मुंबई : (ST Mahamandal Smartcard) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने प्रवाशांसाठी सुरु केलेल्या नॅशनल कॉमन मॉबीलीटी कार्ङ म्हणजेच एन.सी.एम.सी स्मार्ट कार्डला वाढता प्रतिसाद मिळत असून १२ ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे, तर त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्ड सक्रिय झाली आहेत.
एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दिशेने महामंडळाने हे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येत आहे. येत्या १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. (ST Mahamandal Smartcard)
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले, “एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. या ‘लालपरी’चा प्रवास काळानुरूप अधिक आधुनिक, डिजिटल आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे.भविष्यात एसटीच्या सेवांमध्ये प्रवाशांचा वेळ वाचविणे आणि प्रवास अधिक सोयीस्कर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. येत्या काळात एन.सी.एम.सी. स्मार्ट कार्डचा वापर आणखी व्यापक करून ‘प्रवासी प्रथम’ या भूमिकेतून एसटीच्या सेवांना नवे डिजिटल रूप देऊ.” (ST Mahamandal Smartcard)
१५ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना एन.सी.एम.सी. कार्डचे वाटप
येत्या १५ ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्मार्टकार्डसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. (ST Mahamandal Smartcard)
प्रवाशांना स्मार्ट कार्ड अधिकृत एसटी आगार, बसस्थानक तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून मिळविता येणार असून, त्याच माध्यमातून कार्ड रिचार्जची सुविधाही उपलब्ध आहे. (ST Mahamandal Smartcard)