मुंबई : (Charity Hospitals Maharashtra) धर्मादाय रुग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेल्या रुग्णशय्यांची माहिती तसेच केंद्र शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती दर्शनी भागात ठळकपणे लावावी, असे निर्देश केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये जनऔषधी केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी केली.
केंद्र शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना मिळावा, यासाठी अधिक नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची गरज जाधव यांनी व्यक्त केली. केंद्राच्या योजनांच्या माध्यमातून रुग्णालयांमधील पायाभूत सुविधा वाढविण्यासह या योजनांचा नागरिकांमध्ये अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा, असेही त्यांनी सांगितले.(Charity Hospitals Maharashtra)
केंद्र शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा आढावा घेण्यासाठी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महापालिका रुग्णालयात बैठक झाली. यावेळी महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, खासदार रवींद्र वायकर, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, शिवसेना गटनेते अमेय घोले, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोषी सक्रे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.(Charity Hospitals Maharashtra)
आयुष्मान भारत योजनेच्या कार्डधारक रुग्णांना उपचारासाठी इतर ओळखपत्रे किंवा कागदपत्रे सादर करण्याची सक्ती करू नये, अशी सूचना महापौर रितू तावडे यांनी केली. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये या निर्देशाची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.(Charity Hospitals Maharashtra)
बैठकीत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, जनऔषधी केंद्रे, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, प्रोटॉन थेरपी केंद्र, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कर्करोगाची प्राथमिक तपासणी, अत्याधुनिक आयुष दवाखाना, महिलांसाठी मानसिक आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य निधी, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि सौरऊर्जा प्रकल्प आदी विषयांवर चर्चा झाली.(Charity Hospitals Maharashtra)
केंद्राकडून उपलब्ध होणारा जास्तीत जास्त निधी महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी मिळवून त्याचा प्रभावी आणि वेळेत विनियोग करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जाधव यांनी केले.(Charity Hospitals Maharashtra)