_202608131015469367_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
पावसाच्या पाण्याने गळणारे छप्पर, घरात भरणारे पाणी, पावसाच्या पाण्यात वाहून येणारे विंचू, साप आणि त्यांचे जीवघेणे दंश आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, डोंगरकपारी कोसळून उजाड होणार्या वस्त्या आणि अनाथ होणारी कुटुंबे, यामुळे पाऊस पूर्वापारपासूनच तसा बदनाम! मात्र, पावसावर उगीचच आरोप आहेत. त्याचा धर्म तो निभावतोय. या परिप्रेक्ष्यात गडचिरोलीतील सर्पदंशाने मृत्यू पावणार्या विद्यार्थिनी असोत की, घाटकोपरमध्ये काल दरड कोसळून मृत्यू पावणारे ते निष्पाप नागरिक असोत, यात नैसर्गिक आपत्ती जितकी कारणीभूत होती, तितकीच नव्हे; तर त्याहून जास्त माणसांचा निष्काळजीपणा आणि दुर्लक्षित करण्याची वृत्ती कारणीभूत होती. आता कितीही यावर लिहिले आणि रडले, तरी जीवानिशी गेलेली माणसे, त्या विद्यार्थिनी परत येणार नाहीत. त्यांचा मृत्यू काळजाला घरे पाडत आहे.
अनादीकालापासून असलेला स्वतःचा जीव वाचवण्याचा धर्म, त्यासाठी लागणार्या तरतुदी करण्याचा धर्म माणूस विसरत चालला आहे का? किड्यामुंग्यांनाही स्वतःच्या जीवाची काळजी असते. मात्र, आजघडीला माणसांचे काय? याचे प्रतिनिधित्व करणारी घटना म्हणजे, घाटकोपरमध्ये दरड कोसळणे किंवा गेल्या महिन्यात मानखुर्दमध्ये धोकादायक इमारत कोसळून झालेले मृत्यू. खरेतर महानगरपालिका प्रशासन शहरातली धोकादायक इमारतींचे, वस्त्यांचे दर पावसाळ्याआधी सर्वेक्षण करते. धोकादायक, अतिधोकादायक इमारती-घरांची यादी करण्यात येते. तिथल्या रहिवाशांना इमारत किंवा घर वस्ती खाली करण्यासाठी नोटीस दिली जाते. कारवाई होते; पण अनेकजण धोकादायक इमारतीतला, वस्तीतला निवास सोडत नाहीत. प्रशासनाच्या कारवाईला विरोध करतात. मृत्यूची वाट पाहणारी ही कोणती आशा? निवास सोडला तर पुन्हा त्या जागी राहता येणार नाही, ही भीती हातावरचे पोट असणार्या बांधवांना वाटते. याअनुषंगाने प्रशासनाने त्यांच्यासाठी तात्पुरती निवासी शिबीर उभारलेले असते. व्यवस्थित नोंदणी केलेली असते. मात्र, तरीही लोक धोकादायक वस्त्या, इमारती सोडत नाहीत. या इमारतींचे, वस्त्यांचे प्रशासकीय ऑडिट होते; पण धोकादायक घर न सोडणार्या लोकांच्या भीतीचे कारण काय, याचेही ऑडिट व्हायला हवे. जगण्याचा संघर्ष या निष्पापांना अकाली मृत्यूकडे घेऊन जातो.
गोडी अपूर्णतेची!
‘तुतारी’चे लोक मोदींना भेटले आणि लगेच संजय राऊतांनी जाहीर केले की, ‘पोल ट्रेकर’ नावाच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ५८ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदासाठी पसंती दिली. अर्थात, ही सर्वेक्षणे काही नमुने निवडून केली जातात. ‘शितावरून भाताची परीक्षा’ करणे आणि मानवी मनाचे परीक्षण करणे, यात फरक आहे. पण, हे राऊतांना कसे समजणार? त्यामुळेच ‘डॉक्टरला काय कळते? मी कम्पाऊंडरकडूनच इलाज करतो,’ असे म्हणणार्या राऊतांना हे सर्वेक्षण खरे वाटले. विरोधी पक्ष सत्तेसाठी किती सैरभैर झाला आहे, हे यातून स्पष्ट होते. जे प्रत्यक्षात होत नाही, त्यासाठी काही लोकांचे मन वाटेल ते खेळ करते. आपल्याला जे वाटते, तेच होणार म्हणजे होणार, असे त्यांना वाटते. राऊतांचेही तसेच. पण, राहुल गांधीच पंतप्रधान होणार, असे म्हणणार्या संजय राऊतांबद्दल स्वतःला ‘देवाचा बाप’ मानणारे शरद पवार काय बरे म्हणत असतील?
भावी पंतप्रधान म्हणून पवार नेहमी उमेदित असतात. पण, प्रत्येक वेळी कर्माच्या फळांमुळे त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी अखिल भारताचे नेतृत्व करण्याची इच्छा अनेकदा दर्शवली होती. त्यावेळी संजय राऊत अनेक वेळा पत्रकार परिषदेमध्ये सांगायचे की, "उद्धव ठाकरेंना देश बोलावत आहे. देशाचे नेतृत्व तेच करू शकतात.” मात्र, आज तेच राऊत कसल्यातरी सर्वेक्षणाचा आधार घेत राहुल गांधींची तळी उचलत आहेत. अर्थात, त्यांचे राहुलप्रेम लपलेले नाही. यापूर्वीही, राहुल यांना पाहून ते म्हणाले होते की, ‘आप आये बहार आयी|’ असो, तर जागतिक आरोग्य संस्थेचे लोक उद्धव ठाकरेंना ‘कोरोना’बद्दल माहिती विचारायचे, हा राऊतांचा दावा जितका खरा आहे, तितकाच राहुल गांधींना पंतप्रधानपदाची पसंती देणारे ५८ टक्के लोक आहेत, हा त्यांचा दावाही खरा आहे. राऊतच काय? समस्त विरोधी पक्ष मोदी पंतप्रधानपदावरून जातील, हे स्वप्न बघतात. हे स्वप्न खोटे आहे आणि स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, हे त्यांना माहिती आहे. लोकांनी आपल्याला नाकारले, मोदींना स्वीकारले हे वास्तव ते समजून घेत नाहीत. ‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा’ हे गीत यांच्यासाठी तर निर्माण झाले नाही ना?
९५९४९६९६३८