अहिल्यादेवी होळकर : मंदिरनिर्मिती आणि भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनरुत्थान

    14-Aug-2026

Ahilyabai Holkar 
 
‘धर्माटनातून देशाटना’कडे झालेली भारतीय संस्कृतीची सर्वांगीण जडणघडण ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अभूतपूर्व योगदानाशिवाय अपूर्णच! अहिल्यादेवींनी केवळ मंदिरांचा जीर्णोद्धार, धर्मशाळा, घाटांची उभारणीच केली नाही, तर भारतीय संस्कृतीला शाश्वत मूलाधारही प्राप्त करुन दिला. त्यानिमित्ताने मंदिरनिर्मिती आणि भारतीय ज्ञानपरंपरेच्या पुनरुत्थानातील अहिल्यादेवींच्या व्यापक कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
 
भारतीय संस्कृती ही मातृसत्ताक संस्कृती मानली जाते. इथे देव, धर्म, देश प्रथम कर्तव्य समजले जाते; तर हिंदू धर्माचा पाया मातृसत्ताक संस्कृतीवर उभा असून, हिंदू व्यक्तीस धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे मानव जीवनाचे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत, तर भारतीय समृद्ध समाजजीवनाचे प्रतिबिंब मंदिरांच्या खांबांवर, भिंतींवर मूर्तिशास्त्राच्या रूपाने, तसेच विविध धर्मग्रंथाच्या श्लोकांमध्ये पाहायला मिळते.
 
भारत हा सुजलाम्-सुफलाम् देश म्हणून ओळखला जात होता. इथली शेती, संस्कृती, धर्म, अर्थ, मंदिर, परंपरा अखंडित होती. या संपूर्ण व्यवस्थेला संपवण्यासाठी वेगवेगळ्या कालखंडात परकीय आक्रांतांनी आक्रमण करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आपल्या संस्कृतीवर धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक आघात केले. शस्त्राच्या बळावर धर्मांतरण घडवून आणले. तरीही, हिंदू धर्म आणि मंदिरे ताठ मानेने उभी आहेत. कारण, शेकडो वर्षांच्या आक्रमणाला केवळ २८ वर्षांच्या कारकिर्दीत उत्तर देऊन १२ ज्योतिर्लिंगे, सप्तपुरी, चारधामांसह शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरनिर्मिती आणि भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनरुत्थान केले.
 
होळकर राजघराणे शिवभक्त राजघराणे असून, सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या हयातीत करावयाचे धार्मिक कार्य त्यांच्या पुत्रवधू अहिल्यादेवींनी हाती घेतले होते. अहिल्यादेवींनी १२ ज्योतिर्लिंगे, सप्तपुरी, चारधामांसह शेकडो ठिकाणी धार्मिक कार्ये केलेली असून, परकीय आक्रांतांनी क्षतिग्रस्त केलेली सर्व मंदिरे नव्याने उभी केली. शिव मंदिरांसह त्यांनी विष्णू आणि रामाची मंदिरेसुद्धा बांधली. या मंदिरांची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे थोडक्यात सांगता येतील.
 
१) ही मंदिरे शिल्पकलेच्या पूर्व सिद्धान्तांच्या अनुसार आहेत. शिखर, कलश, सभामंडप इ. पारंपरिक शैलीवर आधारित आहेत.
 
२) कुठे लाल पाषाण, तर कुठे चुनखडकाचा वापर केला गेला आहे. गया येथील मंदिरात ‘विष्णू पदी’ नामक काळ्या पाषाणाचा वापर केला गेला आहे. 
 
३) काही मंदिरांच्या द्वारांवर शिलालेख कोरण्यात आले आहेत.
 
४) बहुतांश मंदिरांवर द्रविड शैलीचा स्पष्ट प्रभाव आहे.
 
५) मूर्तीची घडण, तसेच त्यांची स्थापना मोठी आकर्षक आहे.
 
६) मंदिर स्थापत्य आणि पुरातत्त्व जतन करून प्राचीन वारसा जतन केला.
 
अहिल्यादेवींनी निर्माण केलेल्या मंदिरांपैकी काशीचे काशी विश्वनाथ, गौतमेश्वर आणि अहिल्येश्वर, तारकेश्वर नामक विशाल मंदिर (यांवर शिलालेख उत्कीर्ण आहेत), रामेश्वरचे राधाकृष्ण मंदिर, अयोध्येचे श्रीराम मंदिर, श्री त्रेता राम मंदिर, श्रीभैरव मंदिर, तसेच नागेश्वर मंदिर, उज्जैनचे चिंतामणी गणपती मंदिर, श्रीबालाजी मंदिर आणि जनार्दन मंदिर, बद्रीनारायणचे श्रीहरी मंदिर, तसेच श्रीकेदारेश्वर मंदिर, जगन्नाथपुरीचे रामचंद्र मंदिर, वेरूळचे शिव मंदिर, कुरुक्षेत्रचे शिव मंदिर, गया येथील विष्णुपद मंदिर आणि अहिल्याबाई मंदिर, अमरकंटकचे विश्वेश्वर मंदिर, पंढरपूरचे श्रीराम मंदिर, जेजुरीमधील श्रीमल्हारी मार्तंड कुलदेवतेचे मंदिर, संगमनेरचे राम मंदिर, नाशिकचे अहिल्याराम महादेव मंदिर, ओंकारेश्वरचे अमलेश्वर मंदिर, गंगोत्रीचे विश्वनाथ, केदारनाथ, भैरव आणि अन्नपूर्णा मंदिर, तरानाचे तिलभांडारेश्वर मंदिर (यांवर शिलालेख उत्कीर्ण आहे), हंडिया (म. प्र.)चे सिद्धनाथ मंदिर, तसेच महेश्वरची काही मंदिरे. मंदिरांच्या या उल्लेखनीय सूचीमध्ये नर्मदा तीरावर निर्मित हंडियाचे सिद्धनाथ मंदिर चुनखडक, तसेच साधारण ७० फूट उंचीसाठी प्रसिद्ध आहे. वेरूळचे घृष्णेश्वर महादेव मंदिर लाल पाषाण आणि संरचनात्मक विशेषतांसाठी प्रसिद्ध आहे. गया येथील विष्णुपद मंदिर, अष्टभद्रा शैली स्वर्ण कलश, साधारण १०० फूट उंची, गुम्बदद्वार सभामंडपासाठी प्रसिद्ध आहे. ‘विष्णुपदी’ नामक काळ्या पाषाणाचा वापर केलेला आहे.
 
मंदिर स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासक डॉ. माधवी महाके म्हणतात की, "मराठेशाही हेलकावे खाताना युरोपियन सत्तांचा हस्तक्षेप वाढून इंग्रजांनी आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली होती. अशा अस्थिर काळात राजकीय स्थैर्य आपल्या संस्थानास प्राप्त करून देशभर धार्मिक व लौकिक स्थापत्यनिर्मितीवर अहिल्यादेवी होळकर यांनी भर दिल्याचे दिसून येते. त्याचे कारण स्वहितापेक्षा परोपकार असल्याचेच दिसते.”
 
१. स्वधर्म, अस्मिता टिकविणे.
 
२. सत्प्रवृत्तीला आवाहन करणे.
 
३. धर्म, संस्कृतीचे रक्षण व परंपरा जतन करणे.
 
४. कष्टकरी, कसबी शिल्पकार, स्थपती, पाथरवट यांच्या हातांस काम देणे.
 
५. लौकिक लोकोपयोगी वास्तूच्या माध्यमातून जनहिताचा विचार करणे.
 
६. स्मारकाच्या माध्यमातून ऋण व्यक्त करणे.
 
७. खासगी संपत्तीचा लोकोद्धारक कार्यासाठी धार्मिक, लौकिक वास्तुनिर्मितीसाठी वापर करणे.
 
८. पुण्यसंचय करणे, निवासव्यवस्था करणे.
 
९. जीर्ण धार्मिक वास्तू, जलस्रोत यांच्या जीर्णोद्धारातून वास्तूचे आयुर्मान वाढविणे.
 
अहिल्यादेवींचे मंदिर स्थापत्यनिर्मितीतील योगदान अतिशय महत्त्वाचे असून, भारतात इसवी सनाचे सहावे शतक ते इ. स. १२वे शतक हा मंदिरबांधणीचा सुकाळ होता. गुप्तकाळात मंदिरबांधणीचा पाया घातला गेला. इ.स. १२व्या-१३व्या शतकांपर्यंत उत्तर भारतात, तर इ.स. १६व्या शतकापर्यंत दक्षिण भारतात मंदिरे ही केवळ धार्मिक केंद्र न राहता, सामाजिक शिक्षणाची केंद्रे म्हणून बहरत गेली. या मंदिरनिर्मिती, विकास प्रक्रियेवर परकीय आक्रमणे, मंदिर मूर्तिभंजन, राजकीय अस्थिरता व स्थित्यंतरे यांचाही प्रभाव पडल्याने मंदिरांच्या स्थापत्यात अनेक बदल झाले. ज्या काळात अहिल्यादेवी होळकर यांनी भारतभर मंदिरे बांधली, तो कालखंड हा अस्थिर होता. अहिल्यादेवींनी पंढरपूर, जेजुरी, पुष्कर, अमरकंटक, केदारनाथ, अयोध्या, गंगोत्री, नाथद्वारा, बद्रीनारायण, मथुरा, महेश्वर, रामेश्वर, तसेच हरिद्वार आदी स्थानांवर धर्मशाळांची निर्मिती केली. तेथील भव्यता, गुणवत्ता, संरचना, तसेच वास्तू अप्रतिम असून, धर्मशाळेची वास्तुकला विशेष वाटते. अन्नधान्यासाठी खासगी शेती, पाण्याची बारव आणि हौदाच्या माध्यमातून कायम व्यवस्था, तसेच राबता, शस्त्रास्त्रधारी पहारा, उजेडाची व्यवस्था, कारकून व सेवेकरी मंडळीचा राबता. पत्रांची नोंद, पहारेकरी व घड्याळ व्यवस्था धर्मशाळेवर पाहायला मिळत असे.
 
१) प्रमुख प्रवेशद्वार अत्यंत उंच असून पहार्‍याची व्यवस्था मजबूत आहे.
 
२) चारही भिंती उंच आहेत.
 
३) अंगण खुले आणि मध्यभागी तुळशीचे वृंदावन आहे.
 
४) चारही बाजूंना खोल्या आहेत आणि खोल्यांच्या समोर ओसरी आहे.
 
५) जवळपास सर्व धर्मशाळांचे बांधकाम पक्क्या विटा आणि दगडांनी बांधलेल्या आहेत.
 
६) सामान्यपणे प्रत्येक धर्मशाळेत शिवलिंग आणि विविध देवता स्थापित करण्यात आलेले आहेत.
 
७) बहुतांश धर्मशाळांमध्ये अन्नछत्रे आणि सदावर्ताची स्थापना करण्यात आली आहे.
 
८) वास्तूची देखभाल, तसेच कर्मचार्‍यांच्या खर्चासाठी स्थायी व्यवस्था करण्यात आली आहे.
 
९) सामान्यपणे धर्मशाळांची निर्मिती नदी आणि विहिरींच्या निकट करण्यात आली आहे; ज्यामुळे पाण्याची व्यवस्था सुलभ आहे.
 
१०) महेश्वरच्या धर्मशाळा सज्जा आणि अलंकरणाच्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. या धर्मशाळांच्या स्तंभावर नृत्य करणार्‍या, तसेच वाद्य आणि ढोल वाजवणार्‍या आणि जनजीवनसंबंधित स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा कोरल्या आहेत.
 
अहिल्यादेवींद्वारे निर्मित इमारतींमध्ये धर्मशाळांचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याकाळात सामाजिक उपयोगितेच्या दृष्टीने धर्मशाळांचे महत्त्व अत्यंत स्पष्ट आहे. दळणवळणाच्या साधनांचा अभाव असूनही तीर्थयात्रा आणि पिंडदान याकाळाच्या उल्लेखनीय धार्मिक आणि सामाजिक प्रवृत्ती होत्या. जवळपास संपूर्ण देशामध्ये तीर्थयात्रींना थांबण्यासाठी सुख-सुविधांनी युक्त विशाल धर्मशाळांची निर्मिती करून अहिल्यादेवींनी वास्तुकला, तसेच वास्तुनिर्माण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे.
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मंदिर जीर्णोद्धार आणि वास्तुनिर्मितीची नीती दानशीलता या संकुचित धार्मिकतेचा परिणाम नसून जनहित, तसेच सामाजिक; ज्यामुळे पुरातत्त्व, भारतीय ज्ञानपरंपरा, वास्तुकला आणि सामाजिक निर्माणकार्यांना अत्यंत प्रोत्साहन मिळाले. दानशीलतेमुळेच राज्य आणि राज्याच्या बाहेर संपूर्ण भारतात अनेक प्रसिद्ध स्थानी मंदिरांमध्ये घाट, धर्मशाळा, मार्ग, द्वार, छत्री, विहिरी इ.ची निर्मिती आणि त्यांची स्थायी व्यवस्था शय झाली. या वास्तू निर्माणकार्याची ती वैशिष्ट्ये प्रामुख्याने सांगितली जाऊ शकतात -
 
१) अहिल्यादेवींद्वारे निर्मित इमारती राजसी सुखसोई अथवा सत्तेच्या प्रदर्शनाचे प्रतीक नसून लोकहिताच्या, तसेच सार्वजनिक उपयोगाच्या दृष्टीने निर्मित इमारती आहेत.
 
२) अहिल्यादेवींद्वारे निर्मित इमारती राज्यात, तसेच राज्याच्या बाहेर संपूर्ण भारतात पसरलेल्या आहेत. यांचे क्षेत्र बद्रीनाथपासून रामेश्वरम्, द्वारकेपासून जगन्नाथपर्यंत विस्तृत आहे. व्यापक क्षेत्रात पसरलेल्या या इमारती अहिल्यादेवींचा राजकीय दृष्टिकोन प्रतिबिंबित करणार्‍या आहेत.
 
३) प्रस्तुत वास्तू, तसेच निर्माणकार्याची देखभाल आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तीच्या उपजीविकेची स्थायी व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरे, घाट आणि धर्मशाळांची दुरुस्ती, तसेच अन्य खर्चासाठी आसपासच्या काही गावांच्या करांची स्थायी व्यवस्था करण्यात आली होती. जिथे असे झाले नाही; तिथे राजकोशातून वार्षिक निधीची व्यवस्था करण्यात आली होती. या व्यवस्थेचे उद्दिष्ट अहिल्यादेवींच्या वास्तू, निर्माणकार्य आणि त्यांच्या दानशीलतेला स्थायित्व प्रदान करणे हे होते; जेणेकरून अहिल्यादेवींच्या मृत्यूनंतरदेखील या व्यवस्था कायम राहतील.
 
अहिल्यादेवी होळकर यांची मंदिरांच्या जीर्णोद्धारामागील दृष्टी
 
१) आक्रमकांचा विध्वंस आणि अस्मितेवरील आघात-बाबर, खिलजी आणि औरंगजेब यांसारख्या परकीय आक्रमकांनी भारतातील पवित्र मंदिरे लुटली, जाळली आणि उद्ध्वस्त करून पाडली. त्यांनी धार्मिक ठिकाणे बाटवून देवाचे मूळ अधिष्ठान मिटवण्याचा प्रयत्न केला. हा केवळ दगडांवर केलेला हल्ला नव्हता; तर हिंदू समाजाची श्रद्धा, आस्था आणि सांस्कृतिक अस्मिता तुडवून त्यांचा पराभव निश्चित करण्याचा एक प्रयत्न होता. या कठीण काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांकडून मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. कोणत्याही विजयाचा कौल हा केवळ युद्धाच्या मैदानात मिळत नसून, तो संस्कृतीच्या रक्षणात असतो, याची त्यांना जाणीव होती. त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या देवस्थानांचे पुनरुज्जीवन करून हिंदुत्वाचा आत्मा पुन्हा जागृत केला आणि भारतीय समाजमनाला पुन्हा देवत्वाची प्रचिती दिली.
 
अहिल्यादेवींनी केवळ मंदिरे उभारली नाहीत; तर भारतीय स्थापत्य, कला आणि मूर्तिशास्त्र यांना नवसंजीवनी दिली. काशी, सोमनाथ, केदारनाथ यांसारख्या भारतभरातील तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करून त्यांनी भक्ती आणि शक्ती यांचा अभूतपूर्व संगम घडवून आणला. हे कार्य म्हणजे आपल्या सांस्कृतिक व धार्मिक वारशाचे आणि परंपरेचे रक्षण होते. अहिल्यादेवींनी राज्याचा कारभार चालवताना शास्त्र आणि शस्त्र या दोन्ही अंगांचा समतोल साधला. मंदिरउभारणीनंतर तेथे पारंपरिक पूजाअर्चा, नैवेद्य, दिवाबत्ती आणि अन्नदान अविरत सुरू राहावे, यासाठी त्यांनी ठोस व्यवस्था उभारली.
 
वार्षिक उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी त्यांनी पुजारी, गुरव, मानकरी आणि सेवेकरी यांची नियुक्ती केली. या सर्व सेवेची आणि व्यवस्थेची शाश्वती म्हणून त्यांनी स्वतंत्र वर्षासने व इनाम बहाल केले, जेणेकरून ही मंदिरे केवळ वास्तू न राहता जिवंत श्रद्धास्थाने बनून राहतील. अहिल्यादेवी होळकर यांची जीर्णोद्धारामागील दृष्टी ही केवळ वास्तू दुरुस्त करण्याची नव्हती; तर परकीय आक्रमकांनी दुखावलेल्या भारतीय आत्म्याला उभारी देऊन आपली आस्था, श्रद्धा आणि सेवाभाव अमर करण्याची ती एक महान सांस्कृतिक चळवळ होती.




संबंधित मजकूर
404 - Page Not Found

404

Page not found

Sorry, we couldn't find the page you're looking for.

Return to homepage