‘सीएए’मुळे विस्थापितांच्या आयुष्याची नवी पहाट!

    14-Aug-2026   
Displaced families who received Indian citizenship under the CAA describe the moment as a new beginning filled with safety, dignity and a sense of belonging.
 
फाळणीच्या जखमा केवळ इतिहासाच्या पानांवर नाहीत; त्या आजही लाखो कुटुंबांच्या स्मृतीत आणि आयुष्यांत जिवंत आहेत. मातृभूमीपासून ताटातूट, धार्मिक छळ, विस्थापन आणि वर्षानुवर्षे अनिश्चिततेत जगण्याची वेदना सोसलेल्या अनेकांसाठी भारत ही केवळ आश्रयभूमी नव्हती, तर आपल्या मुळांशी पुन्हा जोडले जाण्याची आशा होती. या पार्श्वभूमीवर ‘नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए)’ अनेक विस्थापितांसाठी नव्या आयुष्याची दारे उघडणारा ठरला. भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र हातात आल्यानंतर त्यांच्या मनात निर्माण झालेला आनंद, दिलासा, सुरक्षिततेची भावना आणि ‘आपण आता अधिकृतपणे याच देशाचे आहोत,’ हा आत्मविश्वास शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. आज, दि. १४ ऑगस्ट रोजीच्या ‘विभाजन विभिषिका स्मृतिदिना’निमित्ताने फाळणीच्या वेदनेपासून भारतीय नागरिकत्वाच्या अभिमानापर्यंतचा हा प्रवास नेमका कसा आहे,
हे ‘सीएए’अंतर्गत नागरिकत्व मिळालेल्या भारतीय नागरिकांशी संवाद साधून जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
फाळणीचे ते रक्तपिंजलेले दिवस, आपल्याच मातृभूमीपासून ताटातूट होण्याचे ते असह्य दुःस्वप्न आणि स्वतःच्याच घरात परके होण्याचे ते असीम दुःख... दि. १४ ऑगस्ट हा ‘विभाजन विभिषिका स्मृतिदिन’ आपल्याला याच वेदनांची आणि आहुतींची आठवण करून देतो. अखंड भारताच्या काळजावर उमटलेला फाळणीचा तो व्रण आजही अनेक पिढ्यांच्या मनात कायम आहे. पण, या वेदनेच्या गडद सावलीत आशेचा एक नवा किरण घेऊन आला, तो म्हणजे ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ अर्थात ‘सीएए!’
वर्षानुवर्षे स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडणार्‍या, धार्मिक छळाला सामोरे जाणार्‍या लाखो विस्थापितांसाठी ‘सीएए’ हा केवळ कायदा नव्हता, तर त्यांना स्वतःच्या मुळांशी पुन्हा जोडणारा एक भावनिक आणि नैतिक आधार होता. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या शेजारील देशांमध्ये अल्पसंख्याक म्हणून जगताना ज्यांनी दैनंदिन भीती, अन्याय आणि मानहानी सहन केली, त्यांच्यासाठी भारताची सीमा ही केवळ भूराजकीय रेषा नव्हती, तर तो आशेचा शेवटचा किरण होता. हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन या सहा समुदायांतील बांधवांनी केवळ आपल्या श्रद्धेचे रक्षण करण्यासाठी सर्व काही मागे सोडून या भूमीत आश्रय घेतला होता.
 
१९४७ मध्ये झालेली भारताची फाळणी हा दक्षिण आशियाच्या संपूर्ण इतिहासाला कलाटणी देणारा एक नकोसा आणि वेदनादायी अध्याय ठरला. ‘हिंदू बहुसंख्य भारत’ आणि ‘मुस्लीम बहुसंख्य पाकिस्तान’ अशा धार्मिक धर्तीवर रेषा आखल्या गेल्या आणि शतकानुशतके एकत्र राहणार्‍या कोट्यवधी जनतेचे भवितव्य एका रात्रीत बदलून गेले. कागदावर घाईघाईने आखलेल्या नव्या सीमांमुळे लाखो लोकांच्या जगण्याची उलथापालथ झाली. या मानवनिर्मित आपत्तीमध्ये सुमारे १४ ते १८ दशलक्ष नागरिक विस्थापित झाले. हिंदू आणि शीख पूर्वेकडे भारतात येण्यासाठी, तर मुस्लीम बांधव पश्चिमेकडे पाकिस्तानच्या दिशेने निघाले.
 
खेडे, शहरे आणि प्रांतांची नवी विभागणी झाली. वर्षानुवर्षे जपलेली सामाजिक आणि आर्थिक संबंधांची वीण क्षणार्धात उसवून गेली. धर्मांध जमावांनी संपूर्ण समुदायांना लक्ष्य केले. या हिंसेत आणि अत्याचारांमध्ये सुमारे दोन लाख ते २० दशलक्ष (दोन कोटी) नागरिकांची निर्घृण हत्या झाली, असा अंदाज वर्तवला जातो. या पाशवी कृत्यांचा सर्वाधिक फटका निष्पाप हिंदूंना आणि विशेषतः महिलांना बसला, ज्यांना या धर्मांधतेची अतोनात किंमत मोजावी लागली. या फाळणीचे राजकीय परिणाम अत्यंत दूरगामी आणि गंभीर ठरले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुढे झालेली तीन युद्धे, सीमेवरील सततचा तणाव आणि अनेक दशकांपासून सुरू असलेले शत्रुत्व ही सर्व याच फाळणीची फलश्रुती. फाळणीनंतरही शेजारील मुस्लीम राष्ट्रांमध्ये अल्पसंख्याक राहिलेल्या हिंदू, शीख आणि इतर समुदायांवर धार्मिक छळ आणि अत्याचार अविरतपणे सुरूच राहिले.
 
आजच्या काळात जे लोक हिंदू समाजाला ‘असहिष्णू’ ठरवण्याचा धादांत खोटा प्रयत्न करतात, ते शेजारील देशांतील अल्पसंख्याकांच्या विस्थापनावर आणि धार्मिक छळावर सोयीस्करपणे मौन बाळगतात. जर शेजारील मुस्लीम राष्ट्रांनी सहिष्णुता दाखवून तेथील अल्पसंख्याकांना सन्मानाची वागणूक दिली असती, तर तिथल्या हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांना आपला धर्म, प्राण आणि मानमर्यादा वाचवण्यासाठी विस्थापित व्हावे लागले नसते.
 
डिसेंबर २०१९ मध्ये संसदेत मंजूर झालेला आणि दि. ११ मार्च २०२४ रोजी अधिसूचित झालेला ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ या विस्थापितांच्या आयुष्यातील नव्या पहाटेची नांदी ठरला. दि. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आलेल्या या बांधवांसाठी नागरिकत्वाच्या वास्तव्याची अट १२ वर्षांवरून पाच वर्षे करण्यात आली. जेव्हा या कायद्यांतर्गत पहिल्यांदा एखाद्या विस्थापिताच्या हातात ‘भारतीय नागरिकत्वा’चे प्रमाणपत्र आले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे केवळ आनंदाचे नव्हते, तर अनेक दशकांच्या वनवासातून मिळालेल्या मुक्तीचे होते. ‘आता आम्ही या देशाचे अधिकृत नागरिक आहोत; आमची मुले आता निर्भयपणे जगू शकतात,’ हा भाव प्रत्येक विस्थापितांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता.
 
आपल्याच मायभूमीत परतण्याची आस उराशी बाळगून पिढ्यान्पिढ्या वनवास भोगणार्‍या या आत्म्यांना अखेर त्यांचा खरा हक्क मिळाला. दि. १४ ऑगस्टच्या या ऐतिहासिक आणि संवेदनशील दिवशी, जेव्हा आपण फाळणीच्या यातनांचे स्मरण करतो, तेव्हाच ‘सीएए’च्या माध्यमातून लाखो विस्थापितांना मिळालेले हे छत्र म्हणजे एका ऐतिहासिक अन्यायाचे परिमार्जन आहे. स्वतःच्या मातृभूमीत मिळालेली ही ओळख, हे नागरिकत्व आणि मिळणारा सन्मान म्हणजे केवळ कायद्याची प्रक्रिया नसून, तुटलेल्या नात्यांची झालेली ही एक भावनिक पुनर्भेट आहे.
 
‘भारतीय नागरिकत्व कायद्या’तील सुधारणेमुळे ज्या निर्वासितांना भारताचे अधिकृत नागरिकत्व मिळाले आहे, त्यांच्या भावना केवळ आनंदापुरत्या मर्यादित नसून, त्यात एक खोल दिलासा दडला आहे. फाळणीच्या ऐतिहासिक वेदनांवर फुंकर घालत भारताने स्वीकारलेली ही सहिष्णुतेची भूमिका या नवनागरिकांच्या मनात देशप्रेमाची आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ करते. आज हे नागरिक भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन देशाच्या प्रगतीत, संस्कृतीत आणि विकासात आपले पूर्ण योगदान देण्यासाठी उत्सुक आहेत.
 
आईच्या कुशीतल्या बाळासारखी सुरक्षिततेची आणि आपलेपणाची भावना
 
पाकिस्तानमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला दि. ७ मे २००९ रोजी भारतात येण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानुसार आम्ही रेल्वेने भारतात आलो. भारतामध्ये आल्यानंतरचे जीवन आमच्यासाठी खूप चांगले राहिले. इथे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आणि कोणत्याही प्रकारची भीती किंवा चिंता वाटली नाही. भारतातील प्रत्येक नागरिकाने आम्हाला सहकार्य केले. त्यामुळे भारतात राहताना आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणवली नाही. भारताच्या स्थानिक नागरिकांनी, तसेच आमच्या समुदायातील लोकांनी आमचे अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने स्वागत केले. आम्हाला कधीही परकेपणाची भावना आली नाही किंवा न्यूनगंड वाटला नाही. मात्र, भारतीय नागरिकत्व मिळण्याची प्रतीक्षा आमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. जेव्हा पहिल्यांदा अधिकृतपणे भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र आमच्या हातात आले, तेव्हा आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्या क्षणी आम्हाला अभिमानाने स्वतःला ‘भारतीय’ म्हणवून घेण्याचा अधिकृत अधिकार मिळाला, ही भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. नागरिकत्व मिळाल्यानंतर मतदानाचा अधिकार मिळाला आणि भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकारही आम्हाला प्राप्त झाले. नवजात बाळाला आपल्या आईच्या कुशीत असताना जी सुरक्षितता, माया आणि आनंदाची अनुभूती मिळते, अगदी तशीच भावना आम्हाला भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर झाली. भारत हा अथांग शयता आणि विस्तीर्ण क्षितिजांची भूमी आहे. इथे अनुभवायला मिळणारे स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेची भावना आम्हाला अत्यंत मौल्यवान वाटते. आज संपूर्ण जग अशांतता आणि तणावाच्या छायेत असताना, भारतात मात्र आम्ही शांतपणे आणि सुरक्षितपणे झोपू शकतो. यापेक्षा मोठे भाग्य आणखी काय असू शकते? भारत सरकार आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचे आम्ही मनापासून आभार मानतो.
- आकाश चावला, अंबरनाथ
 
आयुष्याला नवे पंख मिळाल्याची अविस्मरणीय अनुभूती
 
मी मूळचा पाकिस्तानचा रहिवासी असून, डिसेंबर २०१३ मध्ये नातेवाईक आणि व्यवसायाच्या कारणामुळे भारतात आलो. भारतात आल्याच्या पहिल्याच दिवसापासून हा देश मला आपलासा वाटला. सुरुवातीला काही किरकोळ अडचणी आल्या; मात्र भारतातील स्थानिक नागरिक आणि समाजाने आम्हाला अतिशय आपुलकीने स्वीकारले. व्यवसाय उभा करण्यासाठीही येथील लोकांनी मनापासून मदत केली. त्यामुळे भारतात स्थिरावताना आम्हाला कधीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला नाही. मात्र, भारतीय नागरिकत्व मिळेपर्यंत मनात एक प्रकारची अनिश्चितता होती. ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’मुळे ही प्रतीक्षा संपली आणि अवघ्या २० दिवसांत मला भारतीय नागरिकत्व मिळाले. नागरिकत्वाचे प्रमाणपत्र हातात घेतलेला क्षण माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय होता. भारताला आम्ही आधीपासूनच ‘आपला देश’ मानत होतो; मात्र आता त्या नात्याला कायदेशीर आणि अधिकृत ओळख मिळाली आहे. यासाठी भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या प्रक्रियेत योगदान देणार्‍या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
- अनित कुमार हस्सनी, उल्हासनगर
 
प्रक्रियेवर विश्वास, व्यावहारिक अडचणी सोडवण्याची अपेक्षा
 
‘सीएए’ची घोषणा झाली, तेव्हा आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. आता भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग सुकर होईल, अशी आम्हाला आशा होती. या कायद्यामुळे आमच्यासारख्या पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांना आपल्या आयुष्याला अधिकृत ओळख मिळण्याची संधी उपलब्ध झाली. नागरिकत्वासाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करावी लागते. या प्रक्रियेमुळे काही व्यावहारिक अडचणी येतात. मात्र, आम्ही त्यांना थेट ‘अडथळे’ म्हणणार नाही. कारण, पाकिस्तानचा नागरिक भारताचा नागरिक होणार असेल, तर त्याची सखोल चौकशी होणे स्वाभाविक आणि आवश्यकच आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने प्रत्येक बाब तपासणे आम्हालाही योग्यच वाटते. आमच्या बाबतीत या प्रक्रियेत सकारात्मक प्रगती होत आहे. माझ्या मुलाला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे, तर माझे आणि माझ्या वडिलांचे नागरिकत्व मिळण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. त्यामुळे आम्हाला याबाबत समाधान आणि विश्वास आहे की, ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पुढे जात आहे. ‘सीएए’ची प्रक्रिया सुरू आहे, त्यातून अनेकांना नागरिकत्व मिळत आहे आणि आम्हालाही त्याचा सकारात्मक अनुभव येत आहे. त्यामुळे सरकारने या प्रक्रियेकडे थोडे अधिक लक्ष देऊन अशा व्यावहारिक प्रश्नांवर जलद गतीने विचार करून काही सुलभ मार्ग काढला, तर आमच्यासारख्या नागरिकांसाठी ही प्रक्रिया आणखी सोपी होऊ शकते. आम्ही सरकारच्या प्रयत्नांकडे सकारात्मकतेने पाहात आहोत. शेवटी आम्हाला या देशात सुरक्षितपणे आणि सन्मानाने जगायचे आहे आणि अधिकृतपणे ‘भारतीय नागरिक’ म्हणून ओळख मिळवायची आहे. त्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेवर आमचा विश्वास आहे आणि उर्वरित प्रश्नही सरकारच्या सहकार्याने निश्चितच मार्गी लागतील, अशी आम्हाला आशा आहे.
- अनिल कटारिया, ऐरोली
 
सुरक्षितता, सन्मान आणि आपलेपणाची नवी ओळख मिळाली
 
पाकिस्तानातील धार्मिक त्रास आणि असुरक्षिततेच्या वातावरणामुळे २००४ मध्ये भारतात आलो. भारतात आल्यानंतरचा माझा जीवनप्रवास अत्यंत सुखद आणि समाधानाचा राहिला. भारतात मला शांतता, सुरक्षितता आणि आपलेपणाची जाणीव झाली. स्थानिक समाजातील लोकांनीही आमच्याशी अतिशय चांगले वागून प्रेम, सन्मान आणि आपुलकी दिली. या काळात भारत सरकारकडूनही आम्हाला मोठे सहकार्य मिळाले. ‘सीएए’अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळाल्याचा क्षण माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत भावूक आणि आनंदाचा होता. अनेक वर्षांची प्रतीक्षा, संघर्ष आणि मनातील असुरक्षितता अखेर संपली, अशी भावना त्यावेळी झाली. भारताने आम्हाला स्वीकारले आणि आता आपण अधिकृतपणे या देशाचा भाग आहोत, याचा मनापासून अभिमान आणि मोठा दिलासा वाटला. भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र हा आमच्यासाठी केवळ एक कागदपत्र नाही, तर सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि स्थिर जीवनाची नवी ओळख आहे. माझ्या कुटुंबासह भारतात सन्मानाने आणि निश्चिंतपणे जीवन जगण्याचा आत्मविश्वास मला मिळाला. भारताने आम्हाला केवळ नागरिकत्व दिले नाही, तर आम्हाला सुरक्षित आणि सन्मानपूर्ण आयुष्य जगण्याची संधी दिली आहे.- दिलीप कुमार खत्री, अंबरनाथ 






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर