मुंबई : (Bahawalpur Community) भारत-पाकिस्तान फाळणीच्या घोषणेनंतर मानवी इतिहासातील सर्वात मोठे सक्तीचे स्थलांतर सुरू झाले. यात सुमारे १४ तो १८ दशलक्ष नागरिक विस्थापित झाले. भारतात आलेल्या विस्थापितांसाठी दिल्ली, पंजाब, राजस्थान, मुंबई आणि महाराष्ट्रातील उल्हासनगर, धुळे इ. यांसारख्या ठिकाणी विस्थापितांच्या छावण्या उभारण्यात आल्या. पंजाबी, सिंधी, बहावलपुरी समाजाने या फाळणीचा सर्वांत मोठा फटका सहन केला. सर्वस्व गमावल्यानंतरही या लोकांनी हार मानली नाही. त्यांनी कष्टाच्या जोरावर शून्यातून पुन्हा आपले विश्व उभे केले आणि भारताच्या आर्थिक व सामाजिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. पंजाबी, सिंधी समाजाविषयी अनेक चर्चा होतात; परंतु या विस्थापितांमधील बहावलपुरी समाज हा इतिहासाच्या पानांवर आणि मुख्य प्रवाहातील चर्चांमध्ये फारसा प्रकाशझोतात आला नाही. (Bahawalpur Community)
बहावलपूर संस्थानातून भारतात आलेल्या हजारो हिंदू कुटुंबांचा इतिहास हा केवळ विस्थापनाचा इतिहास नाही, तर स्वाभिमान, सांस्कृतिक जतन आणि राष्ट्रनिष्ठेचाही इतिहास आहे. बहावलपूर संस्थान, जे आज पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा भाग आहे, ते कधीकाळी सांस्कृतिक विविधता, धार्मिक सहिष्णुता आणि समृद्ध व्यापारी जीवनासाठी प्रसिद्ध होते. तेथे हिंदू, मुस्लिम, शीख तसेच इतर समुदाय परस्पर विश्वास आणि सहकार्याने राहत होते. बहावलपुरी बोली, स्थानिक लोकपरंपरा, व्यापारी संस्कृती आणि सामाजिक समरसता ही तेथील जीवनाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख होती. फाळणीपूर्व काळापर्यंत सामान्य जनजीवनात धार्मिक आधारावरील वैमनस्य तुलनेने कमी होते. (Bahawalpur Community)
फाळणीदरम्यान बहावलपूर संस्थानातील अनेक हिंदू कुटुंबांना आपली सुरक्षितता, मातृभूमी आणि सांस्कृतिक अस्मिता यांच्यात अत्यंत कठीण निर्णय घ्यावा लागला. हिंदू धर्माचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी बहावलपूरच्या हिंदूंनी आपली जन्मभूमी सोडली; मात्र धर्म, संस्कृती आणि राष्ट्रीय ओळख यांच्याशी तडजोड करणे त्यांनी स्वीकारले नाही. विस्थापनाची आव्हाने पेलत बहावलपुरी समाजाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर समाजात एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली. केवळ पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानपुरता सिमीत न राहता धुळे, नाशिक आणि जळगाव या भागांत या समाजाने आपल्या अफाट श्रम, उद्यमशीलता आणि उत्कृष्ट संघटनक्षमतेच्या बळावर आपले नवजीवन यशस्वीपणे उभे केले. (Bahawalpur Community)
महाराष्ट्रात स्थायिक झाल्यानंतर बहावलपुरी समाजाने व्यापार, वस्त्रोद्योग, शेती, सेवा क्षेत्र आणि सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले. आज हा समाज केवळ एक स्वतंत्र समुदाय म्हणून नव्हे, तर भारतीय समाजातील अत्यंत सक्रिय, जागृत आणि जबाबदार नागरिक म्हणून प्रस्थापित झाला आहे. नव्या प्रदेशात व वातावरणात स्थायिक होऊनही बहावलपुरी समाजाने आपली मूळ मातृभाषा, कौटुंबिक मूल्ये, सामाजिक रूढी-परंपरा आणि सांस्कृतिक स्मृती अत्यंत प्रेमाने व निष्ठेने जपून ठेवल्या आहेत. (Bahawalpur Community)
१३ एप्रिलला साजरा होतो ‘बहावलपूर दिवस’
धुळ्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत या समाजाने स्वतःची भव्य सभागृहे तसेच विविध सामाजिक संस्था उभारल्या आहेत. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हा समाज सातत्याने एकत्र येत असून, आपली सामाजिक एकजूट अधिक दृढ करत आहे. या सांस्कृतिक वारशाचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणजे दरवर्षी १३ एप्रिल रोजी अत्यंत उत्साहात साजरा केला जाणारा ‘बहावलपूर दिवस’. या दिवसाच्या निमित्ताने समाज आपल्या मुळांशी, संस्कृतीशी आणि परंपरांशी असलेले नाते जपत एकजूट कायम ठेवतो. तसेच, हा सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवून त्यांना आपल्या इतिहासाची आणि अस्मितेची जाणीव करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही या माध्यमातून केले जाते. (Bahawalpur Community)
कोणत्याही परिस्थितीत धर्मांतरण स्वीकारायचे नाही
फाळणीनंतर भारतात स्थलांतर करण्यापूर्वी बहावलपुरी समाजातील अनेक कुटुंबे काही काळ पाकिस्तानातच राहत होती. मात्र, आपल्या धर्माचे रक्षण करायचे आणि कोणत्याही परिस्थितीत धर्मांतरण स्वीकारायचे नाही, असा ठाम निर्णय त्यांनी घेतला होता. कालांतराने त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव वाढू लागला आणि ‘धर्मांतर करा, अन्यथा मरा’ अशा धमक्याही दिल्या जाऊ लागल्या. या काळात समाजातील अनेकांवर हल्ले झाले. वाढत्या अत्याचारांमुळे पाकिस्तानात राहणे धोकादायक ठरत असल्याची जाणीव बहावलपुरी समाजाला झाली आणि अखेर तेथून विस्थापित होणेच योग्य ठरेल, असा निर्णय समाजातील तत्कालीन लोकांनी घेतला. केवळ धर्मरक्षणाच्या हेतूने बहावलपुरी समाजाने आपली घरे, संपत्ती, व्यवसाय आणि परिचित जीवन मागे सोडले आणि नव्याने आयुष्य उभारण्याच्या उद्देशाने भारतात येण्याचा निर्णय घेतला. (Bahawalpur Community)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान
कराचीमध्ये फाळणीच्या काळात बहावलपुरी समाजाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी मदत मिळाली. स्थानिक नागरिकांनंतर संकटाच्या काळात बहावलपुरी समाजाच्या मदतीसाठी पुढे आलेली प्रमुख संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अशी भावना आजही समाजातील अनेकजण व्यक्त करतात. (Bahawalpur Community)
फाळणीने समृद्ध-स्थिर जीवनाला मोठा धक्का
बहावलपूर प्रांतात त्या काळी वास्तव्यास असलेल्या बहावलपुरी समाजातील कुटुंबांकडे स्वतःची शेती होती आणि मोठ्या प्रमाणावर धान्याचे उत्पादन घेतले जात असे. त्यांनी स्वतः पिकवलेले धान्य घेऊन दिल्लीपर्यंत व्यापारासाठी जाण्याची परंपरा होती. त्यामुळे समाजाची आर्थिक परिस्थिती भक्कम होती आणि पुढील पिढ्यांमध्येही व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला होता. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करण्याकडेच त्यांचा कल होता. प्रत्येक कुटुंबाची स्वतंत्र हवेली, शेती तसेच उद्योग-व्यवसायाची साधने होती. मात्र, फाळणीने या समृद्ध आणि स्थिर जीवनाला मोठा धक्का दिला आणि त्यानंतर संपूर्ण परिस्थितीच बदलून गेली. (Bahawalpur Community)
मिळेल ते काम स्वीकारावे लागले
बहावलपुरी समाजातील महिलांनी आपले दागदागिने आणि इतर मौल्यवान वस्तू मागे सोडून भारतात स्थलांतर केले. शून्यातून नव्याने आयुष्य उभे करायचे असेल, तर उदरनिर्वाहासाठी काही ना काही काम करणे अपरिहार्य होते. एकेकाळी बहावलपूर प्रांतात मोठे उद्योजक आणि संपन्न कुटुंबे म्हणून ओळख असलेल्या या समाजाला फाळणीनंतर भारतात आल्यानंतर मात्र मिळेल ते काम स्वीकारावे लागले. काहींनी मजुरी केली, तर काहींनी भाजीविक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. भारतात आल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या संपर्कात येत त्यांनी त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली आणि अशा प्रकारे संघर्षातून नव्याने आपले जीवन उभे करण्याचा प्रवास सुरू झाला. (Bahawalpur Community)
बहावलपुरी समाजाची उपस्थिती असलेली काही प्रमुख ठिकाणे
धुळे (महाराष्ट्र)
राजपुरा (राजस्थान)
सोनीपत, पानिपत (हरियाणा)
नवी दिल्ली (दिल्ली)
सिहोर (मध्य प्रदेश)
हरिद्वार (उत्तराखंड)
बहावलपुरी समाजातील काही प्रमुख आडनावे :
सदाना
रेलन
तनेजा
गुंडियाल
मंदान
पोबली
खत्री
'भारतीय बहावलपुरी सभा'ची स्थापना व्हावी...
भारतात आल्यानंतर आमच्यासमोर अनेक आव्हाने उभी राहिली. आमचा पोशाख वेगळा होता, भाषेचेही आव्हान होते. मात्र, येथील भारतीय समाजाने आम्हाला आपल्यात सामावून घेतले आणि मनापासून स्वीकारले. त्यामुळे आम्हाला फारशा अडचणी जाणवल्या नाहीत. भारतमातेला आम्ही आमची माता मानतो. तिने आजवर आमच्या अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी आम्हाला खूप काही दिले. मी एक गोष्ट अभिमानाने सांगू शकतो की, ज्या-ज्या शहरांमध्ये बहावलपुरी समाज वास्तव्यास आहे, त्या त्या शहरांच्या अर्थव्यवस्थेत या समाजातील उद्योजकांचा मोठा वाटा आहे. मात्र, बहावलपुरी समाज म्हणून त्यांची ओळख फारशी ठळकपणे समोर आली नाही. भारत सरकारकडे आमची एक विनंती आहे की, बहावलपुरी समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी ‘बहावलपुरी कौन्सिल’ची स्थापना करण्यात यावी. या माध्यमातून देशभरातील बहावलपुरी समाजाला एकमेकांशी जोडता येईल आणि समाजाच्या विविध प्रश्नांवर तसेच विकासाच्या मुद्द्यांवर एकत्रितपणे काम करता येईल. तसेच, भारतीय सिंधू सभेच्या धर्तीवर ‘भारतीय बहावलपुरी सभा’चीही स्थापना व्हावी, अशी आमची मनापासून इच्छा आहे.
- वैद्य संजय सदाने, बहावलपुरी समाज (Bahawalpur Community)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक