नाशिक मनी हाईस्ट : २१ दिन मैं पैसा ट्रीपल! १० लाखांच्या बदल्यात ३० लाख देण्याचे आमिष
तळेगावात बनावट नोटांची ‘टकसाळ’ उद्ध्वस्त, त्र्यंबकेश्वर रोडवरील बंगल्यात गुपचूप सुरू होता नोटा छापण्याचा उद्योग; तेलंगणासह नाशिकमधील पाच जण पोलिसांच्या ताब्यात
नाशिक (Nashik Money Heist) : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव परिसरात बनावट चलनी नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. एका बंगल्यात सुरू असलेल्या या कथित बनावट नोटांच्या कारखान्यावर कारवाई करत पोलिसांनी लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि रसायने जप्त केली आहेत. या प्रकरणात तेलंगणातील दोघांसह नाशिकमधील तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, तळेगाव शिवारातील एका खासगी बंगल्यात अत्यंत गोपनीय पद्धतीने Nashik Money Heist हा प्रकार सुरू होता. विशिष्ट रसायने, प्रिंटिंग साहित्य आणि इतर साधनांच्या मदतीने चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा तयार केल्या जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारवाईदरम्यान छापलेल्या बनावट नोटांचा साठा तसेच नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले.
१० द्या, ३० घ्या’चा धक्कादायक सौदा
या रॅकेटची कार्यपद्धती अधिक गंभीर असल्याचे तपासातून समोर येत आहे. १० लाख रुपये खरे चलन दिल्यास त्याच्या बदल्यात ३० लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या परताव्याच्या लालसेने व्यापारी किंवा आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तींना या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होत होता का, याचा तपास सुरू आहे.
तेलंगणापर्यंत धागेदोरे
Nashik Money Heist या कारवाईत अमरेश्वर आईथा आणि दासरी सत्यइ (दोघे तेलंगणा), गोकुळ दाते व हिरामण दाते (तळेगाव) आणि मच्छिंद्र घनदाट (सातपूर) यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणामुळे नाशिकपुरते मर्यादित नसलेले नेटवर्क असण्याची शक्यता तपासाच्या केंद्रस्थानी आली आहे. बनावट नोटांचा नेमका पुरवठा कुठे केला जाणार होता, यापूर्वी किती नोटा बाजारात पोहोचल्या, रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत आणि तेलंगणासह इतर जिल्ह्यांशी त्याचे धागेदोरे किती खोलवर आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपासाला महत्त्व
नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होणार असल्याने, बनावट चलन बाजारात आणण्याचा या टोळीचा काही डाव होता का, हा मुद्दाही तपासात महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. बनावट नोटांच्या Nashik Money Heist या कथित कारखान्याचा पर्दाफाश झाल्याने नाशिक पोलिसांसमोर आता केवळ आरोपी पकडण्याचे नव्हे, तर या रॅकेटचे मूळ आणि त्याचे आर्थिक जाळे उलगडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.