दि. २ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६’ हा कायदा राष्ट्रपतींनी मंजूर केला आणि परवा ढोंगी पुरोगाम्यांचे ‘मुक्तांगण’ मानल्या जाणार्या पुण्यात त्या कायद्याचा पहिला दणकादेखील दिला गेला. यासाठी सर्वप्रथम तक्रारदाराचे अभिनंदन व हा कायदा पारित करून भाबड्या हिंदूंना फसवणार्यांविरोधात कायदा करणार्या देवेंद्र फडणवीसांचेही कौतुक!
आपल्या देशात कायद्याचे राज्य असून, हा कायदा संविधानातून आकाराला आला. अन्य कायद्यांप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला तिच्या धार्मिक परंपरांनुसार धर्माचरणाचा अधिकार व स्वातंत्र्य याच घटनेने दिले आहे. भारतीय संविधानातील ‘कलम २५ ते २८’ने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे. याद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाला कोणताही धर्म पाळण्याचा, त्याचे आचरण व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य मिळते; जे सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या अधीन आहे. म्हणजेच, धार्मिक स्वातंत्र्य असले, तरी नागरी व्यवस्था म्हणून सुव्यवस्था, नैतिकता व आरोग्य हे तीन निकष अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. कारण, धर्माचरणाचा वेडाचार झाला की, सर्वप्रथम या तीन घटकांना हरताळ फासला जातो. रस्त्यावर बसून ‘नमाज’ पढून सुव्यवस्था बिघडविली जाते. अन्य धर्मियांचे क्लेशकारक विडंबन करून नैतिकता नाकारली जाते, तर कधी बकरी ईदसारख्या सणांना सार्वजनिक ठिकाणी पशुबळी देऊन आरोग्याचे प्रश्न निर्माण केले जातात. कायदा काहीही असला, तरी कायद्याचे आकलन आणि अंमलबजावणी करणारे लोक कोणत्या मानसिकतेचे आहेत, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. मतांच्या लांगूलचालनासाठी या देशात मुस्लीम करतील ते सगळेच बरोबर आणि हिंदूंचे ते सगळेच वाईट, अशी रीती रूढ झाली होती. आता एक चांगले झाले, ते म्हणजे ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा’ आला. दि. २ ऑगस्ट रोजी हा कायदा राष्ट्रपतींनी मंजूर केला आणि काल ढोंगी पुरोगाम्यांचे ‘मुक्तांगण’ मानल्या जाणार्या पुण्यात त्या कायद्याचा पहिला दणकादेखील दिला गेला. यासाठी सर्वप्रथम तक्रारदाराचे अभिनंदन व हा कायदा पारित करून भाबड्या हिंदूंना फसवणार्यांविरोधात कायदा करणार्या देवेंद्र फडणवीसांचेही कौतुक!
यापूर्वी, भोळ्याभाबड्या वारकर्यांना अगदी पंढरपूरच्या वारीत शिरून ख्रिस्ती धर्म साहित्यवाटप आणि उपदेशातून धर्मांतरणाचे कुटिल प्रयत्न उघडकीस आले होते. पण, परवा पुण्यात घडलेला प्रकार हा त्यापेक्षाही चिंताजनक. एका बिशपने चक्क वारकरी संपद्रायातील कीर्तन, टाळ, मृदंग आणि भारुडांसारख्या सांस्कृतिक प्रतीकांचा वापर करीत येशूची करुणा भाकण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर ‘येशूमुळेच पाऊस पडतो’, ‘येशूचे नाव घेतल्याने कुष्ठरोग बरा होता,’ यांसारख्या भूलथापांतून अंधश्रद्धा आणि भ्रम पसरवला आणि बरे हेसुद्धा पुण्यातच घडले. याच पुण्यातून यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली आचरट अटी घालून कायदा आकारण्याचा प्रयत्न झाला होता. हिंदूंना पवित्र असलेले गोमूत्र व त्याचा वापर अप्रत्यक्षपणे ‘जनावराचे मूत्र’ असा उल्लेख करून ते पाजणे, हा गुन्हा ठरवला गेला होता. वस्तुत: हिंदूंच्या बाराबलुतेदार किंवा अठरापगड जातींमध्येही गोमूत्राचे प्राशन हा काही अनिवार्य विधी नाही. मात्र, जणूकाही ते तसे आहे, असे दर्शवून श्रद्धा कमकुवत करण्याचा हा डाव होता. सुदैवाने संपुआ सरकार गेले आणि हिंदूंची ही श्रद्धा वाचली. मात्र, हिंदूंच्या श्रद्धांचा उपमर्द करण्याचा प्रकार दिवसाढवळ्या राजरोसपणे कसा उघडउघड चालतो, हे पुण्यातले प्रकरण हा त्याचा जळजळीत पुरावा होते. येशूचे नाव घेऊन तुम्ही काहीही करू शकता, भाबड्या वारकर्यांच्या श्रद्धेला गंडवू शकता. मात्र, तुमचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही, हा काळ आता संपला आहे. कुणी तरी हिंदू नाव असलेला व ‘यूके’चे नागरिकत्व असलेला इसम दिवसाढवळ्या धर्मप्रसारासाठी चौकात उभा राहतो आणि मदार्याचे खेळ दाखवून ख्रिस्ती धर्म पसरवितो, असा या घटनाक्रमाचा ताजा मसुदा आहे.
‘कीर्तन’, ‘अभंग’, ‘भारुड’, ‘वीणा’, ‘संत’, ‘माऊली’ यांसारख्या शब्दांचा जन्म व त्या संकल्पना या ख्रिस्तभूमीत जन्मलेल्या नाहीत; तर त्या ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म’ असे सांगणार्या सश्रद्ध वारकर्यांनी रुजवलेल्या आहेत. यात तुकोबा ते ज्ञानोबा, सावता माळी ते गोरा कुंभार अशी मोठी परंपरा आहे. या सगळ्याचे खरेतर ‘ख्रिस्त’, ‘ख्रिश्चॅनिटी’, ‘बायबल’, ‘जुना करार’, ‘नवा करार’ याच्याशी काहीही संबंध नाही. ख्रिस्ताला भगवे झगे चढवून बाटवाबाटवी करण्याचे प्रकार केरळम्मध्ये जोरात चालतातच; परंतु ख्रिस्ताचा भंडारा (मागे कुणा खुळ्या डाव्याने धारावीत मार्क्सचा भंडाराही ठेवला होता तसाच), गणेशपूजनाऐवजी ख्रिस्तपूजन असलेही प्रकार सुरू झाले आहेत. या मंडळींना ना नैतिकतेचे भय आहे, ना कायदा-सुव्यवस्थेचे, ना इतरांच्या श्रद्धेचे. पुण्यात जे बॅनर लागले होते, त्यात मंदिराच्या नावाने बॅनर लावून चक्क ‘बायबल’मधील वचनांचा उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नाही, तर या कार्यक्रमाची जाहिरातबाजी समाजमाध्यमांवरून करण्यात आली होती.
अग्रलेखाच्या मध्यावरच आपण तक्रारदाराचे कौतुक केले, ते अशासाठी की, अहिंदू त्यांच्या धर्माच्या बाबतीत जरासे जरी खुट्ट झाले, तरी कायदेशीर लढायांमध्ये जाण्यापासून ते हिंसक मार्ग निवडण्यापर्यंत सर्व पर्यायांचा अवलंब करतात. काही अपवाद वगळता हिंदू मात्र कावरेबावरे होऊन झालेला घटनाक्रम पाहत बसण्याशिवाय काहीच करत नाहीत. धर्माचे आचरण व धर्माने घालून दिलेले नीतिनियम मोडणे म्हणजेच बंडखोरी, असा एक समज ढोंगी पुरोगाम्यांनी रुजवला आहे. त्यातून पद्धतशीरपणे हिंदूंची सांस्कृतिक मुळे हलविण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू असते. धर्मापेक्षा संस्कृतीने रुजलेल्या रीतिभाती ही धर्माची मुळे आहेत. एकदा त्यांच्यावर घाव घालायला सुरुवात केली, तिथे संभ्रम निर्माण केला की, हिंदूंना ढोंगी पुरोगाम्यांना अपेक्षित असलेले सेक्युलर करणे सोपे असते. त्यामुळे इटालियन तत्त्ववेत्ता ग्रामस्कीने मांडलेली ‘कल्चरल हेजिमनी’ थिअरी समजून घ्यायला हवी. या थिअरीनुसार, केवळ आर्थिक आधारावर देशामध्ये क्रांती शक्य नाही, जर क्रांती करायची असेल, तर आपल्याला सगळ्यांना बांधणारी जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीची ‘हेजिमनी’ नष्ट केली पाहिजे. त्यासाठी ही संस्कृतीच नष्ट केली पाहिजे, असा विचार. त्यामुळे हे सगळे खोलात जाऊन समजून घेणे व कायदा व घटनेने दिलेले अधिकार हिंदू म्हणून दणक्यात वापरणे, हेच पुढच्या काळात सयुक्तिक ठरेल.