राष्ट्रध्वजाचा सन्मान राखुया !

    13-Aug-2026
Respect the National Flag
 
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कागदी आणि कापडी ध्वज बाजारात विक्रीसाठी आले आहेत. राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने सरकारच्या वतीने 'हर घर तिरंगा मोहीम' राबवली जात असल्याने घरोघरी त्यादृष्टीने सिद्धता एक आठवडा आधीपासूनच सुरु झाली आहे. कपड्यांच्या दुकानांचे डिस्प्ले तिरंगी कापडांनी सजले आहेत. अन्य दुकानांनीही आपले देशाप्रतीचे प्रेम दर्शवण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रध्वजाच्या रंगांचा वापर करून दुकानाबाहेर सजावट केली आहे. सामाजिक माध्यमांवर देशप्रेमाचे स्टेटस आतापासूनच झळकू लागले आहेत. अनेक कार्पोरेट कंपन्यांनी यंदा शुक्रवारी कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी तिरंगा रंगांची अथवा पारंपरिक पोषाखाची थीम ठेवली होती. अनेक सामाजिक संस्था आणि मंडळांमध्ये, शाळा महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्याची सिद्धताही जोमाने सुरु आहे. ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्पादनांवर विशेष सवलत ठेवली आहे.
 
हिंदी मराठी चॅनल्सवरील डेली सोप आणि रिऍलिटी शोजमध्ये सुद्धा सध्या स्वातंत्र्य दिनाचाच फिवर आहे. मिठाईच्या आणि केक्सच्या दुकानांत तिरंग्याच्या रंगाच्या विविध मिठाया आणि केक्स विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. सारे वातावरण देशभक्तीने जणू न्हाऊन निघाले आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन जवळ आला कि देशभरात देशप्रेमाचे वारे जोराने वाहू लागतात.
 
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कागदी आणि कापडी राष्ट्रध्वज सर्वत्र विक्रीसाठी आले आहेत. ५-१० रुपयांत मिळणारा राष्ट्रध्वज खरेदी करणे सोपे आहे; मात्र त्याचा योग्य तो सन्मान राखण्याची भावना आपल्यात निर्माण झाली आहे का हे अभ्यासनेही आज गरजेचे बनले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या एका पिढीने अपरिमित हालअपेष्टा सहन केल्या; मात्र त्यानंतरच्या पिढीने पुढच्या पिढीवर जे देशप्रेमाचे संस्कार करायला हवे होते ते न केल्याने स्वातंत्र्याचे मोल आजच्या पिढीला तितकेसे उरलेले नाही. राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने रस्त्यावर पडलेले ध्वज आणि ध्वजांचे अवशेष गोळा करून त्यांची ध्वजसंहितेनुसार योग्य ती विल्हेवाट लावण्याचे काम काही स्वयंसेवी संघटना दरवर्षी करत असतात.
 
मात्र त्यांच्यावर ही वेळ येऊच न देण्याची जबाबदारी आपली नव्हे काय ? स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपले राष्ट्रप्रेम दाखवण्यासाठी राष्ट्रध्वजाचे बॅज आपण छातीवर लावून मिरवतो. गाड्यांवर, घरांवर, दुकानांवर ध्वज फडकावतो, कागदी ध्वज विकत घेऊन ते पाल्यांना देतो; मात्र ते फाटतात, हरवतात तेव्हा ' जाऊ दे, १० रुपयांचा तर झेंडा होता' असे विचार आपल्या मनात येतात आणि आपण ते शोधायचा प्रयत्नही करत नाही. या दिवशी रस्त्यावरून जाताना एखादा ध्वज रस्त्यावर पडलेला दिसला तर तो उचलून खिशात ठेवण्याचा विचार तर येतो मात्र आजूबाजूचे लोक काय म्हणतील या विचाराने आपण तसे करण्याचे टाळतो. खरेदी केलेले ध्वज पुढील राष्ट्रीय सणासाठी जपून ठेवतो का किंवा ते फाटले असतील तर ध्वजसंहितेनुसार त्या ध्वजांची विल्हेवाट लावतो का ? आपल्या मनात आपल्या राष्ट्रध्वजाविषयी आस्था किती आहे हे जाणून घेण्यासाठी सदर उदाहरणे पुरेशी आहेत. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासंदर्भात शासनाच्या वतीने प्रतिवर्षी ध्वजसंहिता प्रकाशित करण्यात येते मात्र ती वाचण्याची तसदी आपण कधी घेत नाही.
 
राष्ट्रध्वज हे देशाच्या सन्मानाचे प्रतीक असते त्यामुळे त्याचा योग्य तो मान राखणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी शेकडो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, घरादाराची राखरांगोळी केली, आयुष्यभर कारावास भोगला. त्यांच्याच बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्यात सुखाने जगत आहोत. लोकशाही व्यवस्थेच्या सुख सुविधा उपभोगत आहोत. राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी आजही आपले सैनिक सीमेवर ऊन, वारा, पाऊस कशाचीच तमा न बाळगता खंबीरपणे उभे असतात त्या राष्ट्रध्वजाचे उचित मूल्य आपल्या अंतर्मनात बिंबायला हवे. राष्ट्रीय सणांच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा एकही राष्ट्रध्वज रस्त्यावर इतस्ततः पडलेला दिसणार नाही तेव्हाच आपल्यातील राष्ट्रध्वजाविषयीची अस्मिता जागृत झाली असे म्हणता येईल.
 
- जगन घाणेकर




संबंधित मजकूर