भारतीय संस्कृती-सभ्यता ही जगातील प्राचीन संस्कृती. येथील अनेक देव-देवता, त्यांची असंख्य मंदिरे, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे आणि श्रद्धावंतांनी संपन्न हजारो पंथ-संप्रदाय हे हिंदू सनातन परंपरेचे सामर्थ्य आहे. धर्मक्षेत्रे व तीर्थक्षेत्रांचे धर्माटन ही भारतीयांची प्राचीन परंपरा आहे. आद्य शंकराचार्य, संत ज्ञानदेव, संत नामदेव, समर्थ रामदास यांच्या धर्माटनाच्या-देशाटनांच्या यात्रा ऐतिहासिक आहेत. या धर्माटन-देशाटनाच्या यात्रा केवळ एक पायपीट वा सहल नाही, तर आध्यात्मिक साधना, सामाजिक संवाद आणि राष्ट्रीय-सांस्कृतिक एकात्मता यांचा सुंदर मिलाप आहे. त्याचेच हे शब्दावलोकन...
तीर्थाभिगमनम् पुण्यम्
सर्व यज्ञ विशिष्यते| ...‘महाभारत’
भारतवर्ष हा धर्मवान देश असून, भारतीय लोकजीवन-संस्कृती या सर्वांना धर्माचे व्यापक अधिष्ठान आहे. भारतीय संस्कृती-सभ्यता ही जगातील सर्वांत प्राचीन आणि विद्यमान अशी विजिगीषू सनातन संस्कृती. येथील ऋषी, मुनी, संत आणि सत्पुरुषांची वैभवशाली परंपरा, येथील प्राचीन गुरुकुल शिक्षणव्यवस्था, येथील हजारो पंथ-संप्रदाय, असंख्य उपासना पद्धती, अनेक देव-देवता-अवतार, त्यांची भव्यदिव्य अशी मंदिरे अशी या सनातन संस्कृतीची कथन करावीत तेवढी वैशिष्ट्ये थोडी आहेत. त्यामध्ये येथील धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे हेसुद्धा एक खास असे वैशिष्ट्य. या धार्मिक स्थळांचा, तीर्थक्षेत्रांचा आध्यात्मिक महिमा अनंत, अगाध आहे. ‘पुराण’ वाङ्मयातील अनेक खंड या तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य-गुणगौरव करणारे आहेत.
अयोध्या मथुरा माया काशी कांची अवन्तिका|
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः॥
भारतीय समाजात अशा धार्मिक स्थळे व तीर्थक्षेत्रांच्या धर्मयात्रा म्हणजेच, धर्माटन करण्याची परंपरा खूप प्राचीन आहे. त्यामुळेच ‘तीर्थव्रती भाव धरी रे करुणा|’ असा संतांनी समाजाला उपदेश केलेला संतसाहित्यातून ठिकठिकाणी दिसून येतो. ‘महाभारत’ ग्रंथामध्ये महर्षी व्यास तीर्थयात्रेचे महत्त्व विशद करताना म्हणतात- ‘तीर्थाभिगमनम् पुण्यम् सर्व यज्ञ विशिष्यते|’ तीर्थयात्रेचे महत्त्व, पुण्य अनेक यज्ञांच्या पुण्यापेक्षा श्रेष्ठ व मोक्षप्रद आहे. या तीर्थयात्रांचे म्हणजेच धर्माटनाचे महत्त्व केवळ पुण्यदायक व मोक्षप्रद आहे. या तीर्थयात्रांचे म्हणजेच धर्माटनाचे महत्त्व केवळ पुण्यासाठीच नव्हे; तर या तीर्थयात्रा आध्यात्मिक साधना, सामाजिक संवाद, सांस्कृतिक व राष्ट्रीय एकात्मता यांचा प्रयागसंगम आहेत. व्यष्टी, समष्टी आणि सृष्टी यांचा महासमन्वय आहेत.
पुराण ग्रंथ : तीर्थक्षेत्र कोश
भारतातील तीर्थक्षेत्रांची गणना हे अशय कोटीतील काम आहे, एवढी मोठी आहे. पुराणांमध्ये या अनंत तीर्थक्षेत्रांची अनंत नावे व अगाध महिमा वर्णित आहे. या तीर्थक्षेत्राची यात्रा हे केवळ धार्मिक अनुष्ठान, व्रत नाही; तर आत्मशुद्धी, संस्कार, भक्ती, ज्ञान, लोककल्याण आणि राष्ट्रीय-सांस्कृतिक एकात्मता असा बहुउद्देशीय आचार आहे. या अनंत तीर्थक्षेत्रांमधील चार धाम यात्रा, द्वादश ज्योतिर्लिंग यात्रा, ५१ शक्तिपीठांची यात्रा, सप्तपुर्या, सप्तसरोवर, कुंभस्थाने यांना लोकमानसात विशेष प्रगाढ श्रद्धेचे सर्वोच्च स्थान आहे.
तीर्थानां दर्शनं पुण्यं स्पर्शनं पापनाशनम्|
स्नानं मुक्तिप्रदं प्रोक्तं
सेवितं परमं सुखम्॥
अशा शब्दांत ‘स्कन्द पुराणा’मध्ये तीर्थाटनाचे महत्त्व सांगितलेले आहे. तीर्थक्षेत्र व तीर्थयात्रा यांची महती सांगणारे साहित्यही प्रचंड आहे. श्रद्धावंतांमध्ये धर्मपरायण भाविक समाजात या साहित्याची लोकप्रियता अपार आहे. ‘क्षेत्र माहात्म्य’, ‘तीर्थ-नदी माहात्म्य’ कथन करणार्या अनेक पोथ्या असून, भाविक त्याचे पारायण-पठण करतात. असे स्तोत्र साहित्य भक्तिवाङ्मयाचे वैभव आहे.
भारतीय प्राचीन वाङ्मयात ‘वेद’, ‘उपनिषदे’, शास्त्रे, ‘महाभारत’, ‘रामायण’, ‘गीता’, ‘भागवत’ या साहित्याप्रमाणेच पुराणांना विशेष महत्त्व आहे. या पुराणांमध्ये अनेक तीर्थस्थानांचे सविस्तर-साद्यंत वर्णन आहे. उदाहरणार्थ - ‘स्कन्द पुराणा’त श्रीक्षेत्र काशी, बद्रीनाथ, केदारनाथ, जगन्नाथपुरी, प्रभास, सोमनाथ, अवंती (उज्जैन) यांचे माहात्म्य समाविष्ट आहे, तर ‘पद्म पुराणा’मध्ये प्रयाग तीर्थ, पुष्कर तीर्थ, गया यांचे माहात्म्य आहे. ‘ब्रह्म पुराणा’त जगन्नाथ पुरी व कोणार्क, ‘वामन पुराणा’त कुरुक्षेत्र; ‘वराह पुराणा’त मथुरा व ब्रजमंडल यांची माहात्म्य वर्णने आहेत.
धर्माटन : देवदर्शनार्थ अभिगमन
भारतीय भक्ती-साधना परंपरेत नवविधा भक्ती प्रकारासह इतर अनेक आचारांना प्राधान्य आहे. या आचारधर्मात स्नान, ध्यान, पूजा, प्रार्थना, पारायण, पाठ, भजन, संकीर्तन, देवदर्शन, प्रदक्षिणा असे अनेक विधी आहेत. त्यामध्येच धर्माटन म्हणजे देवदर्शनार्थ अभिगमन, तीर्थयात्रा, वारी यांना विशेष स्थान आहे.
‘चलो बुलावा आया हैं|
माताने बुलाया हैं|
जय माता दी|’
हा जयघोष इष्टदेवतेच्या दर्शनार्थ जाणार्या देवीभक्तांच्या मुखातून आपण नेहमीच ऐकतो. असेच आपापल्या इष्ट-प्रिय देव-देवतांचे स्मरण, जयघोष, भजन करीत श्रद्धावंत भाविक भारताच्या एका प्रांतातून दूरच्या दुसर्या प्रांतात-प्रदेशात जातात; तेव्हा प्रांत, भाषा, जात-वर्ण असे सारे भेदभाव गळून पडलेले असतात. भारतात अनेक प्रांत, भाषा असे भेद असले, तरी आध्यात्मिकदृष्ट्या अंतरंग भक्तिबंधाने आपला देश प्राचीन कालापासून अखंड आहे. भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रीयत्वाच्या एकतेचे विराट दर्शन आपणास अशा धर्माटनातून-तीर्थक्षेत्र यात्रेमधून घडते. या यात्रा ज्ञान व भक्तीच्या सांस्कृतिक आदान-प्रदान करणार्या, भारतीय जनजीवनाचे अभिसरण घडविणार्या जीवनवाहिन्या आहेत. त्यामुळेच दक्षिण भारतातील तामिळ, कन्नड सश्रद्ध भक्त थेट उत्तर भारतातील हिमालयातील बद्रीनाथ-केदारनाथ यात्रा करतो, तर उत्तरेतील भक्त अत्यंत उत्कट भावाने दक्षिणेतील रामेश्वरम्, मदुराई, कन्याकुमारी, तिरुपती यांच्या दर्शनास जातो. या तीर्थक्षेत्री असलेले सत्पुरुषांचे-संतांचे मठ, तेथील मंदिरे, धर्मशाळा ही भारतीय भाविक-श्रद्धावंतांची सांस्कृतिक संवादकेंद्रे आहेत. देशाच्या दोन टोकाच्या भाविकांमध्ये भौगोलिक अंतर-दुरी असली; तरी पारमार्थिक, आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या त्यांची अंतरंग जवळीकता असते.
या धर्माटन तथा तीर्थयात्रेतून व्यष्टी व समष्टीच्या स्तरावर अनेक गोष्टी साध्य होत असतात. हे साध्य हीच तीर्थाटनाची फलश्रुती असते. धर्माटन-यात्रा ही श्रद्धेची सुंदर अभिव्यक्ती आहे. त्याद्वारे आत्मशुद्धी, संत-महंतांचा सत्संग, ज्ञानप्राप्ती, राष्ट्रातील विविध लोक, भाषा, रीती यांचे अनुभवनिष्ठ दर्शन घडते. मनुष्य अनुभवसंपन्न होतो. त्याचा संकुचित दृष्टिकोन नष्ट होऊन त्याला समष्टी, देश, धर्म यांचे सम्यक व्यापक भान येते. सेवा व परोपकाराचे महत्त्व लक्षात येते आणि सेवा व परोपकाराची नकळत प्रेरणा मिळते. देव, देश आणि धर्माविषयीची आस्था, निष्ठा, भक्ती वृद्धिंगत होते. स्वत्वाचे भान प्राप्त होते. स्वबोधातून पुरुषार्थप्रवण अशा जीवनदिशांचे दर्शन होते. समाजभानातून सामाजिक एकोप्याचे महत्त्व नकळत प्रतित होते. या सर्व गोष्टींना सांस्कृतिक-राष्ट्रीय ‘संस्कार’ म्हटले, तर तीर्थयात्रा-धर्माटन हे संस्कारांचे विद्यापीठ आहे.
ऐतिहासिक धर्माटने - भारत यात्रा
भारतीय सांस्कृतिक इतिहासात आद्य शंकराचार्य यांनी आठव्या शतकामध्ये केलेली केरळ ते काश्मीर-केदारनाथ धर्मयात्रा, धर्माटन, भारतभ्रमण ही एक ऐतिहासिक दिग्विजयी यात्रा आहे. केरळहून पायी प्रवास करीत आद्य शंकराचार्य श्रीक्षेत्र कोल्हापूर, पंढरपूर, महांकालेश्वर-ओंकारेश्वर यात्रा व विद्वत्जनांशी संवाद करीत काश्मीरपर्यंत गेले होते. दक्षिण भारतातील देवभूमी, केरळ प्रांतातील ही थोर विभूती पदयात्रा करीत-करीत केदारनाथ येथे जाऊन आपल्या यशस्वी कृतार्थ जीवनाची समाधी घेऊन परिसमाप्ती करते, ही गोष्ट भारतीय राष्ट्रीय एकतेच्या अखंडत्वाचे दर्शन आहे. अशी दुसरी दिग्विजयी पदयात्रा-धर्माटन १३व्या शतकात संत नामदेव यांनी केलेले इतिहासांच्या पानांमध्ये अभंग आहे. महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र पंढरपूरचा हा विठ्ठलभक्त संत नामदेव भक्तिप्रचारार्थ, जनजागरणार्थ पंढरपूरमधून पदयात्रा करीत, गुजरात-राजस्थान करीत थेट पंजाबमध्ये जातात. संत नामदेव हे द्रष्टे संत होते. पंजाबमध्ये होणारे परकीय धर्मांध आक्रमकांचे हल्ले लक्षात घेऊन तेथील समाज संघटित करण्याच्या उद्देशाने संत नामदेव यांनी पंढरपूर (महाराष्ट्र) ते घुमान (पंजाब) असे धर्माटन केलेले आहे. नामदेवांचे शिखांच्या परमपवित्र अशा ‘गुरुग्रंथसाहेब’ धर्मग्रंथात अनेक अभंग समाविष्ट आहेत. उत्तर भारतातील संतमतांचे, भक्ती आंदोलनाचे प्रवर्तक म्हणून संत नामदेवांना सकल संतांमध्ये अग्रपूजेचा मान दिला जातो. हा संत नामदेवांचा दिग्विजय हे धर्माटनाचे ऐतिहासिक उदाहरण आहे.
संत ज्ञानदेवांनी संत नामदेव, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत रोहिदास या संतमंडळींसह केलेली तीर्थयात्रा संतसाहित्यात प्रसिद्ध आहे. संत नामदेवांच्या अभंगगाथेमध्ये ‘तीर्थावळी’ नावाच्या एका स्वतंत्र प्रकरणात या तीर्थयात्रेचे वर्णन आहे. यावरून ज्ञानदेवादी संतमहात्मे तीर्थयात्रांचे सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व जाणणारे होते. त्यांनी स्वतः अनेक संतांना सोबत घेऊन तीर्थयात्रा केलीच; त्याचबरोबर ‘तीर्थव्रती भाव धरा’, ‘यात्रा करा’ असा अभंगातून संदेशही दिला. उत्तर प्रदेशातील काशी येथे संत ज्ञानदेवांनी संतांसह यात्रा केल्याच्या प्रीत्यर्थ एक ‘कीर्तिस्तंभ’ उभारला होता. तो ‘कीर्तिस्तंभ’ आजही आपण काशी-वाराणसी येथे पाहू शकतो. हा ‘कीर्तिस्तंभ’ धर्माटनाच्या समग्र कीर्तीचा प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.
९८८१९०९७७५