
उल्हासनगर : (SIR 2026) निवडणूक कामात हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात तीन शासकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम ३२ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, १४० अंबरनाथ विधानसभा मतदारसंघांतर्गत उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती क्र. ४ च्या कार्यक्षेत्रात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR 2026) कार्यक्रम सुरू आहे. या कामासाठी बीएलओ आणि सहाय्यक अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे आढळले. (SIR 2026)
अश्विनी मोरे (शिक्षक/बीएलओ),मनिषा महाजन (अधीक्षक, उल्हासनगर महानगरपालिका) विशाखा सावंत (वरिष्ठ लिपिक उल्हासनगर महानगरपालिका ) निवडणूक कामकाजाचा आढावा घेताना आणि विशेष सखोल पुनरीक्षण कामात हे कर्मचारी अनुपस्थित राहिल्याचे समोर आले. याप्रकरणी ५ ऑगस्ट २०२६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावूनही त्यांनी कामावर हजर न राहता योग्य खुलासा सादर केला नाही. निवडणूक कामासारख्या अत्यंत गंभीर आणि महत्वाच्या कामात कसूर केल्यामुळे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अलका सतीश पवार यांनी याबाबत हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. (SIR 2026)
याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र खुशाल तायडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (SIR 2026)