‘आपण आमचे खरे हिरो आहात’ — जवान आणि पोलिसांना विद्यार्थ्यांचे भावनिक पत्र

‘हर घर तिरंगा’ अभियानाला मनपा शाळांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

    14-Aug-2026
Letter to soliders 
 
ठाणे : (TMC) देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठाणे महापालिका शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘जवान व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पत्रलेखन’ उपक्रम राबविण्यात आला. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डवर पत्रे लिहून जवान आणि पोलिसांच्या शौर्याला, त्यागाला व देशसेवेला सलाम केला.
 
‘आपल्या देशसेवेला मनःपूर्वक सलाम’, ‘आपण आमचे खरे हिरो आहात’, अशा भावनिक शब्दांत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कुटुंबापासून दूर राहून देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या जवानांमुळे आपण सुरक्षित जीवन जगत असल्याची जाणीवही विद्यार्थ्यांनी पत्रातून व्यक्त केली. (TMC)
 
उपायुक्त डॉ. मिताली संचेती आणि शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मनपा शाळांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला. शाळा क्र. १, ६०, ११, ६४, ५५, ६२, ५६, ५८, ७५, ९८ यांसह गौतम हिंदी स्कूल आणि आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. (TMC)
 
परबवाडी येथील मनपा शाळा क्र. १८ मध्ये उपक्रम विशेष उत्साहात पार पडला. यावेळी ठाणे मनपा सभागृह नेते हनुमंत जगदाळे, प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये, नगरसेविका नम्रता भोसले, पोलीस अधिकारी सौ. मुल्ला यांच्यासह अधिकारी व शिक्षक उपस्थित होते. (TMC)
 
शालेय वयातच देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि देशाच्या रक्षकांप्रती आदराची भावना रुजविणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरला. (TMC)
 
 




संबंधित मजकूर