डेटा सेंटरचे ‘स्मार्ट कूलिंग’

Data Center Smart Cooling
 
जागतिक पातळीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेगाने होत असलेला विस्तार डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही मोठा बदल घडवत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सेवा, आभासी संगणकीय सेवा, आर्थिक व्यवहार, ऑनलाईन खरेदी, मनोरंजन, आरोग्यसेवा आणि उद्योगांच्या वाढत्या संगणकीकरणामुळे जगभरात माहिती केंद्रांची संख्या आणि क्षमता झपाट्याने वाढत आहे. पुढील काही वर्षांत माहिती साठवणूक आणि प्रक्रिया करण्याची क्षमता जवळपास तिप्पट होण्याची शयता व्यक्त केली जात आहे. मात्र, या डिजिटल विस्तारासोबत ऊर्जा आणि पाण्याची वाढती गरज हादेखील जागतिक चर्चेचा विषय ठरला आहे.
 
माहिती केंद्रांमध्ये हजारो संगणकीय यंत्रे २४ तास कार्यरत असतात. या यंत्रांमधून मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. ही उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज आणि काही ठिकाणी पाण्याचा वापर केला जातो. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी वापरल्या जाणार्‍या आधुनिक संगणकीय घटकांची क्षमता पारंपरिक संगणकीय यंत्रांपेक्षा कितीतरी अधिक असल्याने त्यातून निर्माण होणारी उष्णताही वाढत आहे. त्यामुळे माहिती केंद्रांना थंड ठेवण्याची पारंपरिक पद्धत आता पुरेशी ठरत नसून अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक उपायांची गरज निर्माण झाली आहे.
 
वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि पाण्याची कमतरता यांमुळे भविष्यात माहिती केंद्रांच्या परिचालन खर्चावरही परिणाम होण्याची शयता आहे. त्यामुळे जगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासमोर आता एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे की, वाढती संगणकीय गरज पूर्ण करताना ऊर्जा आणि पाण्याचा वापर कसा कमी करायचा?
 
याच प्रश्नाचे उत्तर तंत्रज्ञानातील नव्या प्रयोगांमध्ये सापडते. भारतातील ऊर्जा कार्यक्षमता विभाग आणि ‘भारतीय उद्योग महासंघ’ यांच्या भारतीय माहिती केंद्रांसाठीच्या ऊर्जा कार्यक्षमता मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बाहेरील वातावरणाचा उपयोग करून शीतकरणाची गरज कमी करण्याच्या ‘इकोनोमायझर’ पद्धतीचा अभ्यास करण्यात आला आहे. या पद्धतीत बाहेरील हवा अनुकूल तापमानाची असताना तिचा उपयोग माहिती केंद्रातील उष्णता कमी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे यांत्रिक शीतकरण यंत्रणेवरील भार कमी होतो आणि ‘मुक्त शीतकरण’ शय होते.
 
पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीनेही शीतकरण तंत्रज्ञानात मोठे बदल होत आहेत. द्रव-आधारित ‘इकोनोमायझर’ पद्धतीमध्ये माहिती केंद्रातून परत येणार्‍या गरम हवेतील उष्णता पाण्याकडे हस्तांतरित केली जाते. त्यामुळे हवेचे पूर्वशीतकरण होते आणि त्यानंतरच्या शीतकरण यंत्रणेवरील भार कमी होतो. परिणामी, शीतकरण यंत्राला कमी क्षमतेने काम करावे लागते. या पद्धतीचा वापर उच्च घनतेची संगणकीय उपकरणे आणि ‘ब्लेड सर्व्हर’ असलेल्या माहिती केंद्रात करण्यात आलेल्या अभ्यासात दिसून आला.
 
पाण्याची बचत करण्यासाठी केवळ एकाच तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे पुरेसे ठरणार नाही. बंदिस्त जलपरिसंचरण व्यवस्था, पुनर्वापरित पाण्याचा वापर, थेट संगणकीय घटकांपर्यंत द्रव पोहोचविणारे शीतकरण आणि द्रवामध्ये संगणकीय उपकरणे बुडवून त्यांची उष्णता कमी करणार्‍या पद्धती यांचा वापर वाढविण्याची दिशा जागतिक पातळीवर पुढे येत आहे. यामुळे ताज्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्याची क्षमता निर्माण होते.
 
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही या बदलाची केवळ कारणीभूत शक्ती नसून, त्यावरील उपायाचाही भाग बनू शकते. तापमान, आर्द्रता, वीजवापर, पाण्याचा वापर आणि शीतकरणाची गरज यांचे सतत निरीक्षण करून संगणकीय प्रणाली स्वतःच्या गरजेनुसार शीतकरण नियंत्रित करू शकतात. भविष्यातील माहिती केंद्रे केवळ मोठ्या संगणकीय क्षमतेची नसून कमी ऊर्जा, कमी पाणी आणि अधिक कार्यक्षमतेवर आधारित असणे आवश्यक आहे. जागतिक डिजिटल विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता यांच्यात संघर्ष असण्याची गरज नाही. योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तर दोन्ही उद्दिष्टे एकाचवेळी साध्य करता येऊ शकतात.




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर