कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. या कारवाईत दिरंगाई किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिलेत. अनधिकृत बांधकामांबाबतची संपूर्ण वस्तुस्थिती व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दि. २८ ते २९ ऑगस्टपर्यंत सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ व दुर्लक्ष करणाऱ्या कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील दालनात बैठक झाली. यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी तसेच कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील वळीवडे, उंचगाव, गांधीनगर, चिंचवाड व मुडशिंगी या गावांमधील विनापरवाना बांधकामांबाबत प्राप्त तक्रारींची बैठकीत सविस्तर माहिती घेण्यात आली. संबंधित बांधकामांना यापूर्वी बजावलेल्या नोटिसा, केलेले पंचनामे, दाखल केलेले गुन्हे तसेच न्यायालयीन प्रकरणांची सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेण्यात आला. (Kolhapur)
‘त्या’ अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करा
अनधिकृत बांधकामांवर केवळ नोटिसा बजावून किंवा जुजबी कारवाई करून प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत. संबंधित प्रकरणांमध्ये नियमानुसार पुढील कठोर कायदेशीर कार्यवाही तातडीने करावी. कारवाईस विलंब करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती चौकशी करावी. अनधिकृत बांधकामांबाबत आवश्यक त्या नोटिसा काढून पुढील कार्यवाही करावी. तसेच अशा इमारतींमधील घरांची खरेदी-विक्री रोखण्यासाठी संबंधित उपनिबंधकांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता कायद्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश अण्णा बनसोडे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. (Kolhapur)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....