मुंबई : (BMC) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या घरी भेटी देऊन गणना अर्ज भरून घेण्यासाठी अवघे ४ दिवस शिल्लक असून १७ ऑगस्ट २०२६ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत अधिक प्रभावीपणे काम करून संपूर्ण प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईतील सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिले.
महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी मुंबई शहर व उपनगरातील 'एसआयआर' कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या वेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, डॉ. विपिन शर्मा, अभिजीत बांगर, डॉ. अविनाश ढाकणे, तसेच मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह सर्व मतदार नोंदणी अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. (BMC)
या वेळी बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले की, बीएलओ कडे 'बुक अ कॉल'द्वारे प्राप्त होणाऱ्या मतदारांच्या सर्व शंकांचे तत्काळ निरसन करण्यात यावे. तसेच, अद्याप जमा न झालेले गणना अर्ज संकलित करून डिजिटायझेशनची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, जेणेकरून विहित वेळेत काम पूर्ण होईल. (BMC)
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी चिन्हांकित मतदारांच्या तपासणीवर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. "पात्र मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट होतील आणि हयात नसलेल्या मतदारांची नावे नियमानुसार वगळली जातील, याची पूर्ण खात्री करावी. गृहभेटी आणि अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेने काम करावे," असे निर्देश त्यांनी दिले. (BMC)