थेंबा थेंबांतून उभी आशा...

    14-Aug-2026
 
 
Water ambassador Dr. Deepak Chaudhary
 
१६४ गावांना जलसुरक्षेचा आधार देणार्‍या ‘जलदूत’ डॉ. दीपक चौधरी यांच्या सेवायात्रेची प्रेरणादायी कहाणी...
 
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्|
(श्रीमद्भगवद्गीता, अध्याय सहावा, श्लोक पाचवा)
 
अर्थात, माणसाने स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःचा उद्धार करावा; स्वतःला खचू देऊ नये. याच विचारांनी प्रेरणा घेत, ठाणे जिल्ह्यातील वाड्याच्या मातीत जन्मलेला एक मुलगा पुढे शिक्षण, उद्योग, समाजसेवा, चित्रपट आणि जलसंवर्धन अशा विविध क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण करतो. ही केवळ यशोगाथा नाही, तर ध्येय, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणादायी कहाणी आहे. ही कहाणी आहे डॉ. दीपक सखाराम चौधरी यांच्या जीवनप्रवासाची, ज्यांनी हजारो कुटुंबांच्या आशेला आकार दिला आहे.
 
डॉ. दीपक चौधरी यांचे मूळ गाव माथाणे, सफाळे, जिल्हा पालघर. प्राथमिक शिक्षण वाडा येथे झाल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी पुण्यात दाखल झाले. पुण्यातील मॉडर्न हायस्कूल आणि मुंबईतील विल्सन महाविद्यालयात शिक्षण घेताना, त्यांनी व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आणि क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. खेळाने त्यांना संघभावना, नेतृत्व, शिस्त आणि संकटांशी दोन हात करण्याची वृत्ती दिली. विज्ञान शाखेतील पदवी आणि व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका पूर्ण केल्यानंतर त्यांनी जर्मन जहाज वाहतूक कंपनीत सुमारे आठ वर्षे काम केले.
 
१९९४ मध्ये त्यांनी स्वतःच्या ‘इंडस उद्योगसमूहा’ची स्थापना केली. आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, व्यापारसाखळी आणि माल पाठविण्याच्या क्षेत्रात संस्थेचा विस्तार करताना सात स्वतःच्या शाखा, तसेच परदेशातील सहकारी संस्था उभ्या राहिल्या. उत्कृष्ट कार्याची दखल घेत, अंकलेश्वर येथील ‘भारतीय कंटेनर वाहतूक महामंडळा’कडून त्यांना सलग नऊ वर्षे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पुरस्कार मिळाले. मात्र, व्यवसायातील यशाने त्यांची ज्ञानाची भूक थांबली नाही. शिकणे ही अखंड प्रक्रिया आहे, या विचारातून वयाच्या ५७व्या वर्षी, २०१८मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून मालवाहतूक व पुरवठा साखळी व्यवस्थापन विषयात ‘विद्यावाचस्पती’ (पीएचडी) पदवी मिळवली. १९९९ मध्ये ‘लायन्स इंटरनॅशनल क्षरसारपूर’ या सेवाभावी संस्थेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सेवावृत्तीला व्यापक व्यासपीठ मिळाले. २०१८मध्ये ते बिनविरोध जिल्हा प्रमुख झाले. शिक्षण, पर्यावरण आणि समाजसेवेतील सुमारे २१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. १८ समाजोपयोगी केंद्रे आणि १८ पाणी बांधारे हे त्यांच्या कार्याचे विशेष उदाहरण ठरले.
 
चित्रपटसृष्टीतही त्यांनी सामाजिक जाणिवेची छाप उमटवली. ‘श्वास’ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचे ते सहनिर्माते असून २००५-०६ मध्ये ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी त्याची निवड झाली. डॉ. अब्दुल कलामांकडून राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. ‘श्वास प्रतिष्ठान’चे संस्थापक विश्वस्त म्हणून त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे ४० लाख रुपयांची ठेव दिली. तिच्या व्याजातून उत्कृष्ट चित्रपटासाठी पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू आहे. तसेच ‘एचआयव्ही’ पीडितांसाठी डॉ. दीपक चौधरी यांनी ५० लाखांचे धर्मादाय योगदान दिले, ज्यात दहा लाखांची टाटा कॅन्सर रुग्णालयाची मदत समाविष्ट आहे. नंतर ‘आम्ही चमकते तारे’ या ‘एचआयव्ही’ग्रस्त मुलांच्या जीवनावर आधारित चित्रपटातूनही त्यांनी हा संवेदनशील विषय समाजासमोर आणला. मात्र, त्यांच्या जीवनकार्याचा सर्वाधिक हृदयस्पर्शी अध्याय हा जलसंवर्धनाचा. पालघर, जव्हार, मोखाडा, डहाणू आणि कोकणातील गावांमध्ये त्यांनी एक विरोधाभास पाहिला, पावसाळ्यात पाण्याचे लोट वाहून जातात; पण उन्हाळ्यात महिलांना सहा-सहा तास पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला, पाऊस कमी नाही; मग पाणी टिकत का नाही? २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या भागीदारीच्या माध्यमातून सुरुवातीला १८ पाणी बंधारे उभारण्यात आले. पुढे शासनाचे सहकार्य थांबले, तरी त्यांचा संकल्प थांबला नाही. याच निर्धारातून ‘१०० पाणी बंधारे मोहीम’ सुरू झाली. ग्रामस्थ, लायन्सचे सदस्य, सामाजिक दायित्व निधी देणार्‍या संस्था आणि दाते यांच्या सहकार्याने ही मोहीम आज १६४ पाणी बांधारेंपर्यंत पोहोचली आहे. त्यातून सुमारे २५४ कोटी लिटर पाण्याचे वार्षिक संवर्धन होत आहे.
 
धनौशी येथे सामाजिक जीवनाधारित संस्था आणि राधेश्य सिंगानिया यांच्या सुमारे दहा लाख रुपयांच्या योगदानातून उभारलेला ३० द २.९ द २.२ मीटरचा जलअडथळा अंदाजे २.१ कोटी लीटर पाणी साठविण्याची क्षमता बाळगतो. दि. ९ ऑगस्ट रोजी तो आदिवासी समाजाला समर्पित करण्यात आला. तसेच भारताच्या जलशक्ती मंत्रालयाकडून ‘जलदूत’ म्हणूनही डॉ. चौधरींचा सन्मान केला गेला. जिथे पाणी बंधारा उभारणे शय नाही, तिथे डॉ. दीपक चौधरी यांनी कमी खर्चाची ‘जलधारा’ पद्धत विकसित केली. दातिवरे, कोरे आणि इतर गावांतील प्रयोगांनंतर आता दहा हजार जलधारा उभारण्याचा संकल्प पुढे आला आहे.
 
जलसंवर्धन म्हणजे केवळ आजचे पाणी वाचवणे नव्हे, ते उद्याचे जीवन वाचवणे आहे. हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून पालघरच्या आदिवासीबहुल ग्रामीण भागात पोहोचविणार्‍या जलदूत डॉ. दीपक चौधरी यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!
 
- कमलेश संखे 




संबंधित मजकूर